संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Goa Football Match Fixing: गोव्यातील फुटबॉल सामन्यांना आता पूर्वीप्रमाणे गर्दी होत नाही. सामन्याचा निकालच जर ‘फिक्स’ असेल, तर फुटबॉलप्रेमी मैदानावरील फसवा खेळ पाहण्यासाठी का येतील?
Goa Football Match Fixing
Football Match FixingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

संपूर्ण क्रीडा जगतालाच सामना निकाल निश्चिती म्हणजेच मॅच फिक्सिंगने पोखरले आहे. त्यामुळे क्रीडा मैदानावरील प्रत्येक निकालाकडे आणि कामगिरीकडे संशयाने पाहिले जाते. खेळाडू अथक मेहनत घेतात, त्यासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागतो. तेव्हाच यश त्यांच्या पायाशी येते. मात्र, काही खेळाडू झटपट पैशांच्या मोहापायी भरकटतात आणि सामना निकाल निश्चितीसारखी प्रकरणे उद्भवतात. साहजिकच प्रामाणिक खेळाडूंच्या श्रमांकडेही फिक्सिंगच्या नजरेने पाहिले जाते. काही प्रकरणांत भांडाफोड झाल्यानंतर मोठे वादळ उठते, चौकशी होते आणि खेळाडूंसह संबंधितांना शिक्षाही होते. नियम कडक आहेत; परंतु ही कीड काही समूळ नष्ट होत नाही.

आता गोवा फुटबॉल असोसिएशनचेच (जीएफए) उदाहरण पाहा - राज्यातील फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंगच्या कुप्रवृत्तीने शिरकाव केल्याचे दशकभरापूर्वीच निदर्शनास आले होते. जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा), आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) यांच्या नैतिकता समित्या, तसेच संबंधित संस्थांकडून जगभरातील फुटबॉलवर नजर ठेवली जाते. त्यातून गोव्यातील फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंग अथवा बेटिंग होत असल्याचे अहवाल संबंधित संस्थांनी दिले होते. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) माध्यमातून गोवा फुटबॉल संघटनेला सावध करण्यात आले होते. विशेषतः गोवा प्रोफेशनल लीग या महत्त्वाच्या स्पर्धेतील काही सामने संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे अहवालात नमूद होते.

Goa Football Match Fixing
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

तरीही राज्यातील फुटबॉलचे नियमन करणाऱ्या तत्कालीन ‘जीएफए’ पदाधिकाऱ्यांनी या इशाऱ्यांकडे सातत्याने डोळेझाक केली आणि संबंधित सावधानतेच्या अहवालांना केराची टोपली दाखविली. कालांतराने मॅच फिक्सिंगने अक्राळविक्राळ रूप धारण करून गोव्यातील फुटबॉलला गिळंकृत करण्यास सुरवात केली. त्यातूनच आता ‘जीएफए’च्या नैतिकता समितीच्या चौकशीनंतर १३ फुटबॉलपटू आणि एका अधिकाऱ्यासह १४ जणांना निलंबित करण्याची वेळ आली आहे. ‘जीएफए’चे उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांच्या माहितीनुसार- २०१८ ते २०२२ या कालावधीत गोव्यातील फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंगला खतपाणी मिळाले आणि ते मोठ्या प्रमाणात फोफावले.

संबंधित इशारा अहवालांकडे दुर्लक्ष झाले. मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचे फावले; त्यांना कोणाचेही भय राहिले नाही. सामना निकाल निश्चितीसाठी फिक्सर्सच्या जाळ्यात खेळाडू अलगदपणे अडकू लागले - महत्त्वाची बाब म्हणजे, जोनाथन यांनी उल्लेख केलेल्या कालावधीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि नावाजलेल्या चर्चिल ब्रदर्स संघाचे सर्वेसर्वा चर्चिल आलेमाव ‘जीएफए’चे अध्यक्ष होते. फिफाची नैतिकता समिती संशयास्पद सामन्यांबाबत ‘रेड फ्लॅग’ अहवाल सातत्याने पाठवत होती; मात्र आलेमाव यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएफए’ने त्याकडे साफ दुर्लक्ष केले, हे जोनाथन यांच्या दाव्यावरून दिसून येते.

