Goa Political Satire: 'देव दिता आनी देवचार नाडटा'; गणपतीसमोर पाच दिवस भक्ती केली, पण चौथ्याच दिवशी 'पणती'ने घात केला!

Dev Dita Ani Devchar Nadta Meaning: देव दिता आनी देवचार नाडटा’ अशी कोंकणीत एक म्हण आहे. ‘मराठी लेखात कोकणी घुसडण्याची ‘गुस्ताफी’ का केली जाते?’
Dev Dita Ani Devchar Nadta Meaning
Goa Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

देव दिता आनी देवचार नाडटा’ अशी कोंकणीत एक म्हण आहे. ‘मराठी लेखात कोकणी घुसडण्याची ‘गुस्ताफी’ का केली जाते?’ हा जरी लाख मोलाचा नसला तरी भुवया उंचावणारा प्रश्न आहे. कोंकणीत चांगल्या म्हणी आणि वाक्प्रचार उपलब्ध आहेत. ही गोष्ट आता गुलदस्त्यात अथवा भाषा मंडळात राहिलेली नाही. ज्यांना ज्येष्ठ साहित्यिक म्हणवून घेत उपाधी मिरवायची आहे. ते बापडे जनमानसाच्या जिभेवरील हे धन जीव तोडून गोळा करतात.

सीएमचे कोंकणी प्रेम उफाळून येण्यामागची खरी गोम हीच म्हणतात. म्हणून मी कोकणी म्हणीचा वापर करतो असं वाटल्यास गैरसमज ठरावा. आजच्या एकंदर वातावरणात माझ्या दृष्टीने ती काळाची गरज आहे. भले कोंकणीला साहित्य अकादमीने स्वतंत्र भाषेचा दर्जा दिलेला असो. पण गोव्यात जोपर्यंत शेवटचा मराठीवादी चिवटपणे तग धरून असेल, तो पर्यंत ती मराठीची ‘बोली’च असेल आणि तिचा वापर झालाच पाहिजे!

Dev Dita Ani Devchar Nadta Meaning
Goa Politics: 'जनतेच्या नावावर राजकीय मागणी लादू नका'; विरोधकांच्या ऐक्याच्या भूमिकेवर भाजपचा माणिकराव ठाकरे यांच्यावर निशाणा

म्हणून माझा तो अट्टाहास असल्याने कोणी गैरसमज करून घेऊ नये. कारण आमच्या सीएमचा कोंकणीच्या बाजूने ओढा असल्याने एकेकाळचे कट्टर मराठीवादीसुद्धा हल्ली कोंकणीच्या बाजूने कलतात, अशी एक वदंता समाजमानसात जाणूनबुजून फैलावली जात आहे. तरीसुद्धा ‘तो मी नव्हेच’ या धर्तीवर मी म्हणेन माझा तो उद्देश नाहीच. तर सांगायचा मुद्धा म्हणजे ‘देव दिता आनी देवचार नाडटा’ अशी यंदाच्या गणेशचतुर्थीच्या काळात माझ्यावर परिस्थिती आली.

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला तशी आधीच गोंधळ्या त्यात गणपती अशी माझी अवस्था झाली म्हटल्यास आपल्याला ते चटकन कळेल. तरी गणपतीचे दिवस असल्याने ‘देव’ म्हटल्यावर ‘गणपती’ हे लक्षात येईल.

पण ‘देवचार’ कोण यावर बहुतेक सुबुद्ध लोक डोकं खाजवत बसणार! तर झालं काय तर हल्लीच्या काळात जो कोणी देव देव करतो, त्याच्या सगळ्या समस्या लुप्त होऊन त्याची घुस्मटमुक्ती होते. याचा अनुभव मला घर बसल्या बऱ्याच वेळा आलेला आहे. त्यासाठी ‘जंय गांव थंय हांव’ म्हणत विजययात्रा करावी लागली नाही.

Dev Dita Ani Devchar Nadta Meaning
Goa Congress: पाटकर-विरियातोंची काँग्रेस समितीच्या बैठकीकडे पाठ; समित्यांमध्ये स्थान देऊनही मनधरणी करण्यात नेतृत्वाला अपयश

अथवा गिरीशप्रमाणे ‘गोवा राखण यात्रे’च्या नावे स्वराखण भासली नाही, याचं एक जीवंत उदाहरण द्यायचे झाले तर आमचे बांधकाममंत्री काँग्रेस त्यागून भाजपला दत्तक जाऊन काळ सरला तरी पदरी ठणाणा पण ‘देव आहे बघून घेईल’ या विश्वासावर कळ सोसून तग मारली. शेवटी देवा समोरही पर्याय नसल्याने त्या बिचाऱ्याने आपल्या भक्तास मंत्रिपद बहाल करून परवरीच्या उन्नत मार्गिकेची जन्नत नशीब केली.

