

राजू नायक
गोवा विधिमंडळाचे झालेले पतन रोखण्यासाठी कोणी दैवी अवतार जन्म घेणार नाही; मतदारांनाच कंबर कसून झोकून देऊन काम करावे लागणार आहे. आपला विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पवित्र लढा उभारावा लागणार आहे. त्यासाठी ऐक्य घडवावे लागेल. चळवळी उभाराव्या लागतील. जातपात, आमिषे यांचा त्याग करून एकदिलाने मतदान करावे लागेल...
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे ढोल ताशे चांगलेच वाजू लागले आहेत. पहिल्यांदाच पाच-सहा महिन्यांपूर्वी अशी वातावरण निर्मिती झाली आहे. चतुर्थीच्या वातावरणातही राजकारणाची गरम हवा निर्माण होताना दिसते आहे. मी माझ्या गेल्या दोन लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे चतुर्थीचे दिवस राजकारणासंदर्भात गंभीर चर्चा करण्यासाठी वापरायला हवेत, हे आवाहन काहींनी फारच गांभीर्याने घेतल्यासारखे वाटले. लोकांनी खरोखरीच चतुर्थीच्या काळात राजकारणाबद्दल गांभीर्याने विचार केला असेल, केवळ नेत्यांना वठणीवर आणणे नव्हे, राजकीय पक्षांना समज देण्यासाठी नव्हे तर मतदारांनाही जागृत करण्यासाठी वेळ खर्च केला असेल तर गोव्याला खरोखरीच गणपती पावला, असे म्हणावे लागेल.
गणपती हा बुद्धीचा देव. गोव्याचे अस्तित्व, गोवेकरांचे स्थान याबद्दल आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीय. कारण आम्ही सर्वांनी गोव्याला अस्तित्वाच्या कडेला आणून उभे केलेय. उगाच नेत्यांना का दोष द्या! लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे नेते आणि सरकार मिळते. ते जर खरे असेल तर आम्ही आमचीही लायकी तपासायला नको? आम्ही सुशिक्षित, बुद्धिमान म्हणवून घेतो, परंतु आम्ही उमेदवारांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास, संविधान, विधिमंडळातील कर्तव्ये याबद्दल त्याचे आकलन, जबाबदारी समजून, पारखून मत देतो का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही विशिष्ट कारणांसाठी मतदान करतो आणि थोड्या काळात तो उमेदवार पक्षांतर करतो. उलट साळसूदपणाचा आव आणून मतदारांसाठीच आपण पक्षांतर केल्याचा दावा करतो. त्याला आपण कधीही जाब विचारायला जात नाही. विरोधी पक्षात आपली कामे होत नाहीत, असे त्याचे म्हणणे असते.
लोक आमदाराकडे कामे करून घ्यायला जातात यात तथ्य आहे. कसली कामे? त्यातील बहुतांश कामे बेकायदेशीर असतात. त्यातील एक असते, सरकारी नोकरी. गोव्यात सरकारी नोकरीचे प्रमाण- घराघरात एक नोकरी-घरटी एक रोजगार. असे बनले आहे. ही सारी खोगीरभरती आहे. प्रशासनात मोजके काही लोक सोडले तर इतर नालायक आहेत. कामे न करण्यासाठी, तंगड्या वर करून बसण्यासाठी त्यांना रोजगार हवा आहे. गोव्यात बेरोजगारी आहे, अशी एक आकडेवारी आहे. देशातील सर्वांत अधिक आठ टक्के बेरोजगारी गोव्यात आहे, असे सर्वेक्षणवजा जाहीर आकडेवारीत दाखवण्यात आले आहे. परंतु खासगी क्षेत्राला विचारा ते तुम्हाला सांगतील गोवेकर मिळत नाहीत.
कारण कोणाला श्रमाची कामे करायला नकोत. खासगी क्षेत्राची खंत आणि अडचण गोव्याची सर्वात मोठी समस्या म्हणून आम्हाला लक्षात घ्यावीच लागेल. अवघे काही मोठे उद्योग सोडले तर गोव्यातील मध्यम आकाराच्या कारखानदारांना कर्मचारी-कामगार मिळत नाहीत. गोवा विधानसभेत दिव्या राणे यांनी ही समस्या वेगळ्या पद्धतीने मांडली. त्या म्हणाल्या, बसेस भरून बाहेरच्या राज्यातून कर्मचारी घेऊन येतात. वाळपईच्या उद्योग जगताची ही कथा आहे. वाळपई- सत्तरी सारख्या ग्रामीण भागातील हा प्रश्न आहे. तेथे प्रश्न असा आहे, की लोकांना सरकारी रोजगाराची सवय लागली आहे.
