Ghashiram Kotwal: 'घाशीराम कोतवाल'चा दिल्लीतील तो ऐतिहासिक प्रयोग; 46 वर्षांनंतर दिग्दर्शकांनी जागवल्या आठवणी

Ghashiram Kotwal Play 1980 Goa: गोमंत विद्या निकेतन, मडगाव– कला विभागाने १९८० साली सादर केलेल्या गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’च्या मूळ कलाकारांचा पुनर्मीलन सोहळा होतोय.
Ghashiram Kotwal Play 1980 Goa
Ghashiram KotwalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

प्रा. विजय सातपुते

गोमंत विद्या निकेतन, मडगाव– कला विभागाने १९८० साली सादर केलेल्या गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’च्या मूळ कलाकारांचा पुनर्मीलन सोहळा आज होतोय. नाटकाच्या निर्मितीशी निगडित रंजक आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने हा लेखनप्रपंच...

श्री कसबा गणपती हे पुनवडीचे म्हणजे पुण्याचे दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जीजाबाईंच्या स्वप्नात येऊन म्हणाले, ‘‘मी उन्हापावसांत आहे मला छप्पर हवे आहे.’’ मातोश्री जीजाबाईंनी भव्य मंदिर बांधुन त्याला उन्हां-पाव‌सांतून मंदिरात आणले. स्थापना केली. हेच पेशव्यांचे दैवत. या मंदिराशेजारी आम्ही २९ कुटुंबांच्या उपाध्ये वाड्यांत राहात होतो. या दैवतासमोरच्या रस्त्यावर आम्ही शिवाजी शिवाजी खेळलो. छत्रपत्री शिवरायांच्या मोहिमा आमच्या झाल्या. असे खेळता खेळता वाढलो.

Ghashiram Kotwal Play 1980 Goa
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

आमच्या वाड्याच्या दहा-पंधरा पावलांच्या उतारावर फणे आळी तालीम. वयाच्‍या तिसऱ्या वर्षापासून पहाटे लाल मातीत गाजलेल्या पहिलवानांकडून कुस्तीतले डावपेच शिकायचो. दृष्ट लागण्यासारखा काळ होता तो. इथल्या परिसरांत जगप्रसिद्ध हस्तीदंती केस विंचरण्याच्या फण्यांचे उत्पादन व्हायचे. गर्भश्रीमंत स्‍त्रिया या फण्या वापरत असत. तालमीच्या मागे जवळजवळ दोन एकरांत पसरलेला भोसलेंचा किल्‍लेवजा चिरेबंदी वाडा. या वाड्याच्या प्रचंड लोखंडी दरवाजासमोरच्या बोळाच्या टोकाशी सरदार मुजुमदारांचा देखणा वाडा. पुढे दहा-पंधरा पावलावर अनेक बुरजांचा किल्‍ला शनिवारवाडा.

पेशव्यांचे वस्ती आणि मोहिमांचे स्थान. उत्तरेकडे दिल्ली दरवाजा, त्याच्या डाव्या हाताला मस्तानीची कबर. त्या बुरजाला वळसा घालून पुढे गेल्यावर रस्त्याच्या टोकाला पूर्वेकडे तोंड करून असलेला भव्य लोखंडी गणेश दरवाजा. या दरवाजातूनच पेशवे कोणत्याही मोहिमेसाठी प्रस्थान करायचे. राघोबादादांनी असे प्रस्थान करूनच आटकेपार झेंडा लावला. या गणेश दरवाजासमोर जीजामाता उद्यान. हाच पूर्वीचा लाल महाल. तिथेच पेशव्यांनी शनिवारवाड्याची पायाभरणी केली. इथेच जीजाबाईंनी बालशिवबावर स्वराज्याचे संस्कार केले. इथेच तानाजी धारातिर्थी पडल्याची खबर मिळताच महाराजांच्या तोंडून उद्‌गार बाहेर पडले, ‘‘गड आला पण सिंह गेला!’’ आणि कोंडाण्याचे नांव ‘सिंहगड’ झाले. इथेच खिडकीतून पळून जात असताना शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