तेव्हा असा हा सगळा प्रकार समोर असताना देवास टाळणे म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं म्हणायचं. उशिरा का होईना सहनशक्ती संपुष्टात येऊन नास्तिकाचा आस्तिक झालो आणि घरच्याना म्हटलं, ‘गणपतीच्या नावाने दिड दिवसाची भोगावळ सोडुया भक्तीभावाने चक्क पाच दिवस गणपती ठेवून तनमनधनाने सेवा करुया.’ देव असला म्हणून काय झालं मागितल्या शिवाय काही मिळत नाही.

परवाच ज्यांचा ‘बड्डे’ झाला त्यांच्याकडे कोणी ‘अच्छे दिन’ मागितले नव्हते. त्यांनीच ते देण्याचे आपली छाती पुढे काढून आश्वासन देऊन टाकले. मागितल्याशिवाय जो कोणी आपणहून देऊ करतो ते सत्यात उतरत नाही. त्यासाठी सर्वप्रथम हात जोडून आणि नंतर तेच हात पसरून मागावे लागते. माझ्या अतिशहाणपणामुळे माझ्याकडून आयुष्यात असला प्रमाद घडला नाही. त्याचमुळे सर्वगुणसंपन्न असूनसुद्धा आजपर्यंत एकाही पक्षाची उमेदवारी नाही.

Dev Dita Ani Devchar Nadta Meaning
Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

काहीचं म्हणणं, त्यासाठी हात जोडण्याची अथवा फैलावण्याची गरज नसते. ते मोकळे असणेच महत्वाचे असते म्हणजे त्या हातात खोके पकडता येतात. पेट्या अथवा खोक्यांची माझी ऐपत नसल्याने त्याच प्राप्तीसाठी देव हवा असतो. उशिरा का होईना मला साक्षात्कार झाल्याने मी गणपती पाच दिवस ठेवला. तीन दिवस मस्तपैकी पुजाअर्चा आणि नतमस्तक होऊन मागणं बिगणं झालं. मलाही मनातून कोणीतरी सांगत होता, सेवा योग्यमार्गाने चालू आहे.

शेवटचे दोन दिवस आहेत, याच भक्तीभावाने ती चालू ठेवल्यास ज्यासाठी हा अट्टाहास चालू ठेवलेला आहे त्याचे फळ काही दूर नाही. गणपतीसमोर प्रसन्न झाल्याशिवाय दुसरा पर्यायच रहाणार नाही.’सगळं काही नीट चाललेलं पण चवथ्या दिवसी मात्र माशी शिंकली. आरत्याचं परतं किवा सगळं मुसळ केरात असलाच काही तरी प्रकार घडला. त्याचं झालं काय तर पाच दिवस गणपती म्हटल्यावर खर्च हा आलाच.

पण खर्च केल्या शिवाय अथवा गुंतवणूक केल्याशिवाय नफा हा नसतोच. उमेदवारीसाठी खोके देणे अथवा निवडणुकीत मतदाराना पैसे चारणे हीसुद्धा त्या धंद्यातील एक महागडी गुंतवणूकच असते.आजचे सगळे राजकारणी जे गब्बर झालेत त्यामागे ही गुंतवणूकच आहे.पाच दिवस गणपती ठेऊन त्याला दिवसरात्र भजणे म्हणजेही गुंतवणूकच. एकदा जरकाही देव प्रसन्न झाला तर मग मागे वळून पाहण्याची गरजच नाही. त्याचसाठी मी उधारीवर का होईना चांगल्या प्रतिचे महागडे तेल आणले. माझ्या चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे गणपतीला स्पष्ट दिसावे म्हणून मी गणपतीच्या समोर सगळीकडे पणत्या लावून दिव्यांची आरास केलेली. पण चौथ्या दिवशी त्यातली एक पणती अचूक सहा वाजता गायब झाली.

Dev Dita Ani Devchar Nadta Meaning
Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

त्याच पणतीत मी चांगली वात घालून शुद्ध तुपाने ती पेटवून उजेड करायचो. हेतू एवढाच की विघ्नहर्त्याला माझ्या भावना आणि चिंता दिसाव्यात. पण माझ्या सेवेने गणाधीश प्रसन्न होण्याच्या मार्गावर असतानाच आमच्या हिनं ती महत्वाची पणती मला न विचारता न सांगता पळवली अन् विश्वगुरूसाठी आशीर्वाद दीप प्रजलनासाठी भक्तीभावाने वापरली. ज्या पणतीच्या प्रकाशात विघ्नहर्ता गेले तीन दिवस माझ्यावर दृष्टी ठेवून होता. तीच पणती गायब झाल्याने बाप्पा गोंधळला आणि वरदानासाठी पुढे केलेला आपला हात मागे घेतला आणि परत मूर्तिरुपांत बसून राहिला. ‘देव दिता आनी देवचार नाडटा’ असंच माझ्या बाबतीत कायम घडून येतं. आता ‘अच्छे दिन’साठी देव सोडून देवचारास ‘रोंट’ घातल्या शिवाय पर्याय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com