Marathi Drama Competition: 'अ' गट नाट्यस्पर्धा पणजीतच हवी; वास्कोला हलवण्याच्या निर्णयावर रंगकर्मींमध्ये नाराजी

59th Marathi Natya Spardha: सरकारचा आणि कला अकादमीचा हेतू खरोखरच चांगली नाटके गोव्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा असेल, तर त्यासाठी संपूर्ण स्पर्धाच अडचणीच्या ठिकाणी नेण्याची गरज नाही.
59th Marathi Natya Spardha
Marathi Drama CompetitionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

विकास कांदोळकर

सरकारचा आणि कला अकादमीचा हेतू खरोखरच चांगली नाटके गोव्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा असेल, तर त्यासाठी संपूर्ण स्पर्धाच अडचणीच्या ठिकाणी नेण्याची गरज नाही. त्यापेक्षा पणजी येथे मध्यवर्ती ठिकाणी निर्दोष आणि पारदर्शक पद्धतीने स्पर्धा घ्यावी आणि त्यानंतर स्पर्धेत पहिले दहा क्रमांक पटकावणाऱ्या सर्वोत्कृष्ट नाटकांचे प्रयोग गोव्यातील प्रत्येक तालुक्यात सरकारी खर्चाने आयोजित करावेत.

गोव्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत कला अकादमीने गेली अठ्ठावन्न वर्षे आयोजित केलेल्या मराठी नाट्यस्पर्धांचे योगदान अनन्यसाधारण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, पदरमोड करून आणि अपार कष्ट सोसून गोव्यातील रंगकर्मींनी ही स्पर्धात्मक नाट्यचळवळ केवळ जिवंतच ठेवली नाही, तर तिला देशपातळीवर एक विशिष्ट उंची प्राप्त करून दिली. परंतु, आज सुवर्णमहोत्सवी टप्प्यानंतरही या स्पर्धेचे भवितव्य आणि तिचे पावित्र्य धोक्यात आले असल्याचे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. कला अकादमीच्या कांपाल येथील मुख्य ‘दीनानाथ मंगेशकर’ नाट्यगृहाच्या वारंवार होणाऱ्या नादुरुस्तीमुळे, प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा पणजी या मध्यवर्ती ठिकाणाहून हलवून काही काळ साखळी येथील रवींद्र भवनात घेण्यात आली. तर यंदा ५९वी ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा थेट वास्को येथील रवींद्र भवनात नेण्याचा घाट घातला गेला आहे.

59th Marathi Natya Spardha
Goa 24 Hour Business Rules: दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची मुभा; बार, स्पा आणि डान्स बारनाही परवानगी मिळणार का?

कला अकादमीच्या दुरुस्तीवर जनतेच्या करातील शेकडो कोटी रुपये खर्च करूनही, आज अकादमी स्वतःच्या हक्काच्या जागेत आपलीच प्रतिष्ठेची स्पर्धा घेण्यास असमर्थ ठरत आहे, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? ज्या रंगकर्मींनी रक्ताचे पाणी करून गेल्या पन्नास वर्षांत ही चळवळ जपली, त्यांना आज कला अकादमीच्या या स्पर्धेविषयीच्या आस्थेबद्दलच तीव्र शंका वाटू लागली आहे. स्पर्धात्मक रंगभूमी म्हणजे काय, तिची संवेदनशीलता आणि गरजा काय असतात, याचा गंधही नसलेले राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी जेव्हा कला अकादमीच्या ‘माथ्यावर’ बसतात, तेव्हा या स्वायत्त सांस्कृतिक संस्थेचे झपाट्याने ‘सरकारीकरण’ होऊ लागते. यंदाचा हा निर्णय त्याच सरकारी मानसिकतेचा आणि कलाक्षेत्रातील अनभिज्ञतेचा परिपाक आहे.

