Goa Congress: काँग्रेस गोव्यात आक्रमक होऊ शकेल?

Goa Congress Politics: तसेच हवेत उडण्याचे न थांबविल्यास खासदार विरियातो यांनी म्हटल्याप्रमाणे आगामी निवडणुकीत २७ जागा दूरच राहिल्या; कॉंग्रेसच्या १० जागासुद्धा येणे कठीण होईल, हे निश्चित.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

विधानसभा निवडणुका आता वर्षाच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी निवडणुकीकरता रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. काँग्रेस हा तसा गोव्यातील एक प्रमुख पक्ष.

२०१२पर्यंत काँग्रेसची गोव्यात सत्ता होती. पण २०१२साली काही चुकीच्या धोरणांमुळे गोव्यात कॉंग्रेसचे पानिपत झाले. त्यानंतर २०१७साली सर्वांत मोठा पक्ष असूनसुद्धा काही ज्येष्ठ आमदारांच्या बोटचेप्या वृत्तीमुळे काँग्रेस पक्ष गोव्यात सरकार स्थापन करू शकला नाही आणि इथूनच काँग्रेसचा राज्यात उलटा प्रवाह सुरू झाला.

२०२२साली विरोधी पक्षांची आघाडी नसल्यामुळे काँग्रेसचे फक्त ११ आमदारच निवडून येऊ शकले. पण त्यातले आठ आमदार भाजपच्या गळास लागल्यामुळे आता काँग्रेसजवळ फक्त तीनच आमदार शिल्लक राहिले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आगामी निवडणुकीचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. पण त्यातही सुसूत्रता आहे, असे वाटत नाही.

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी ’एकला चलो रे’चा सूर आळवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर गोव्यात २७ जागा जिंकू शकतो, असे त्यांचे म्हणणे. पण दक्षिण गोव्याची जागा जिंकण्याकरता खुद्द कॅप्टन विरियातोंना आम आदमी व गोवा फॉरवर्डची मदत घ्यावी लागली होती हे ते विसरलेले दिसताहेत.

काँग्रेसने २०२४साली लोकसभेची निवडणूक एकट्याने लढविली असती तर दक्षिण गोव्यात भाजप आरामात जिंकला असता याकडेही ते दुर्लक्ष करताना दिसताहेत. याला अतिआत्मविश्वास म्हणावा, की ‘विनाशेकाले विपरीत बुद्धी’ म्हणावे हेच कळत नाही.

आज गोव्यात काँग्रेसची शक्ती पूर्वीसारखी राहिलेली नाही हे कोणीही सांगू शकेल. त्याचे मुख्य कारण म्हणजे सशक्त नेतृत्वाचा अभाव. पूर्वी काँग्रेसजवळ रवि नाईक, दिगंबर कामत, सुभाष शिरोडकर यांसारखे प्रभावी नेते होते. या नेत्यांच्या जोरावर काँग्रेस ‘हनुमान उडी’ घेत असे. पण आज काँग्रेसची स्थिती बरीच नाजूक बनली आहे.

एका सासष्टी तालुक्याचा अपवाद वगळता इतर तालुक्यातील काँग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस कमी होताना दिसायला लागला आहे. फोंडा तालुक्याचेच उदाहरण घ्या. या तालुक्यातील फोंडा व शिरोडा हे दोन मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून गणले जायचे.

रवि नाईक काँग्रेसमध्ये असताना फोंड्यात काँग्रेसने कधीच मागे वळून बघितले नाही. १९९९ ते २०१७पर्यंत २०१२चा अपवाद वगळता इथे काँग्रेसच विजयी होत गेली. २०१२ साली काँग्रेसचा पराभव झाला तो त्यावेळी झालेल्या विरोधी पक्षांच्या ऐक्यामुळे.

पण त्यावेळीही काँग्रेसला ९,४३५ मते पडली होती हे विसरता कामा नये. पण २०२२साली रवि नाईक भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला पराभव तर पत्करावा लागलाच; त्याचबरोबर मतांची संख्याही घटली. यावेळी काँग्रेसला फक्त ६,८४० मतावर समाधान मानावे लागले.

नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुकीत तर फोंडा मतदारसंघातील कुर्टी मतदारसंघात काँग्रेसला फक्त १,८७५ मते प्राप्त झाली आहेत. यातून या मतदारसंघातील काँग्रेसची होत चाललेली अधोगती स्पष्ट होते.

शिरोडा मतदारसंघातही सुभाषभाऊ भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसची अवस्था ’न घर का न घाट का’ अशी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यातूनच खरे तर कॅप्टन साहेबांना आपल्या पायाखाली काय जळते आहे हे कळायला हवे होते. पण तशी जाणीव झालेली दिसत नसल्यामुळे ते झोपले आहेत, की झोपायचे सोंग घेत आहेत हे कळायला काही मार्ग नाही.

दुसऱ्या बाजूला, नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत बळकट मतदारसंघ राखूनच आघाडी करू असा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘बळकट’ म्हणजे काय हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

आज जिथे काँग्रेस स्वतःला ‘बळकट’ समजत आहे तिथे आप, गोवा फॉरवर्ड यांनीही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे हेही लक्षात घ्यायला हवे. गोवा फॉरवर्डच्या युतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुकीत काँग्रेसला ११ जागा मिळू शकल्या हेही विसरता कामा नये.

वेगवेगळे लढल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणून झेडपीच्या खोर्ली मतदारसंघाकडे बोट दाखवावे लागेल. तिथेही जर कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड एकत्र आले असते तर भाजपचा पालापाचोळा झाला असता हे मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

आता याच बैठकीत काँग्रेसने गोव्यात आक्रमक होण्याचा निर्णयही घेतला आहे. मग इतके दिवस आक्रमक होण्यापासून त्यांना कोणी अडवले होते, हा प्रश्न उपस्थित होतोच.

आज राज्यात अनेक प्रश्न आहेत, सरकारविरोधी वातावरणही आहे. पण एक विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आक्रमक झालेली कधीही दिसली नाही. फोंड्याकडेच बघा. फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळात आवश्यक आरोग्यसेवांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना मडगाव वा पणजीला पाठवले जात आहे.

मध्यंतरी खासदार विरियातो व विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव यांनी या हॉस्पिटलला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. आंदोलन करण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. पण पुढे काहीच झाले नसल्यामुळे या हॉस्पिटलातील समस्या तशाच कायम आहेत.

परवा युवा काँग्रेसने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेला. पण ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाबाबत मात्र ते मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले. खरे तर आक्रमकता ही फक्त पणजीपुरती न राहता तिचे लोण गावागावांत पसरले पाहिजे. आज राज्यातील अनेक गावांत, शहरांत समस्या ‘मी’ म्हणताना दिसायला लागल्या आहेत.

Goa Congress
Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गेले कुठे?

पण काँग्रेसची अनेक ठिकाणी संघटन बांधणीच नसल्यामुळे तिथे त्यांना कार्यकर्त्यांची वानवा भासत आहे. प्रथम ही समस्या दूर करण्याचे पक्षाने बघितले पाहिजे. आजही राज्यात काँग्रेसचे मतदार आहेत; नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांना बांधून ठेवू शकणारा असा नेता नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर आपल्या शक्तीची जाणीव ठेवणे तेवढेच आवश्यक आहे.

नाहीतर ‘इनामदारी गेली पण मिश्यांना तूप लावण्याची सवय गेली नाही’ असा प्रकार होऊ शकतो. हे पाहता राज्यात विरोधी पक्षांची आघाडी ही काळाची गरज होऊ शकते. त्याचबरोबर आघाडी करताना दोन पावले मागे सरण्याची तयारीही काँग्रेसने ठेवायला पाहिजे हेही तेवढेच खरे आहे.

Goa Congress
Goa Politics: खरी कुजबुज; गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद

शेवटी भाजपसारख्या नियोजनबद्ध कार्य करणाऱ्या सशक्त पक्षाशी गाठ आहे हे काँग्रेसने पूर्णपणे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व गोष्टीची जाणीव न ठेवल्यास, तसेच हवेत उडण्याचे न थांबविल्यास खासदार विरियातो यांनी म्हटल्याप्रमाणे आगामी निवडणुकीत २७ जागा दूरच राहिल्या; काँग्रेसच्या १० जागासुद्धा येणे कठीण होईल, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com