या लाल महालासमोर सरदार नातूंचा (एखाद्या पेठेएवढा) वाडा. वाड्याच्या दरवाजांत एक फूट उंची आणि तीन-साडेतीन फूट लांबीची देवळी आहे. आत सात दगड ओळीने आहेत हीच सटवाई देवी. इथे आजही माता नवजात बाळांना दुपट्ट्यात गुंडाळून तिच्यासमोर रस्त्यावर ठेवतात.ती रक्षण करते अशी समजूत आहे. नातूवाड्याच्या मागच्या बाजूला काही पाण्याचे हौद होते. समोर नानासाहेब पेशव्यांचा गणेश दरवाजापासून फुटक्या बुरुजापर्यंत आणि तिथून बुधवार पेठेत बाहुलीच्या हौदापर्यंत चौसोपी वाडा. वाड्यामागे बाहुलीच्या हौदापर्यंतच्या बोळांत वेश्या वस्ती. फुटक्या बुरजाशेजारी नारायण दरवाजा.

इथेच राघोबादादांची पत्नी आनंदीबाई हिने गारद्यांच्या हाताने नारायणरावांची ‘ध’ चा ‘मा’ करून हत्या केली. त्यावेळी नारायणराव ओरडले, ‘काका काका मला वाचवा!’ इथून वेश्यावस्ती सुरू होते. वेश्याही भरजरी शालू नेसत. कदाचित त्यावरून ‘शालूकराचा बोळ’ नाव पडले असावे. असा हा परिसर इथली ही कथा ‘घाशीराम’ म्हणून आत्मियता, कुतूहल, उत्सुकता म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक बसवायचे ठरवले. तिसच्या आसपास पात्रे आणि प्रत्येकाच्‍या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका असे हे नाटक बसवणे ‘खायचे’ काम नव्हते!

Ghashiram Kotwal Play 1980 Goa
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

आता गोमंत विद्या निकेतन या नावाजलेल्या संस्थेच्या स्पर्धेसाठी दिल्‍लीला जाणाऱ्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्‍या दिग्दर्शनाची जबाबदारी मी स्वीकारली. त्यालाही आता सेहेचाळीस वर्षे झाली. संस्थेच्या कला विभागाच्या कलाकारांसोबत पाच सहा भेटीगाठी झाल्या. सूत्रधार राजीव शिंक्रे आणि नाना राजीव हेदे एका चाचपणीत निश्चित झाले. घाशीरामची निवड झाली नाही. पुढच्या एका भेटीत एका मुलाकडे माझे लक्ष गेले. त्याचा नम्र बेरकीपणा आणि गोड कुत्सित हसणं मला भावलं आणि मला ‘घाशीराम’ सापडला. हे त्याचे ‘दुर्गुण गुण’ नाटकभर वापरायचे ठरवले. दिलीप प्रभुदेसाई घाशीराम झाला. एक वर्षानंतर स्पर्धेचा निकाल आल्‍यावर माझी ‘घाशीराम’ची निवड योग्य होती हे पटले. हे तीनही प्रमुख कलाकार चतुर बु‌द्धिमान होते.

‘दिग्दर्शकाने आपण बसवत असलेल्या नाटकांत भूमिका करू नये’ या मताचा मीही होतो. तरीही सर्व कलाकारांचा उत्साह बघून मीही छोटी भूमिका करायचे ठरवले. सुरुवातीच्‍या श्री गणेश वंदनातल्‍या श्री गणपतीची आणि दुसरी बसवता बसवता पद‌रात पडली ती घाशीराम कडून छळवाद होणाऱ्या ब्राम्हणाची भूमिका. दोन्ही भूमिकांना एका अक्षराचे संवाद नव्हते. गणेशवंदन म्‍हणजे श्री गणेशाचा मुखवटा घालून आणि पेटत्या सात वातींची मूठ असलेली समई हातात घेऊन केलेले नृत्य होते. वत्सला नायक यांच्या सूचना लक्षात घेऊन नृत्य केले. औरंगजेबाच्या कैदेतून संभाजी राजांची सुटका झाल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले काशीचे विद्वान ब्राम्हण आणि छत्रपती शिवरायांच्‍या राज्याभिषेकाचे पुरोहित गागाभट्ट सातारला आले.