यंदाच्या स्पर्धेतील एकूण १९ नाटकांची प्रांतवार आकडेवारी पाहिली, तर आयोजकांच्या या निर्णयातील फोलपणा स्पष्टपणे दिसून येतो. यंदा फोंडा तालुक्यातून सर्वाधिक ५, पणजीतून ४, पेडण्यातून ४, डिचोलीतून २, तर बार्देश, काणकोण, सत्तरी आणि वास्को या तालुक्यांतून प्रत्येकी १ नाटक सादर होत आहे. म्हणजेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांपैकी बहुतांश संस्था या उत्तर गोव्यातील किंवा मध्य गोव्यातील आहेत. असे असताना, केवळ एकच संस्था असलेल्या वास्को शहरात संपूर्ण स्पर्धा नेण्याचे नेमके प्रयोजन काय, हा प्रश्न गोव्यातील तमाम नाट्यप्रेमींना भंडावून सोडत आहे. पेडणे, सत्तरी किंवा डिचोलीसारख्या दूरवरच्या भागातून नाटकाच्या प्रयोगास लागणारे विशिष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि संपूर्ण संचासह वास्कोपर्यंत प्रवास करणे हे नाट्यसंस्थांसाठी अत्यंत जिकिरीचे आणि खर्चिक आहे.

लांबच्या प्रवासामुळे कलाकारांची शारीरिक आणि मानसिक दमछाक होऊन त्याचा थेट परिणाम प्रयोगाच्या दर्जावर होणार यात शंकाच नाही. शिवाय, या प्रवासासाठी संस्थांना द्यावा लागणारा अतिरिक्त भत्ता आणि वाहतूक खर्च कोणाच्या खिशातून जाणार? आपल्या ‘अ’ गट प्रयोग सादरीकरणासाठी रवींद्र भवन वास्को, सुसज्ज असल्याची खात्री सर्व संस्थाना करून घ्यावी लागेल. या सर्व गोंधळात संबंधित संस्थांच्या स्थानिक आणि हक्काच्या प्रेक्षकांना वास्कोपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याने, नाटके रिकाम्या खुर्च्यांसमोर सादर करण्याची नामुष्की कलाकारांवर ओढवणार तर नाही ना?

या निर्णयामागे आणखी एक गंभीर आणि संशयास्पद बाजू दडलेली आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या वर्षीच्या ''अ'' गट नाट्यस्पर्धेत झालेल्या कथित ‘सेटिंग’च्या प्रकरणामुळे या प्रतिष्ठित स्पर्धेला मोठा काळिमा फासला गेला होता. त्याची चर्चा आजही नाट्यवर्तुळात सुरू आहे. स्पर्धा पणजीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास, गोव्यातील नाट्यक्षेत्रातील अभ्यासक, समीक्षक आणि जाणकार रसिक सर्वच नाटके आवर्जून पाहतात. त्यामुळे परीक्षणावर आणि निकालावर एक नैतिक दबाव राहतो. स्पर्धा वास्कोसारख्या एका कोपऱ्यात नेल्यामुळे, या जाणकार मंडळींना आणि समीक्षकांना सर्वच्या सर्व नाटके पाहणे शक्य होणार नाही.

59th Marathi Natya Spardha
Goa AI Policy 2026: 'गोवा एआय' धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; कौशल्य विकासासाठी 60 टक्के, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी 20 टक्के निधी

परिणामी, गेल्या वर्षीसारखे काही ‘सेटिंग’ झालेच, तर त्यावर कोणीही ठोसपणे भाष्य करू शकणार नाही. ‘नाट्यक्षेत्रातील तज्ञ मंडळींनी स्पर्धेतील सगळी नाटके पाहूच नयेत, असा तर आयोजकांचा छुपा हेतू नाही ना?’अशी शंका आता नाट्यप्रेमींच्या मनात घर करू लागली आहे. पारदर्शकतेचा हा संकोच स्पर्धात्मक रंगभूमीच्या मुळावर उठणारा आहे. जर सरकारचा आणि कला अकादमीचा हेतू खरोखरच चांगली नाटके गोव्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा असेल, तर त्यासाठी संपूर्ण स्पर्धाच अडचणीच्या ठिकाणी नेण्याची गरज नाही.