जादा श्रमाची कामे कोणाला करायची नाहीत. शिवाय त्यांना सुट्ट्या दिल्या नाहीत, तरी राजकीय वशिल्याने कामे होतात. तरूण मुले घरी बसलेली असतात. अनेकजण राजकारण्यांच्या नादी लागली आहेत. तरूणाईचे राजकीयीकरण ही मोठीच समस्या आहे. शेजारच्या महाराष्ट्रातही ही समस्या गंभीर होऊन बसली आहे. मुले चकाट्या पिटत नाक्या-नाक्यावर उभी असतात. कुठल्यातरी राजकीय पक्षाची शाल गळ्यात घालून घेतात. परंतु उत्पादक काम त्यांच्याकडून काही नाही. ही पिढी नासवण्याचे काम नेत्यांनी केले आहे.
त्याहून पुढे जाऊन सांगायचे झाल्यास नेत्यांनीच ही ‘बेरोजगारी’ तयार केली आहे. या वातावरणात नवे उद्योग येणार कसे गोव्यात? गोव्याच्या अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागणार? नासलेल्या राजकीय वातावरणात तयार झालेले हे विषारी फळ आहे. या प्रश्नाला उत्तर शोधणे वास्तवपूर्ण बेरोजगारीला भिडण्याइतकेच महत्त्वाचे आहे. आपली कालबाह्य शिक्षण व्यवस्थाही त्याला जबाबदार आहे. दुर्दैवाने या प्रश्नावर गोवा विधानसभेत कधी गांभीर्याने चर्चा झालीच नाही. एकालाही गोवा विधानसभेत सरकारी खोगीरभरती बंद करा, हे ओरडून सांगण्याचे धैर्य नाही. इतर सत्ताधारी आमदार,मंत्री लोकसेवा आयोगामार्फत चालू असलेली भरती बंद करण्यासाठी तगादा लावतात. पुढच्या दोन महिन्यांत दोन अडीच हजार नव्याने भरती होणार असल्याची घोषणा मंत्री-संत्री करतात, ती तर आणखी गंभीर बाब मानली पाहिजे. ही खोगीर भरती बंद करा हे सांगण्याचे धैर्य मतदारांनी तरी दाखवले पाहिजे.
चतुर्थीच्या काळात मतदारांना सुबुद्धी निर्माण होवो, राजकारण नितळ करण्यासंदर्भात, लोकशाही बलदंड बनविण्यासंदर्भात त्यांची चळवळ सुरू होवो, अशी अपेक्षा ती यासाठीच. कारण आपले नेते लोकांसाठीच आम्ही भ्रष्टाचार करतो, अनैतिक बाबी करतो, पक्षांतरे करतो, असे वारंवार भासवत असतात. परंतु लक्षात घेतले पाहिजे, की हे नेते जनतेची वास्तवपूर्ण, खरी कामे मात्र मन लावून करीत नसतात. दरवर्षी गोव्यातून हजारो मुले अभियांत्रिकी शिक्षण घेऊन तयार होतात. त्यांच्यातील अनेकांंना- बुद्धिमान असूनही राज्याबाहेर जावे लागते. कारण त्यांची गरज भागवणारे उद्योग गोव्यात स्थापन होऊ शकले नाहीत.
अशा कल्पक, हुशार विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्यासाठी सरकारी व्यवस्थेत जागा निर्माण केल्या जात आहेत, असे मला कधीही जाणवलेले नाही. तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातील जागा ‘विकत’ घेऊन भरल्या गेल्याचा मोठा आरोप झाला होता व तशी ‘भांडेफोड’ ‘गोमन्तक’नेच केली होती. शिक्षण आणि रोजगारासंदर्भात गेल्या पाच वर्षांत ‘गोमन्तक’ने अनेक प्रकरणांवर उजेड टाकलाय. त्यातून काही जणांची गच्छंती जरूर झाली, परंतु विकार नष्ट झालेला नाही. मतदारांकडून त्याबाबत काही कठोर शासनाची आवश्यकता आहे. मतदारांनीच आता रागलोभाची पर्वा न करता अशा भ्रष्ट, संकुचित, स्वार्थी घटकांना शिक्षा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सध्या विरोधी ऐक्य, आघाडीसंदर्भात बराच गहजब ऐकू येतोय. ख्रिस्ती समाजाला विरोधी ऐक्य हवे आहे आणि त्यांचा दबाव गट विरोधी नेत्यांना एकत्र यायला भाग पाडतोय, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. लोकांचा दबाव एवढा वाढला पाहिजे की विरोधी नेत्यांनी आपापसातील मतभेद, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, अहंकार विसरून एकत्र यायला हवे, असे वातावरण जरूर आहे. त्यात काही ख्रिस्ती सामाजिक नेते क्रियाशीलपणे प्रसार-प्रचारात गुंतले आहेत. राधाराव ग्रासियस यांची बोचरी, मनोरंजक मते खूप व्हायरल झाली आहेत आणि ती लोकांच्या पसंतीला येत असल्याने माध्यम-प्रतिनिधी त्यांच्यापुढे रांग लावून उभे आहेत. त्यांचा काँग्रेसवरही राग आहे.