सन्मानार्थ त्यांना सातारजवळ भुईंज गांवी पन्नास चाहूर जमीन दिली (१ चाहूर म्हणजे १०० एकर) भुईंज गावच इनाम दिले. या गागाभट्टांना सात मुले म्हणून आम्ही सातपुते. हे गागाभट्ट माझे पूर्वज आणि मी वंशज असा माझा या इतिहासासी संबंध. नातं आत्मियता, कुतूहल आणि उत्सुकता. म्हणून हे नाटक बसवायचे होते मला, आणि संधी मिळाली. तेव्हाच्या सत्ताधारी कोकणस्थ ब्राम्हणांचा व तथाकथित प्रतिष्‍ठितांचा स्तर रसातळाला पोहोचला होता. यथा राजा तथा प्रजा! त्यावरचे भाष्य म्हणून हे नाटक. याउपर संस्कारी विद्वान आणि सर्वसामान्य यांचीही संख्या काही कमी नव्हती. ते समाजाचा भाग होतेच की! अशा चित्रावर हे नाटक विरोधातही जिद्दीने बसवावे वाटले. परंतु पुढे नाटकाच्या यशाने हा विरोध मावळला. आता हा इतका मोठा ‘आवाका’ व त्याचे आव्हान स्वीकारले होते. आणि त्याला संस्थेचे अध्यक्ष, कलाविभागाचा भरघोस पाठिंबा मिळाला.

प्रमुख भूमिकांच्या तालमी त्यांना पूरक इतर पात्रांसोबत पहाटे दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत चालायच्या. कुणाची कुरकूर नव्हती. बाहेरगावी राहणाऱ्यांच्या व काही अडचणी असणाऱ्यांच्या तालमी दुपारी, संध्याकाळी होऊ लागल्या. हळू हळू छोटे छोटे प्रसंग तुकड्या तुकड्यांत बसवायला घेतले. काही दिवसांत या तालमी कलाकार आपापल्या सोयीनुसार मिळेल त्या त्या ठिकाणी आसपास घेऊ लागले. एकत्र बसून कलाकार आपापल्या भूमिकांचे संवाद बसवू लागले. आता हे ‘प्रसंग तुकडे’ एकसंध नाटकाच्या विषय दिशेने जाण्यासाठी दोन-दोन पांच-पांच पानांच्या सलग‌ तालमी घ्यायला सुरवात झाली. प्रसंग कसे उभे राहतात याचा अंदाज यायला लागला. असे काही आणि सर्व तुकडे जोडतांना ने योग्य मार्गाने जातायतसे दिसले. विषयाच्या दिशेने नाटक चालायला लागले. आईच्या कौतुकाने मी भारावून गेलो.

प्रमुख भूमिका करणारे राजीव शिंक्रे, राजीव हेदे, दिलीप प्रभुदेसाई आपला अभिनय भूमिकांच्या ‘तोलामोलाचा कसा होईल’ याकडे लक्ष देताना दिसले. या तिघांचे अभिनय धागे आणि नाटकाच्या बाजाला साजेशी वीण हे नाटकाचे सौंदर्य होते. सौंदर्याने भारावलेल्या वीणेने बघता बघता भरजरी वस्‍त्र विणले. माझ्यासाठी हा फडकणारा झेंडा होता. आता माझ्‍या कामाकडे लक्ष देणे आवश्यक होते. मला हवीतशी गाण्यांची रचना बदलली, लिहिली.

‘डोळ्यांची बरसात बरसली गंधीत माती कायेची,

इश्काच्या रंगात रंगली आलीबाई पंचमी रंगाची.’

‘पदर राहिना खांद्यावरती वय झालं सोळा,

कुणाकुणाला घालू मी डोळा कुणाकुणाला घालू मी डोळा.’

या गौळणींना चाली लावण्याची आणि संपूर्ण नाटकाच्या संगीताची जबाबदारी नाटकाचा बाज लक्षात घेऊन सांभाळली. सुचिता नायकांनी खास आवाजाच्या ढंगानी गायली. त्यांच्या आवाजाचा पोत गाण्यांना आणि नाटकाच्या बाजाला शोभेलसा होता. हा ‘पोत’ मला आवडायचा. महेश काणे यांच्या सूचना आणि दत्ताराम धायमोडकर सिंथेसायझर, बाळकृष्ण आमोणकर मृदंग आणि तबला, प्रसाद शिंक्रे यांची ढोलकी यांनी कमाल केली. तीन प्रमुख भूमिकांभोवती नाटकाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत रंगमंचावर तीन तास सातत्याने वावरणारी जवळजवळ चाळीस भूमिकांत वावरणारी पात्रे प्रसंगांनी नाटक कसे एकजीव करतील त्यावर नाटकाचे यश अवलंबून होते.

