Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

Goa Young Filmmakers: देश-विदेशातील विविध विषयांवरचे चित्रपट ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जात आहेतच.
Goa Young Filmmakers
Goa Short Films IFFIDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: देश-विदेशातील विविध विषयांवरचे चित्रपट ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जात आहेतच. मात्र, त्याचबरोबर कथेतर अर्थात ‘नॉन फीचर फिल्म’ विभागात वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट पाहायला मिळत आहेत. गोव्यातील तरुण दिग्दर्शकांचे लघुपट पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह देशभरातील रसिक गर्दी करीत आहेत.

मानवी भावभावना, सामाजिक रूढी, कौटुंबिक परंपरा, नात्यांमधील गुंतागुंत आणि बदलत्या काळातील मानसिक संघर्ष अशा विविध विषयांना हात घालत गोव्याच्या नव्या पिढीने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘इफ्फी’मध्ये यंदा गोव्याचे १२ लघुपट आणि चित्रपट समाविष्ट करण्यात आले आहेत.

Goa Young Filmmakers
Goa Politics: 'मी योग्य तेच केले, निर्णय मतदार घेतील'; मनोज परब यांच्या आरोपांवर बोरकरांचा पलटवार

‘इफ्फी’च्या गोवा चित्रपट विभागाची सुरवात २१ नोव्हेंबरला मंगिरीश बांदोडकर दिग्दर्शित ‘अनेशाँ’ (२०२५) या लघुपटाने झाली. याशिवाय ‘शकुंतला’, ‘पूर्णता’ आणि ‘नॉइज’ हे तीन लघुपट विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ‘शकुंतला’ लघुपटाला पणजीतील आयनॉक्समध्ये रविवारी उत्तम प्रतिसाद मिळाला, तर ‘नॉइज’ आणि ‘पूर्णता’ सोमवारी (ता. २३) दाखविण्यात आले.

प्रसाद नाईक लिखित आणि दिग्दर्शित ‘शकुंतला’ हा अवघ्या ११ मिनिटांचा लघुपट प्रेम, परंपरा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा भावनिक पट उलगडतो. ख्रिश्चन धर्मातील तरुणाशी विवाह केल्यामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या शकुंतलाला वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली जाते. मात्र, बाराव्या दिवशीच्या धार्मिक विधीच्या निमित्ताने ती आपल्या बालपणीच्या घराकडे परतते. कुटुंबाच्या परंपरा, अपराधीपणाची भावना, सामाजिक दृष्टिकोन आणि मनातील ओढ अशा कात्रीत सापडलेल्या तिच्या मनाचा संघर्ष हा लघुपट मांडतो. गोव्यातील मनोरंजन संस्थेसाठी अवघ्या २४ तासांत या लघुपटाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती लघुपटातील कलाकार-तंत्रज्ञांनी दिली.

अवघ्या १९ वर्षांच्या श्रवण काणकोणकर या तरुण चित्रकर्त्याचा ‘पूर्णता’ हा २४ मिनिटांचा लघुपटही लक्षवेधी आहे. जाईच्या फुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी भावभावनांचा प्रवास उलगडणारा हा लघुपट आहे. वेगवेगळ्या आयुष्यांतून प्रवास करताना माणसाला मिळणारा आनंद, दुःख, आशा आणि दिलासा यांचे चित्रण त्यातून केले आहे. गोव्याच्या तरुण चित्रकर्त्यांसाठी लघुपट हे केवळ कमी कालावधीचे चित्रपट नसून, स्वतःच्या कथा आणि अनुभव मांडण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

Goa Young Filmmakers
Goa Politics: 'वीरेश बोरकर यांना जसे घडवले, तसेच राजकारणातून संपवेन'; मनोज परब यांचा थेट इशारा

नात्यांमधील गुंतागुंत मांडणारा ‘नॉइज’

सुविधा तोरगल बखले दिग्दर्शित ‘नॉइज’ हा १५ मिनिटांचा लघुपट मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि मानसिक संघर्षाचा वेध घेतो. तारा या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेम, संघर्ष, अपूर्ण भावना आणि नात्यांमधील विसंवाद यांचे चित्रण करण्यात आले आहे. माणसाच्या स्वभावातील विसंगती, वर्तनातील त्रुटी ओळखण्याची क्षमता आणि त्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष हा चित्रपट अधोरेखित करतो. कमी वेळात आशयाशी जोडून त्यात गुंतवून ठेवण्याचे कसब लघुपटासाठी आवश्यक असल्याचे बखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.