Goa Cricket: 'फायटिंग स्पिरिट' कुठे गेलं? गोवा संघाचा 'फ्लॉप शो'; रणजीतील सलग 4 पराभवांमुळे ओढावली नामुष्की

Goa Ranji Cricket : कोणत्याही संघाला जिंकण्याकरता वा सामना वाचविण्याकरता मानसिक शक्तीबरोबरच लढण्याची कुवतही आवश्यक असते.
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy Goa : कोणत्याही संघाला जिंकण्याकरता वा सामना वाचविण्याकरता मानसिक शक्तीबरोबरच लढण्याची कुवतही आवश्यक असते. इथेच गोमंतकीय खेळाडू कमी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत संघाला नामुष्कीचा सामना करावा लागत आहे.

सय्यद मुश्ताक अली वीस षटकांची स्पर्धा व विजय हजारे एक दिवसीय स्पर्धा यांसारख्या देशांतर्गत महत्त्वाच्या स्पर्धांत पानिपत झाल्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेतसुद्धा गोव्याच्या क्रिकेट संघाला नामुष्की पत्करावी लागली आहे. आठ संघाच्या एलिट ‘ब’ गटात गोव्याचा सहावा क्रमांक लागला आहे. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेश, सौराष्ट्र, महाराष्ट्र व केरळकडून सलग चार पराभव स्वीकारावे लागल्यामुळे गोमंतकीय क्रिकेटच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

खरं तर गोवा क्रिकेटने रणजी करंडक स्पर्धेची सुरुवात झकास केली होती. पहिल्या तीन सामन्यात एक विजय व दोन अनिर्णीत निकालामुळे गोव्याचे ११ गुण झाले होते. पण नंतरच्या चार सामन्यात सलगपणे हार पदरात पडल्यामुळे या गुणात भर पडू शकली नाही. आणि त्यामुळे क्रमांकातही घसरण सुरू झाली. आणि शेवटी गोव्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

आता प्रत्येक स्पर्धेत गोव्याचा क्रिकेट संघ असा मागे का पडतो आहे यावर जीसीएने विचार करणे आवश्यक आहे. रणजी करंडक स्पर्धा ही देशातील एक अतिशय महत्त्वाची स्पर्धा. पूर्वी या स्पर्धेच्या आधारावरच क्रिकेटपटूंची भारताच्या कसोटी क्रिकेट संघात निवड व्हायची. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू या रणजी करंडक स्पर्धेच्या मुशीतूनच तयार झाले आहेत.

Goa Cricket Team
Goa Dangerous Dog Policy: 'हिंसक श्‍वान प्रतिबंध' धोरण कागदावरच, एका वर्षानंतरही अंमलबजावणीबाबत उदासीनता कायम

पण नंतर कसोटी क्रिकेटची जागा एक दिवसीय सामन्याने घेतल्यामुळे विजय हजारे एक दिवसीय चषक स्पर्धा सुरू झाली. पण तरीही रणजी स्पर्धेचे महत्त्व कमी झालेले नाही. भारतीय संघात येऊ पाहणारे अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू या स्पर्धेचा आजही आसरा घेताना दिसतात. पण या स्पर्धेतील गोव्याचे स्थान मात्र दिवसेंदिवस मागे पडायला लागले आहे. अगदी उपांत्य फेरी गाठणे हे गोव्याला स्वप्नासारखे वाटायला लागले आहे. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे फलंदाजी व गोलंदाजीत नसणारे सातत्य.

भारतीय संघाचे दार ठोठावू शकणारा असा एकही क्रिकेटपटू सध्याच्या गोव्याच्या संघात दिसत नाही हे कटू असले तरी सत्य आहे. काही खेळाडूंनी खास करून पाहुण्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली तरी ती कामगिरी जिंकायला पुरेशी नव्हती हेही तेवढेच खरे आहे. अभिनव तेजराणा यांनी चार शतके झळकावली तर ललित यादव यांनी चंदीगड विरुद्ध द्विशतक नोंदवले.

गोव्याच्या सुयश प्रभू देसाई यांनी एक शतकासह ४१८ धावा करून आपली चमक दाखविली. गोलंदाजीत सगळ्यात सरस ठरला तो गोव्याचा दर्शन मिसाळ. त्यांनी सात लढतीत एकूण २३ बळी मिळवले. पाहुणा गोलंदाज ललित यादव यांनीही १७ बळी प्राप्त केले. तर वासुकी कौशिक व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुत्र अर्जुन यांनी प्रत्येकी १५ बळी मिळवले. मात्र अर्जुन बराच महागडा ठरला. पन्नाशीच्या सरासरीने त्यांनी या विकेट्स प्राप्त केल्यामुळे विकेट्स मिळवूनही संघ नुकसानीत गेला. पण चार सलग पराभवामुळे वैयक्तिक कामगिरी झाकोळली गेली यात संदेहच नाही.

Goa Cricket Team
Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

शेवटच्या चार सामन्यांत गोव्याच्या खेळाडूंची ’फायटिंग स्पिरिट’ अजिबात दिसली नाही. केरळ विरुद्धच्या सामन्याचेच उदाहरण घ्या. केरळने पहिल्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात गोव्याची फलंदाजी कोसळल्यामुळे केरळला आरामात विजय मिळवता आला. दिवसभर खेळून काढला असता तर गोवा हा सामना वाचवू शकला असता. पण प्रत्येकाला तंबूत परतण्याची घाई झाल्यामुळे तोपर्यंत शेवटच्या स्थानावर असलेला केरळ संघ हा सामना जिंकून पाचव्या क्रमांकावर झेप घेऊ शकला.

कोणत्याही संघाला जिंकण्याकरता वा सामना वाचविण्याकरता मानसिक शक्तीबरोबरच लढण्याची कुवतही आवश्यक असते. इथेच गोमंतकीय खेळाडू कमी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत संघाला नामुष्कीचा सामना करावा लागत आहे.

यामुळेच दिलीप सरदेसाईनंतर एकही गोमंतकीय खेळाडू भारतीय संघाचा भाग बनू शकलेला नाही. आणि असेच जर चालू राहिले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धात स्थान मिळवण्याचे सोडाच स्थानिक स्पर्धातसुद्धा आपल्या संघाला किंमत राहणार नाही. म्हणूनच पुढील वर्षाकरता जीसीएने आताच पावले उचलण्याचे बघितले पाहिजे. अन्यथा संघावर जो कमकुवतपणाचा डाग लागला आहे तो कधीच धुऊन जाऊ शकणार नाही हे निश्चित.

मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com