त्यापेक्षा पणजी येथे मध्यवर्ती ठिकाणी निर्दोष आणि पारदर्शक पद्धतीने स्पर्धा घ्यावी आणि त्यानंतर स्पर्धेत पहिले दहा क्रमांक पटकावणाऱ्या सर्वोत्कृष्ट नाटकांचे प्रयोग गोव्यातील प्रत्येक तालुक्यात सरकारी खर्चाने आयोजित करावेत. यामुळे खऱ्या अर्थाने नाट्यचळवळीचा प्रसार होईल. अन्यथा, आज वास्को, उद्या आणखी कोठे असे करत, उद्या प्रत्येक राजकारणी आपल्या पोकळ प्रसिद्धीसाठी ही स्पर्धा आपापल्या ‘वाटारात’ भरवण्याचा हट्ट धरतील, आणि या ऐतिहासिक स्पर्धेचे पार तीनतेरा वाजतील.

सरकारी मानधन घेणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा राजकारण्यांकडून मोठ्या खुबीने राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला जात असल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे. कला, कलाकार आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांमागील राजकीय गणिते आता लपून राहिलेली नाहीत. दुसऱ्या बाजूला, आपली उभी हयात रंगभूमीच्या सेवेत घालवून, असंख्य अडचणींना तोंड देत, स्पर्धात्मक रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कलाकारांना जर आज उपेक्षेचा सामना करावा लागत असेल, तर ही केवळ त्यांची उपेक्षा नसून गोमंतकीय नाट्यसंस्कृतीचीही अवहेलना आहे.

स्पर्धात्मक रंगभूमी ही केवळ स्पर्धा नसते; ती उद्याच्या गोमंतकीय नाट्यविश्वाला दिशा देणारी, नवे कलाकार घडविणारी आणि रंगभूमीला नवचैतन्य देणारी एक महत्त्वाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून भविष्यात नाट्यक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावू शकणाऱ्या तरुण कलाकारांचे मनोबल खच्ची होऊ नये, त्यांच्यातील उत्साह आणि कलात्मक ऊर्जा हिरावली जाऊ नये, हीच कला अकादमीकडे आमची कळकळीची विनंती आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी अशा प्रदीर्घ कालावधीत स्पर्धा आयोजित करणे, त्यातही सलग आणि पुरेशा नाट्यगृहांची उपलब्धता नसताना स्पर्धेचे नियोजन करणे, यामुळे स्पर्धेच्या दर्जावर आणि सहभागी कलाकारांच्या तयारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असताना, याचा गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही. नाट्यगृहांच्या मोकळ्या वेळापत्रकात स्पर्धा बसविण्याची वेळ कला अकादमीवर येणे, हेच नियोजनातील त्रुटींचे बोलके उदाहरण आहे. कलाकारांचा सन्मान हा राजकीय सोयीचा विषय नसावा; तसेच स्पर्धात्मक रंगभूमी ही केवळ औपचारिकता ठरू नये. कला अकादमीने ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करतानाच नव्या पिढीतील रंगकर्मींना न्याय देण्याची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडली पाहिजे. अन्यथा, कलाकारांच्या सन्मानाच्या घोषणा सुरू राहतील; पण रंगभूमीला नवचैतन्य देण्याची स्वप्ने मात्र हळूहळू मावळत जातील.

59th Marathi Natya Spardha
Goa Tourist Touts: 'टाऊट्सची पाळेमुळे उखडून टाका'; ड्रग्ज, वेश्याव्यवसायातही सहभाग असल्याचा रोहन खंवटेंचा आरोप

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित असल्याची सबब पुढे करून स्पर्धा बाहेर नेणे हा पळपुटेपणा आहे. जर खरोखरच सभागृह वापरण्यायोग्य नसेल, तर कला अकादमीने आपल्या विस्तीर्ण प्रांगणात सर्व तांत्रिक सोयींनी युक्त असा सुसज्ज, वातानुकूलित तात्पुरता मंडप उभारावा आणि ही स्पर्धा पणजी या मध्यवर्ती ठिकाणीच पार पाडावी. गोव्याच्या रंगभूमीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि स्पर्धा पणजीतच व्हावी यासाठी आमच्यासारखे अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यप्रेमी सर्वतोपरी योगदान देण्यास सदैव तयार आहेत. कला अकादमीने आणि सरकारने गोमंतकीय रसिक आणि कलाकारांच्या भावनांचा आदर करून, आपला हा अट्टहास तात्काळ मागे घ्यावा आणि ५९वी मराठी नाट्यस्पर्धा पणजीतच आयोजित करावी, हीच तमाम गोमंतकीय नाट्यप्रेमींची आग्रही मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.