युतीचे नेतृत्व करण्याचे उत्तरदायित्व आपणाकडेच आल्याच्या तोऱ्यात काँग्रेस वावरत आहे. वास्तविक विस्तृत सर्वसमावेशक आघाडी बनविण्याची जबाबदारी काँग्रेस स्वीकारत असेल तर पाटी कोरी ठेवून त्यांना पुढाकार घ्यावा लागेल. याचे कारण काँग्रेसबद्दलच जे संशय, संभ्रम आहेत, त्यांना नेत्यांकडून अद्याप योग्य उत्तरे मिळाली नाहीत. अनेक ठिकाणी-उत्तर गोव्यात या पक्षाचे अस्तित्वच नाही, शिवाय भाजपाशी लढण्याऐवजी ते आपापसातच कुरघोड्या करण्यात गुंतले आहेत... याचा योग्य संदेश लोकांपर्यंत गेलेला नाही. मुळात भाजपाच्या कमकुवत जागा काय, याचा शोध घेण्याची ही वेळ होती. मनोहर पर्रीकरांनी एकेकाळी भाजपा अत्यंत कमकुवत असताना काँग्रेसच्या त्रुटी, कमकुवतपणा, अंतर्गत असंतोष टिपला.
काँग्रेसची कमजोरी भाजपाची शक्ती बनवली. आज भाजपाची स्थिती काँग्रेससारखीच आहे. एकेका मतदारसंघात अनेक उमेदवार उभे राहू पाहतात. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आता भाजपावासी बनलेले काँग्रेस नेते तेथे त्यांच्या जागा अडवून उभे आहेत. संघटनेत असंतोष आहे. प्रामाणिक नेते-कार्यकर्त्यांना डिवचले गेले आहे. माझ्या माहितीतील असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, परंतु गेल्या वर्षभरात कोणी त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही, की एखादी व्यूहरचना आकार घेते आहे, असेही दिसलेले नाही. तसे असेल तर काँग्रेस पक्षातील संघटनात्मक नेते करताहेत काय असा प्रश्न पडतो. गेल्या वेळी काँग्रेस नेत्यांवर तिकिटी विकल्याचा आरोप झाला होता. सध्या समाजमाध्यमांवर कंत्राटांचा विषय गाजतो आहे.
‘स्ट्रॅटेजी’त वाकबगार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये मोठी उणीव जाणवते आहे. काही ‘इन्फ्लुएन्सर’ स्वयंघोषित तज्ज्ञ बनून ही उणीव भरून काढण्यात लागले आहेत, परंतु योग्य तीक्ष्ण चलाखी, निष्णात दृष्टी त्यांच्यात नाही! गाजावाजा न करता, विरोधकांना चकवा देण्याची कुशाग्र बुद्धी अशा व्यक्तीच्या ठायी असावी लागते.विरोधकांनी जरूर एकत्र यावे लागेल. ही प्रक्रिया काही प्रमाणात सुरूही झाली आहे. आणखी महिनाभरात तिला मूर्त स्वरूप यायला लागेल. परंतु त्याहून महत्त्वाचे आहे ते मतदारांमधील ऐक्य जागृती.
तेच योग्य आघाडी बनविण्यास हातभार लावू शकतात. सत्ताधाऱ्यांना योग्य धोरणे बनविण्यास भाग पाडणे, सारी निष्ठा पक्षश्रेष्ठींना बहाल करण्याची प्रवृत्ती रोखणे, पक्ष फोडण्याच्या मानसिकतेला लगाम व विरोधकांना बलवान, आक्रमक बनविण्यास चेतना निर्माण करण्याचे काम मतदारांनाच करावे लागेल. त्यांचीच शक्ती राजकारणाला, विधिमंडळाला भानावर आणू शकते. विधिमंडळाचे पतन रोखण्याचे हे पवित्र कर्तव्य आहे! कोणताही राजकीय पक्ष ते रोखत नाही, उलट त्यात भर घालतो. २०२७ मध्ये ती जबाबदारी आम्हा-तुम्हावर येऊन पडली आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.