

राजेंद्र पां. केरकर
गोमंतकीय लोकजीवनात काकडीला फलाहार म्हणून जसे विशेष महत्व तसेच तिला लोकधर्मातही आदराचे स्थान लाभलेले आहे. काकडीची लागवड भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून होत असून, तिचा वापर अन्न म्हणून जसा केला जातो तसेच इथल्या लोकमानसाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातही तिला उल्लेखनीय स्थान लाभलेले आहे. मुळच्या भारतीय असलेल्या काकडीचे उत्पादन आज जगातल्या बऱ्याच देशात घेतले जाते.
जुन्या काळातल्या गुहांत केलेल्या उत्खननातून काकडीचे पीक ३००० वर्षांपासून घेत असल्याचे स्पष्ट झाले असून अन्नातला एक घटक म्हणून तिचा वापर होत असल्याचे दिसून आलेले आहे. सुरुवातीला जंगलात वेलवर्गीय वनस्पतीवर लागणारी काकडी कडू होती. कुकुरबिटासिन या संयुगामुळे काकडीची चव कडवट होती. परंतु असे असतानाही माणूस तिची चव घेत होता.
कालांतराने माणसाने कडवटपणा नाहीसा करून, काकडीची चवदार प्रजाती विकसित केली. गोकुळाष्टमीच्या उत्सवात श्रीकृष्णाच्या जन्मानंतर नाळ तोडून प्रतीक म्हणून देठासह काकडी नाण्यासह कापण्याची प्रथा काही ठिकाणी प्रचलित आहे.
काकडीत भरपूर बिया असल्याने, ती नवीन जीवन, निर्मिती आणि वंशाच्या व समृद्धीच्या वाढीचे प्रतीक मानले जाते. श्रावणातल्या विविध व्रत, उत्सवांत त्याचप्रमाणे भाटपदातल्या हरतालिका व्रतात फलाहार म्हणून काकडीचा उपयोग केला जातो. उपवासाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी जिरे, मिरची, नारळाचे खोबरे यांना फोडणी देऊन, खमंग काकडीचा पदार्थ केला जातो.
भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला दर्यावदी
कोलंबसने अमेरिका खंडात पाऊल ठेवले. १४९४ साली कोलंबसने काकडी कॅरिबियन राष्ट्रांतल्या हैतीत नेली. क्युबा आणि जमैका देशांच्या पूर्वेला असलेल्या हैतीतून काकडीची लागवड अमेरिकेच्या खंडांतल्या बऱ्याच देशांत प्रचलित झाली. ग्रीक, इजिप्त, रोमनांनीही काकडीची लागवड केली होती. काकडी पित्तनाशक असून, तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे कावीळ, ज्वर, मधुमेह, मुतखड्याच्या आजारावर उपयुक्त मानली गेलेली आहे.
शरीरात होणारा दाह काकडीच्या सेवनाने कमी होत असल्याने, उन्हाळ्यात जिरे, मीठ घालून काकडीचे जसे सेवन केले जाते तसेच सरबत तयार करण्यासाठीही तिचा उपयोग केला जातो. मराठीत तिला काकडी अशी संज्ञा असून गुजरातीत कांकडी, हिंदीत काकरी, कांग्रीत कुक्री, उडियात काकुरी तर इंग्रजीत ककुंबर म्हटले जाते. विविध भाषांतील काकडीच्या नामसाम्यामुळे एकेकाळी तिच्याविषयीची आत्मीयता उमजते.
गोव्यात पेडणे ते काणकोणपर्यंत काकडीचे शेकडो वर्षांपासून उत्पादन घेतले जाते आणि राज्यातील विविध प्रांतातील मृदा, हवामान, पर्जन्यवृष्टी यानुसार काकडीची चव बदलत असल्याचे दिसून आले आहे. चवीच्या दृष्टीने मॉन्सूनच्या पर्जन्यवृष्टीनंतर सलामीलाच फोंडा तालुक्यातील फर्मागुडीच्या परिसरात होणाऱ्या काकडीच्या प्रजातीची लज्जत संपूर्ण गोव्यात वैशिष्टयपूर्ण ठरलेली आहे.
