

पणजी: राज्यात शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि सरकारी प्रशासन अशा विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या ‘गोवा कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६’ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. २०२६-२९ या तीन वर्षांच्या कालावधीत या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
एआय तंत्रज्ञानाचा विकास, त्याचा व्यापक वापर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीवर यात भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये या धोरणाचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रिमंडळाने त्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
धोरणानुसार, उपलब्ध निधीपैकी ६० टक्के निधी एआय कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धीसाठी खर्च केला जाणार आहे. उर्वरित निधीपैकी प्रत्येकी २० टक्के स्टार्टअपना प्रोत्साहन आणि एआयशी संबंधित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत एआय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख आणि भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये दिली जाणार आहेत. शिक्षकांसह विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठीही कौशल्यवृद्धीचे उपक्रम राबविण्यात येतील.
गोव्याची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ‘कोकणी एआय अँड रिसर्च एक्सलन्स’ योजना प्रस्तावित आहे. याअंतर्गत एआय संशोधन व उत्कृष्टता केंद्र स्थापन करून कोकणीसह विविध भाषांतील तंत्रज्ञानविषयक संशोधनाला चालना दिली जाणार आहे. स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्यम एआय’ योजना राबविण्यात येईल. एआय आधारित व्यवसाय कल्पना विकसित करणाऱ्या नवउद्योजकांना निधी, प्रशिक्षण, मार्गदर्शन, उष्मायन आणि संशोधनासाठी सहकार्य दिले जाणार आहे.
तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) एआयचा वापर वाढविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. धोरणाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार परिषद स्थापन केली जाणार आहे. धोरणाच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यात सुधारणा सुचविण्याची जबाबदारी या परिषदेकडे असेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
कोकणी संशोधनासह नवउद्योजकांना बळ
‘कोकणी एआय अँड रिसर्च एक्सलन्स’ योजनेतून कोकणी भाषेतील एआय संशोधनाला चालना दिली जाणार आहे. तर ‘उद्यम एआय’ योजनेतून नवउद्योजकांना व्यवसाय कल्पनांसाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण, मार्गदर्शन, उष्मायन आणि संशोधनासाठी सहकार्य मिळणार आहे.
निधीची विभागणी अशी आहे
६० टक्के : एआय कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धी
२० टक्के : स्टार्टअपना प्रोत्साहन व आर्थिक साहाय्य
२० टक्के : एआयशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.