Goa Politics: खरी कुजबुज; गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद

Khari Kujbuj: सरकारने नव्याने स्थापन केलेल्या पाणी पुरवठा खाते कामाला लागले आहे. आता मोठी हालचाल या खात्यात दिसून येईल. राज्यभरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद!

‘सुशेगाद’ या शब्दाचा अर्थ आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी भलताच घेतला असावा, अशी शंका येते. उच्च शिक्षणाचे मापदंड ठरविणाऱ्या ‘युजीसी’ ने अनुसूचित जाती ,जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांना समानता देण्याच्या नावाने वादग्रस्त कायदा लागू केल्यामुळे संपूर्ण देशातील सामान्य गटातील विद्यार्थी रस्त्यावर उतरवून सरकार विरोधात व ‘युजीसी’च्या विरोधात आंदोलन करण्यात दंग होते. या आंदोलनामुळे उच्च न्यायालयाने त्या वादग्रस्त निर्णयाला तूर्त स्टे दिला आहे. प्रश्न तो नाही, ज्या निर्णयाच्या विरोधात देशातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते तेव्हा आपले गोमंतकीय विद्यार्थी मात्र स्वस्थ होते. गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळावर विरोधी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांची सत्ता असूनही गोवा विद्यापीठात ‘युजीसी’ विरोधात आंदोलन का पेटले नाही? असा प्रश्न आम्ही नव्हे, सामान्य गटातील विद्यार्थी विचारीत आहेत. ∙∙∙

बाबूश यांचा संदेश कुणाकुणाला?

महानगरपालिकेच्या निवडणुकीचे इच्छुकांसह आजी-माजी नगरसेवकांना वेध लागले आहेत. परंतु मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याशी सूत जुळवलेले उदय मडकईकर रिंगणात असणार की नाही, याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रभागात मोन्सेरात यांचे सरकारी कामांव्यतिरिक्त अनेक इतर कामे हातोहात पूर्ण करणाऱ्यास उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष बाब म्हणजे काही नगरसेवकांना बोलावून हळुवारपणे ‘कामाला लाग’ असा संदेश स्वतः बाबूश यांनी दिल्याचा संदेश रायबंदरपर्यंत पोहोचला आहे. काही प्रभागात दोन-दोन समर्थकांपर्यंत हा गोपनीय संदेश पोहोचला आहे, पण ज्यांना उमेदवारीची खात्री होती, त्यांची मात्र या संदेशामुळे झोप उडाली आहे. त्यामुळे ते स्वतः आपल्यालाच उमेदवारीची खात्री नसल्याचे सांगत असले तरी बाबूश यांनी डावलल्यास काही इच्छुकांनी विरोधी उत्पलच्या गटातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारीही केली आहे. ∙∙∙

चर्चिल दिल्‍लीत

येत्‍या विधानसभा निवडणुकीत आपण किंवा आपली कन्‍या वालंका आलेमाव यापैकी एकाला आमदार करणारच या जिद्दीने पेटून उठलेले बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव हे सध्‍या दिल्‍लीत ठाण मांडून आहेत. त्‍यांच्‍याकडे कुणी या संदर्भात संपर्क साधला तर आपल्‍या वैयक्‍तिक कामामुळे आपण दिल्‍लीला गेलो आहे, असे चर्चिल सांगतात. मात्र त्‍यांचे समर्थक येथे बाणावलीत वेगळेच सांगतात. निवडणुकीसाठी सेटींग करण्‍यासाठीच चर्चिल दिल्‍लीला गेले आहेत, असे त्‍यांचे समर्थक सांगू लागले आहेत. एकाबाजूने मिकी पाशेको काँग्रेसला एका महिन्‍याच्‍या मुदतीची ताकीद देत असताना चर्चिलचे दिल्‍लीला जाणे याकडे कुणी राजकीय दृष्‍टीकोनातून पाहिले तर त्‍याला दोष देता येईल का? ∙∙∙

पाणी रे पाणी

सरकारने नव्याने स्थापन केलेल्या पाणी पुरवठा खाते कामाला लागले आहे. आता मोठी हालचाल या खात्यात दिसून येईल. राज्यभरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. देशभरात सरासरी ५५ लीटर प्रतिमाणशी प्रतिदिन पाणी दिले जात असताना गोव्यात १५० लिटर पाणी प्रत्येक माणसामागे पुरवले जाते. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पर्पल फेस्टसारख्या महोत्सवांच्या आयोजनातून नियोजन किती उत्तमरीत्या केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. त्यामुळे ते आता पाणी पुरवठा सुधारण्यासाठी किती यशस्वीपणे नियोजन करतात हे समजणार आहे. ∙∙∙

दिल्लीवारीची फलश्रुती

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व कॉंग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी बैठकासाठी दिल्लीत बोलावले व येथे गोव्यात नेतृत्व बदलाची आशा बाळगणाऱ्या अनेकांनी देव पाण्यांत बुडवून ठेवले. मागचे दोन दिवस जो तो एकामेकांना फोनाफोनी करून बैठकीत काय घडले याचा कानोसा घेत आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तर गोव्यात परत येताच केवळ आपण एकट्यानेच पत्रकार परिषद घेऊन ‘अलायन्स''चे घोडे दामटले आहे. आलेमाव यांनी जी तत्परता दाखवली, त्यातून काँग्रेसजणांनी जो अर्थ काढायचा तो नक्कीच काढलेला असणार आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

युरींना सल्ला!

युरीबाब कॅसिनो नंतर काढा, आधी घातक कचरा साफ करा ! अशी हाक कुंकळ्ळीचे युवा कार्यकर्ते युरी आलेमाव यांना मारायला लागले आहेत. आपले सरकार म्हणजे काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास मांडवी नदीतील सर्व कॅसिनो काढणार, असे आश्वासन युरी आलेमाव यांनी जनतेला दिले आहे. मात्र, गेल्या पंचवीस वर्षापासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचरा साफ करण्यासाठी युरी आलेमाव ठोस आंदोलन छेडत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. युरी आलेमाव यांनी मांडवीतील कॅसिनो काढण्यापूर्वी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचरा साफ करण्यास पुढाकार घ्यावा, असे जनता युरी आलेमाव यांना सांगायला लागली आहे. युरीबाब ऐकतात ना! ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

दौऱ्याचे काटेकोर नियोजन

पंतप्रधान, राष्ट्रपतींचा दौरा असतो त्यावेळी काही अधिकारी दिल्लीतून येतात आणि नियोजनाचा, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतात. त्याच धर्तीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या दौऱ्यापूर्वी आढावा घेण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारी भाजप कार्यालयात बैठक घेत नियोजनावर शेवटचा हात फिरवण्यात आला. यासाठी दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तरुण चुग आले आहेत. त्यांनी यासंदर्भात पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली. मेळाव्याच्या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com