Ghashiram Kotwal Play 1980 Goa
Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढच्या सगळ्या तालमी सर्व पात्रांसहीत व्हायला लागल्या. पहिल्या दोन दिवसांत नाटक विस्कळित वाटले. चर्चेनंतर तिसऱ्या दिवशी नाटकाला आकार आला. रंगीत तालमीचा दिवस ठरला. आता तालमींचे गांभीर्य पात्रांच्या लक्षात आले. तालमींची वीण घट्ट झाली आणि नाटक घट्ट पायांवर उभे राहिले. रंगीत तालमीचा प्रयोग माझ्या अपेक्षेबाहेर दृष्ट लागण्यासारखा झाला. आडवा पडल्यानंतरही प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकू येत होत्या. आणि दचकून जाग आली.

आता आम्ही दिल्‍लीच्या प्रयोगासाठी निघालो होतो. मडगाव ते दिल्‍ली मोठा प्रवास. सगळे उत्साही दबावाखाली होते. रेल्‍वेची खिडकी गप्‍प गप्प होती. एरवी रेल्वे प्रवासांत होणारा नेहमीसारखा आनंद नव्हता. खिडकीतली दृष्ये उजवीकडून डावीकडे सरकत होती. एखाद्या मोठ्या मोबाईल सारखी. वेग वाढला की, खिडकीत व्हिडिओ सुरू व्हायचा हेड फोन काढल्यासारखा. समोरच्‍या बाकावर नाटकांतली पात्रे परके प्रवासी असल्यासारखी. मी मलाच विसरलो होतो. एक लाकडी बाक झालो होतो. ‘मी’त मी नव्हतो. आम्ही दिल्‍ली रेल्‍वे स्टेशनवर उतरलो. रेल्वेचा वेग माझ्यातून उतरायला तयार नव्हता. कधी मी पुढे जायचो बॅग मागून यायची. कधी बॅग पुढे मी मागून. अंगातल्या वेगाने बॅग पायावर आपटत होती. चालणं ‘होलपडणं’ झाले होतं.

दिल्‍लीचा प्रयोग रंगीत तालमीच्या दसपटीने ‘भन्नाट’ झाला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून पावती दिली. आम्ही त्यांच्यासमोर माना झुकवल्या. दिल्लीच्या प्रयोगासाठी स्पर्धेला साजेसे असावे म्हणून श्री गणेशाचे मुख नवे करून घेतले. श्री गणेशवंदना नृत्य करताना नाका-तोंडात मुखात उरलेला भुस्सा गेला. मी श्रीगणेशाच्या भूमिकेत खोकलो वा शिंकलो असतो तर नाटकाचे काय झाले असते! सगळा भुस्सा मी गिळला. सुरवात चांगली झाली. हे ‘सुचिन्ह’ होते. नाटक प्रेक्षकांतून सुरू होते. सगळे विशिष्ट तालावर रंगमंचावर पोहोचले.अनवधानाने एक ब्राम्हण खाली प्रेक्षकांत राहिला. धावत येऊन रंगमंचावर मिसळला. टाळ्या झाल्या. नाटकाचाच हा भाग आहे असे प्रेक्षक समजले असावेत. आता दिल्‍ली फिरायला निघालो. सगळे सगळे विरत गेले.

घरी जाऊन कधी एकदा झोपतो असे झाले. पण घरी झोप म्हणून आली नाही. गोव्यात पोहोचल्यावर सगळे स्वतःत व्यस्त झाले. गाेंयकार झाले. एके दिवशी बातमी आली,

संस्थाः गोमंत विद्या निकेतन, मडगाव, गोवा.

नाटक: ‘घाशीराम कोतवाल’ : प्रथम क्रमांक

दिग्दर्शक: प्रा. विजय सातपुते : प्रथम क्रमांक

संस्थेचा आणि कलाविभागाच्या कलाकारांचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा मी ऋणी आहे. ऋणी राहीन. मडगावातला जल्‍लोष गोवाभर पसरला!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.