विनाशकाले... काँग्रेसने आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करावे; अग्रलेख

Goa Politics: जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने आपल्या पाठीशी राहावे, असे लोकांना वाटते; कॉंग्रेसला मात्र तशी बुद्धी होत नाही.
amit patkar and girish chodankar
amit patkar and girish chodankarDainik Gomantak
Published on
Updated on

सरकार, सत्ता पक्ष जेवढा लोकशाहीत महत्त्वाचा असतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. त्यांचे कार्य फक्त विरोध करणे एवढेच मर्यादित नसते. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची सर्वांत मोठी जबाबदारी विरोधकांवर लोकांनी सोपवलेली असते. सत्तेची ऊब नाही, म्हणून निष्क्रिय होणे विरोधी पक्षाचे काम नाही. उलट सत्ताधाऱ्यांचा वचक बसेल असा धाक निर्माण करणे हे खरे विरोधी पक्षाचे काम आहे.

सत्तेतून कुणी खाली खेचू शकत नाही, इतपत खात्रीशीर संख्याबळ, बहुमत असले, की सरकार जरी लोकांनी निवडून दिलेले ‘लोकशाही’तले असले तरी ते हुकूमशाहीत परिवर्तित होते. चेहरामोहरा लोकांसाठी सगळे करत असल्याचा घेतला जातो, पण ‘हम करे सो कायदा’ ही अंतर्बाह्य वृत्ती असते. ज्यांनी मत दिल्याने निवडून आले, त्या स्थानिक लोकांचे मत काय आहे, हे अजिबात विचारात घेतले जात नाही. ‘पक्षश्रेष्ठी’, ‘न्यायालयाचा आदेश’ वगैरे वाक्ये परवलीची होऊ लागतात. आज गोवा याच निरंकुश सत्तेमुळे प्राप्त मुजोरीचे परिणाम भोगत आहे.

amit patkar and girish chodankar
Goa Monsoon 2025: धारबांदोड्यात सर्वाधिक, मुरगावात सर्वात कमी; मान्सून कालावधीत गोव्यात 123 इंच पावसाची नोंद

ड्रग्जमुळे होणारे विद्यार्थ्यांचे मृत्यू, रामा काणकोणकरांसारख्या समाज कार्यकर्त्यांना झालेली मारहाण, पर्यावरणाची हानी करून होऊ घातलेले दुपदरीकरण, असे असंख्य विषय आहेत, ज्यासाठी लोकांना धीर देण्याची, आधार देण्याची गरज आहे; पण देशभरात प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस गोव्यात अशा प्रसंगी लोकांना दिलासा, धीर देण्याचे, त्यांचा आवाज बनण्याचे सोडून अध्यक्षपदाची भांडणे सोडवण्यात गुंतला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती ओळखून लोकांकडे धाव घेतली पाहिजे ते कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्षपदासाठी आपापसांत भांडत आहेत.

अध्यक्ष कोण आहे, याचे महत्त्व लोकांच्या लेखी शून्य आहे. लोकांना आपले मुद्दे, आपल्या समस्या, ज्या परिस्थितीतून जावे लागत आहे ती परिस्थिती, केवळ विधानसभेतच नव्हे तर सर्व गोमंतकीयांना कुणी तरी सांगावी असे वाटते. त्यांची वेदना, संवेदनक्षम मनाने कुणीतरी ऐकावी, जखमांवर फुंकर घालावी, असे अतिशय तीव्रतेने वाटते. नेमके याच वेळी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते स्वत:च्या मानभावीपणा, मोठेपणा मिरवण्यात गुंग आहेत.

विरोधी पक्ष नेते असताना लोकांचे मुद्दे विधानसभेत, मीडियासमोर, लोकांसमोर बैठका घेत प्रभावीपणे मांडल्याची फलश्रुती म्हणून भाजपच्या हाती सत्ता लोकांनी सोपवली. त्या विश्‍वासाला ते जागले नाही, असे म्हणायचे तर विरोधी पक्ष तरी आपल्या कर्तव्याला कुठे जागत आहे?