कोवळ्या काकड्यांचा आस्वाद घेण्यासाठी गोव्यातील लोकमानस हमखास या रस्त्याच्या दुतर्फा थांबतात. भाद्रपदात केपे, काणकोण येथील वेळीप - गावकरांकडून पैदासी केल्या जाणाऱ्या काकडीची चव न्यारी असते. भाजलेल्या उकड्या तांदळाच्या पिठात प्रौढ काकडीला किसून, त्या लगद्याला एकत्रित केल्यावर, त्यात शेंगदाणे घालून माधूर्यपूर्ण तवसोळी करण्याची परंपरा होती. पूर्वीच्या काळी आई आपल्या लग्न करून दिलेल्या मुलीच्या घरी भेट म्हणून हमखास तवसोळी घेऊन जायच्या.
गोव्यात गणेश चतुर्थीच्या काळात गौरीप्रित्यर्थ सुवासिनी हळदीच्या पानावर हौशे या विधीत जे अन्न पदार्थ घालतात, त्यात काकडीचे तुकडे जसे वापरतात, तसेच आश्विनातील विजयादशमीला जेव्हा घरातील आयुधे आणि शस्त्रपूजन केले जाते तेव्हा प्रत्येक आयुध, शस्त्र यांना काकडीचा तुकडा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
तिसवाडी तालुक्यातील तळावली या कृषीप्रधान गावात जेव्हा सामुहिकरित्या ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली, तेव्हा तेथील मृण्मयी वारुळाचे सांतेर म्हणून पूजन करणाऱ्या आदिवासी जमातीने संतान देवी म्हणून धर्मांतर झाल्यावर तेथे स्थापन करण्यात आलेल्या सेंट ॲनचे पूजन करायला प्रारंभ केला. मॉन्सूनात पर्जन्यवृष्टी होण्यापूर्वी तळावलीतील कष्टकरी काकडी, भेंडी, दोडगी, भोपळा, चिबूड आदींची लागवड करतात आणि आषाढ- श्रावणात जेव्हा काकडीची पैदासी व्हायची तेव्हा काकडीचे सेवन करण्यापूर्वी इथले आदिवासी तिचे ग्रामदेवी सांतेर आणि लोकदैवतांना विधीयुक्त अर्पण करायचे.
तळावलीत पोर्तुगीज अमदानीत ख्रिस्तीकरणामुळे पूर्वीच्या काकड्या अर्पण करण्याच्या विधीची जागा सेंट ॲनच्या ऐतिहासिक चर्चमध्ये तवश्याच्या फेस्ताने घेतली. आज ग्रेगोरियन कालगणनेतल्या जुलैच्या शेवटच्या रविवारी जेव्हा सेंट ॲनच्या चर्चमध्ये तवश्याचे फेस्त साजरे होते तेव्हा विवाहित दांपत्ये आपणाला वंशाचा दिवा म्हणजे पुत्र लाभावा म्हणून सेंट ॲनसमोर मागणी करतात, तेव्हा पुत्र जन्माला आल्यावरती फेस्ताच्या दिवशी काकड्या अर्पण करून नवसफेड करतात. तवश्यांच्या फेस्तात ख्रिस्ती धर्मियांबरोबर हिंदु कुटुंबेही उत्साहाने सहभागी होतात.
मुळच्या भारतीय असलेल्या काकडीचे उत्पादन आज जगातल्या बऱ्याच देशात घेतले जाते. जुन्या काळातल्या गुहांत केलेल्या उत्खननातून काकडीचे पीक ३००० वर्षांपासून घेत असल्याचे स्पष्ट झाले असून अन्नातला एक घटक म्हणून तिचा वापर होत असल्याचे दिसून आलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.