

पणजी: रिव्हॉल्युशनरी पक्ष कुण्या एकट्याचा नाही. हा पक्ष घडवण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. आमदार या नात्याने मी आतापर्यंत योग्य तेच काम केले आहे. त्यामुळे मला संपवायचेच असेल, तर ते काम सांताक्रूजमधील मतदार करतील, असे प्रत्युत्तर आमदार वीरेश बोरकर यांनी मनोज परब यांना दिले.
मनोज परब यांच्यासंदर्भातील ‘चॅप्टर ३’ लवकरच समोर येणार आहे. त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सध्या पक्षात काय सुरू आहे हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे जनताच याबाबत योग्य तो निर्णय घेईल. मनोज परब यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ते बोलत आहेत, पण सांतआंद्रेच्या मतदारांना माझे काम माहीत आहे. शिवाय मी सत्याच्याच मार्गाने चालत आहे. जे पक्षाच्या विचारधारेविरोधात वागले, त्यांना आपण विरोध केला हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझा फैसला तेच करतील, असे बोरकर म्हणाले.
दरम्यान, ‘मी आरजीपीचा बाप आहे,’ असे वक्तव्य परब यांनी रविवारी केले होते. त्यावर बोलताना, ‘‘बापाने चोरी केली, तरी तो चोरच ठरतो आणि त्यावेळी बोलावेच लागते. पक्षात फूट पडली, त्याचे मलाही दुःख झाले. पण, सर्व गोष्टी मनात ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे’’, असेही त्यांनी नमूद केले.
परब यांचा आरजी प्रवेश अवैध
आरजीचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी मनोज परब यांच्याकडून कोणताही अधिकृत अर्ज प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या आरजीतील प्रवेशाबाबत करण्यात आलेली घोषणा अवैध आहे, असे पत्रक आरजीच्या प्रदेशाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर यांनी जारी केले आहे. परब यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया पक्षाच्या निर्धारित संघटनात्मक नियमांनुसार पूर्ण करण्यात आलेली नाही किंवा पक्षाच्या सक्षम प्राधिकरणाकडून त्यास कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नाही, असेही बोरकर यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.