राजकीयदृष्ट्या अजिबात आवश्यकता नसतानाही एखाद्या मशीनरीसारखे सत्तापक्षाचे नेते, कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकांना भेटी देणे सुरू झाले आहे.

amit patkar and girish chodankar
ZP Election: शिरोडकरांनंतर काँग्रेसची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झालीय; शिरोड्यात भाजप हॅटट्रिक करणार?

दीड वर्षांवर निवडणूक येऊन ठेपल्याची लगबग कॉंग्रेस वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांत दिसते. आरोप, चौकशी, कारावास, सत्ताबदल घडूनही आप गोव्यातील निवडणुकांसाठी तयारीस लागला आहे. केजरीवाल गोव्यात येत आहेत. ३३ आमदारांचे भक्कम पाठबळ लाभूनसुद्धा भाजपचे अमित शहा डेरेदाखल होणार आहेत. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तालुका पातळीवर बैठका, सभा घेत लोकांजवळ जात आहेत. त्यांच्या समस्या, प्रश्‍न यांना सातत्याने वाचा फोडत आहेत. रामा काणकोणकरांनी ते भेटले.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत कॉंग्रेसच्या एका तरी राष्ट्रीय नेत्याने गोव्यास भेट दिली आहे काय? गोव्यात इतकी कांडे घडली, त्याविषयी राष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटवल्या काय? स्वहिताचे, राजकीय अस्तित्वाचे गांभीर्य नसलेला शक्तिहीन पक्ष ही कॉंग्रेसची गोवा राज्य स्तरावर ओळख बनत चालली आहे. सत्तालोलुपता इतकी प्रबळ आहे, की कार्यकर्त्यांसकट पक्षांतर ही सामान्य बाब आहे. राजकीय इच्छाशक्ती मेली आहे. ही मरगळ घालवण्याची शक्ती म्हणजे पक्षाची नाळ लोकांशी पुन्हा जोडणे.

amit patkar and girish chodankar
75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेशी केले लग्न; पहिल्या रात्रीनंतर नवऱ्याचा झाला मृत्यू

त्यासाठी त्यांना समजून घेणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, बळ देणे, जनआंदोलन करणे, लोकांच्या स्थानिक प्रश्‍नांना राज्यभर मंच उपलब्ध करून देणे, वेगवेगळ्या स्तरावर लोकांचे प्रश्‍न मांडणे, त्या प्रश्‍नांना उत्तरे मिळवून देणे, सरकार लोकांच्या-पर्यावरणाच्या-गोव्याच्या विरोधात घेत असलेल्या निर्णयांची माहिती लोकांना देणे, लोकांच्या जमिनी दिल्लीतील धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडणे, दबावगट निर्माण करणे, सत्तानुकूल व तितक्याच बेफिकीर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जागे करणे, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रे, टीव्ही यांच्या माध्यमातून सतत व्यक्त होणे अत्यावश्यक आहे.

यात अन्य विरोधी पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस कुठेच नाही. स्वत:च्या स्वार्थासाठीही नाही आणि जनहितासाठीही नाही. सत्ताधाऱ्यांच्या मुजोर वागण्याला जेवढे ते जबाबदार असतात, तेवढाच - किंबहुना त्याहूनही जास्त - निष्क्रिय विरोधी पक्ष जबाबदार असतो. गत काही वर्षांतील अपयशाने कॉंग्रेस पक्ष इतका खचून गेलाय, की लढण्याची इच्छाही संपली आहे. अवघा हलकल्लोळ करावा असे मुद्द्यांचे शस्त्र बघावे तिथे स्पष्ट दिसत आहे.

पण ते मुद्दे उचलून लढावे अशी क्षात्र वृत्ती नावालाही नाही. हरण्याआधी हरणारे, जिंकले तरी हरतातच. अद्याप वेळ गेली नाही. कॉंग्रेसने आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करावे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने आपल्या पाठीशी राहावे, असे लोकांना वाटते; कॉंग्रेसला मात्र तशी बुद्धी होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com