Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गेले कुठे?

Khari Kujbuj: गोव्यात समुद्रात भरती-ओहोटी वेळेवर होते, पण जीसीझेडएमएच्या कारवाईची भरती कधी येते आणि ओहोटी कधी जाते, हे मात्र खगोलशास्त्रज्ञांनीही सांगावे लागेल बहुतेक!
Goa Latest Political News
Goa Latest Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोविंद गेले कुठे?

प्रियोळचे आमदार गोविंद गावडे कुठे होते, असा प्रश्न शुक्रवारी निर्माण झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन पणजीत असताना आणि त्यांनी मंत्री आमदारांची बैठक घेतली असताना त्यात गावडे सहभागी झाले नसल्याने ते कुठे आहेत?अशी विचारणा होत होती. गावडे शुक्रवारी पुणे येथे पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्ताने होते. ते शुक्रवारी रात्री गोव्यात पोचले. त्यामुळे आज ताळगाव येथे होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात ते सहभागी होतील का? याकडे अनेकांच्या नजरा असतील. ∙∙∙

जीसीझेडएमएकडे नव्हे, समुद्राकडे आशा!

गोव्यात समुद्रात भरती-ओहोटी वेळेवर होते, पण जीसीझेडएमएच्या कारवाईची भरती कधी येते आणि ओहोटी कधी जाते, हे मात्र खगोलशास्त्रज्ञांनीही सांगावे लागेल बहुतेक! राज्यभर सध्या एकच चर्चा आहे की हे प्राधिकरण खरंच काम करतं की फक्त फाईलांना समुद्रकिनारी फिरायला नेतं? तक्रारदार म्हणतात, आदेश निघतो, कामाचा शिक्का बसतो. पण मग पुढे काय? इमारत मात्र उभी, जणू आदेश वाचूनच तिने पाया घट्ट रोवला! पण इथे हातोडा नाही, फक्त हातावर हात ठेवून ‘प्रक्रिया सुरू आहे’ अशी शाश्वत घोषणा. लोकांचा विश्वास इतका ढासळलाय, की आता तक्रार करण्यापेक्षा लोक थेट समुद्रालाच सांगतात, ‘तूच बघ रे बाबा, किनाऱ्यावर काय चाललंय!’ कारण किमान समुद्र तरी कधी ना कधी आपली मर्यादा दाखवतो. आता मात्र चर्चेचा सूर बदलतोय ‘साहेबांनो, एकदातरी आदेश म्हणजे आदेश असतो हे दाखवून द्या. पाडकामं वेळेत झाली, तर लोक पुन्हा विश्वास ठेवतील.’ नाहीतर जीसीझेडएमए म्हणजे “जाईल, पाहील, चर्चा करील, मग शांत बसेल” असं नवं लोक ठेवायला तयार बसलेत म्हणे! ∙∙∙

मगोची युती

प्रियोळमधून मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर विधानसभा निवडणूक लढतील, असे अनेकजण छातीठोकपणे सांगत आहेत. तेथे सध्या भाजपचे आमदार गोविंद गावडे आहेत. शुक्रवारी मगोचे नेते दीपक व सुदिन ढवळीकर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले. या भेटीनंतर त्यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजप मगोची युती कायम असेल असे नमूद केले आहे. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघ मगोला मिळणार की मगो तो मतदारसंघ मागण्यावरून माघार घेणार, दीपक पूर्ववत शिरोडा मतदारसंघाकडे मोर्चा वळवणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ∙∙∙

जमावबंदी भंग आणि भाजप

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजीत शुक्रवारी लागू केलेली जमावबंदी ही केवळ चिंबल आंदोलकांपूर्ती होती, असा भाजपने समज करून घेतला होता. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे स्वागत करताना त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. हा आदेश सर्वांनाच लागू नव्हता, असे भाजपने दाखवून दिले आहे. त्याशिवाय जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात पूर्व परवानगीने जमावबंदी आदेशातून मुभा मिळू शकते, असा उल्लेख असताना उद्या काही जटील प्रश्न निर्माण झाला, तर आम्ही परवानगी घेतली होती, हे दाखवण्याची तयारीही सत्ताधाऱ्यांनी केली आहे. ∙∙∙

दामूंची ताकद वाढली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन काल राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यात सरकार व पक्ष संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती. बैठकाही शिस्तीत पार पडल्या. कोणीही बेसूर लावला नाही. सारेकाही सुरळीत झाले. यामागे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची कल्पकता होते. आठवडाभर ते यासाठी नियोजन करत होते. मंडळ अध्यक्षांची बैठकही त्यांनी घेत सूक्ष्मपणे नियोजन केले होते. कोणत्या बैठकीत कोण काय बोलेल आणि कोण काय बोलणार नाही, याचेही नियोजन होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पूर्णवेळ पक्ष कार्यासाठी उपलब्ध होते. सर्वांनी मिळून नवीन यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी परीक्षम घेतले. यातून दामू यांचे संघटन कौशल्य राष्ट्रीय अध्यक्षांच्या नजरेतून सुटलेले नसेल. दामू यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच दौरा कमालीचा यशस्वी करू शकतो, हे करून दाखवले आहे. दिल्लीत त्यांची वट वाढण्यासाठी हा दौरा निश्चितच उपयोगी ठरला असे काल दिसून आले. आजच्या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनातून त्यावर शिक्कामोर्तबच होईल, असे बोलले जाते. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद

रवींमुळे विकसित फोंडा!

फोंड्याच्या विकासासाठी रवी पात्रांवने मोठे प्रयत्न केले. त्यामुळेच विकसीत फोंडा आज दिसतो. विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरूच राहणारी आहे, त्यामुळे इतर कामेही सध्या सुरू आहेत. ही कामे रवी पात्रांवच्या कारकिर्दीतील असून त्याचा पाठपुरावा आता त्यांचे नगरसेवक रितेश नाईक घेत आहेत. हवेली - कुर्टी येथे पदपथ सुशोभीकरणाचे काम सुरू असून कालच रितेश नाईक यांनी या कामाची पाहणी केली आणि कंत्राटदाराला आवश्‍यक सूचनाही केल्या. आता निवडणूक कधीही होऊ दे, पण वडिलांचे शिल्लक काम आपण पूर्ण करणार, अशी ग्वाही रितेश नाईक यांनी यापूर्वीच दिली होती, त्याचीच ही झलक. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

फोंड्यात इच्छुकांची गर्दी!

फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. सध्या तरी सत्ताधाऱ्यांकडून रितेश नाईक किंवा विश्‍वनाथ दळवी असा पर्याय आहे, तर काँग्रेसकडे राजेश वेरेकर यांचा पर्याय आहे. मगो आणि भाजपची युती असल्याने मगोचा उमेदवार उभा करणे शक्य नाही. तरीही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवेळी बंडाळी झाली तशी झाली तर कदाचित भाजपला ते जड जाऊ शकते. सध्याच इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी मगोकडून बंडाळी होऊ नये, यासाठी भाजपचे राजकीय तज्ज्ञ कार्यरत झाले आहेत. या पोटनिवडणुकीनंतर नूतन आमदाराला केवळ आठ ते नऊ महिनेच मिळणार आहेत, हे विशेष. कारण पुढील विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com