

बेतकी-खांडोळा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पाक्षिक बैठकीला सरपंच श्रद्धा फडते यांच्याव्यतिरिक्त आठही पंचसदस्य अनुपस्थित राहणे, ही साधी घटना नाही. पंचायतीच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याचा दावा माजी पंचसदस्य आणि ग्रामस्थ करीत आहेत. या घटनेने पंचसदस्यांच्या जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. गावाच्या विकासासाठी निवडून आलेले पंच बैठकीलाच उपस्थित राहणार नसतील तर त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय? पंचायतीचा कारभार चालवायचा की केवळ सत्तेची गणिते जुळवायची, असा सवाल उपस्थित होत आहे.
काही पंचसदस्यांना वैयक्तिक कामे असू शकतात. मात्र, एकाच दिवशी आठही सदस्य अनुपस्थित राहणे हा योगायोग निश्चितच चर्चेचा विषय आहे. विरोधकांनी विरोधासाठी बैठकीकडे पाठ फिरवली असेल तरी सत्ताधारी गटातील सदस्यांच्या अनुपस्थितीचे काय? सत्ताधारी गटाचे सदस्यही बैठकीला येणार नसतील तर सत्तेचा उपयोग नेमका कशासाठी? असे पंच जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रपणे उभे राहणार तरी कधी ? असा बोचरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. गेल्या काही महिन्यांपासून पंचायतीत सुरू असलेले अविश्वासाचे राजकारणही (Politics) या अस्थिरतेचे निदर्शक आहे. सुरळीत सुरू असलेल्या कारभारात अविश्वास ठरावाच्या राजकारणाने प्रवेश केला आणि सरपंचपदाभोवती सत्तासंघर्ष सुरू झाला.
कधी सरपंचपद टिकले, तर कधी ते गमावण्याची वेळ आली. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या काळात आयाराम-गयारामांच्या राजकारणानेही स्थानिक समीकरणे बदलली. त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच स्पष्ट होईनासे झाले आहे. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीरणातून विशांत नाईक यांच्यानंतर दिलीप नाईक सरपंच झाले; पण त्यानंतर त्यांनी अवघ्यात काही महिन्यात खुर्ची सोडावी लागली, त्यानंतर सरपंचपदी श्रद्धा फडते विराजमान झाल्या. सर्वकाही सुरळीत चालेले आहे, अशी स्थिती असताना अचानक शनिवारी सत्ताधारी आणि विरोधकांनी पाक्षिक बैठकीकडेच पाठ फिरवली.
हा प्रकार विरोध दर्शनविण्यासाठी होता की बेजबाबदारपणाचा होता, या प्रश्नाचे उत्तर पंच सदस्यांनी द्यायला हवे, असे ग्रामस्थांचे मत आहे. आगामी ग्रामसभेतही या विषयावर पंच सदस्यांना जाब विचारला जाईल, असे मत जागृत नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराचे पडसाद खूपच दूरगामी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या साऱ्या राजकारणात गावाच्या विकासाचा मुद्दा मात्र मागे पडत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, स्थानिक सुविधा आणि नागरिकांच्या तक्रारी यांच्यापेक्षा सत्तेची खुर्ची महत्त्वाची ठरत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे. पंचायतीच्या बैठका राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी नसून गावाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी असतात, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे.
एकीकडे जिल्हा पंचायत सदस्य आणि स्थानिक आमदार मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून विविध विकासयोजना मार्गी लावण्याचे काम करीत आहेत. जनकल्याणाच्या दृष्टीने विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींनीच बैठकीकडे पाठ फिरवणे कितपत योग्य आहे? लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, विरोधाच्या नावाखाली जबाबदारीपासून दूर पळणे योग्य ठरू शकत नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असेल, तर तो बैठकीत उपस्थित राहूनही उठवता येतो. अनुपस्थित राहून गावाचे प्रश्न सुटणार नाहीत, याचे भान पंचसदस्यांनी ठेवणे आवश्यक आहे. आठही पंचांची अनुपस्थिती, त्यामागील अस्पष्ट कारणे आणि बदलती राजकीय समीकरणे पाहता पंचायतीत पुन्हा सत्तेच्या संगीतखुर्चीचा खेळ रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सत्तेसाठी कितीही डावपेच खेळले, तरी जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.
सरपंच एकट्याच बैठकीला उपस्थित राहतात आणि आठ पंच गैरहजर राहतात, ही परिस्थिती पंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता तरी पंचसदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जनतेने त्यांना पंचायतीचा कारभार करण्यासाठी निवडले आहे, सत्तेच्या खेळात प्यादी बनण्यासाठी नव्हे. पंचायतीच्या खुर्च्या जनतेच्या सेवेसाठी आहेत; सत्तेच्या सोयीसाठी नाहीत, हे लोकप्रतिनिधींनी विसरू नये. बेतकी-खांडोळा पंचायतीत सरपंच एकट्याच बैठकीला उपस्थित आणि आठही पंच गायब! हा प्रकार केवळ निषेधाचा आहे की त्यामागे सत्तेचे राजकारण आहे? गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले पंचच बैठकीला फिरकत नसतील, तर त्यांनी जनतेला उत्तर द्यायचे तरी काय? पंचायतीचा कारभार चालवण्याऐवजी राजकीय डावपेच खेळण्यातच पंचांना रस आहे का, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.