चर्चिल आलेमाव आणि त्यांची मुलगी वालंका आलेमाव हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा चर्चिल ब्रदर्स संघ आता ‘मागील दारा’ने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत दाखल झाला आहे. चर्चिल तसेच वालंका प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबाने फुटबॉलसाठी केलेल्या त्यागाचे गोडवे गातात आणि त्यातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. फुटबॉलउपासक म्हणून ओळख सांगणाऱ्या चर्चिल यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएफए’ने मॅच फिक्सिंगच्या इशाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले होते, ही बाब गंभीर आहे.

Goa Football Match Fixing
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

तेव्हाच योग्य आणि कडक उपाययोजना झाली असती, तर गोव्यातील फुटबॉल कलंकित झाला नसता. गोव्यातील फुटबॉल सामन्यांना आता पूर्वीप्रमाणे गर्दी होत नाही. सामन्याचा निकालच जर फिक्स असेल, तर फुटबॉलप्रेमी मैदानावरील फसवा खेळ पाहण्यासाठी का येतील? खासगी स्पर्धांतील सामने फिक्स असतात, असे आरोप नेहमीच कानावर येत असताना ‘जीएफए’च्याच प्रमुख स्पर्धांना मॅच फिक्सर्सनी लक्ष्य केले.

यावरून फिक्सर्सनी विणलेल्या जाळ्याचे गांभीर्य लक्षात येते. राज्यातील फुटबॉलमधील मॅच फिक्सिंगचा मुद्दा पकडून सध्याचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांच्या गटाने चार वर्षांपूर्वी चर्चिल आलेमाव यांच्या गटाचा ‘जीएफए’ निवडणुकीत धुव्वा उडविला होता. त्यावेळी कायतान यांनी राज्यातील फुटबॉलची प्रगती आणि स्वच्छ कारभाराची ग्वाही दिली होती. मॅच फिक्सिंगबाबत चर्चा होती, संशय होता; मात्र ठोस पुरावे नव्हते.

बार्देश तालुक्यातील शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोळकर यांनी धाडस दाखविले आणि आपल्या संघातील काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये गुंतल्याची लेखी तक्रार गतवर्षी ‘जीएफए’कडे केली. त्यानंतर चौकशी आणि तपासाची चक्रे फिरू लागली. आता दहा महिन्यांनंतर निवृत्त पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनी सखोल चौकशीअंती अहवाल सादर करून १४ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांना सकृतदर्शनी बरेच पुरावे सापडले असल्याचे ‘जीएफए’चे म्हणणे आहे. नैतिकता समितीचा अहवाल सुमारे अडीचशे पानांचा आहे. ‘जीएफए’ला आता या प्रकरणी राज्य पोलिस गुन्हे शाखेकडून सखोल तपास अपेक्षित आहे. चिंताजनक बाब म्हणजे, मॅच फिक्सिंगमध्ये एक पोलिस कॉन्स्टेबलही गुंतल्याचे ‘जीएफए’च्या नैतिकता समितीला आढळून आले आहे.

Goa Football Match Fixing
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

पोलिस गुन्हे शाखेकडून १४ निलंबितांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईला पुढील दिशा मिळेल. या प्रकरणामुळे संबंधित खेळाडूंच्या फुटबॉल कारकीर्दीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. झटपट पैशांच्या मोहापायी खेळाडूंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. आरोपी खेळाडूंवरील निलंबनाची कारवाई हा राज्यातील फुटबॉलसाठी महत्त्वाचा टप्पा असून, इतरांसाठी कडक इशारा आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणी सदसद्विवेकबुद्धीला जागून चौकशीसाठी पुढाकार घेणारे सारेच कौतुकास पात्र आहेत. त्याचवेळी सामना निकाल निश्चिती तसेच खेळातील इतर अपप्रवृत्तींविरुद्धचा हा लढा असाच पुढे कायम राहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com