Gen Z Student Movement: स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेली नवी 'क्रांतिकारी पिढी'

NEET Paper leak Protest: विद्यार्थीवर्गावरचा गेल्या काही वर्षांतला हा पहिला हल्ला नाही.
NEET Paper leak Protest
Gen Z Student MovementDainik Gomantak
Published on
Updated on

नारायण आशा आनंद

आंदोलन सुरू झाल्यानंतर ‘बहती हवा’सारखे येऊन नेतृत्त्वस्थानी विराजमान झालेल्या सोनम वांगचुक यांची अवस्था विद्यार्थी कदाचित ‘कहां गया उसे ढूंढो’ अशी करू शकतात. नायकवादाला लावलेला सुरूंग हे या आंदोलनाचे एक मोठे यश होय. आपली ‘मन की बात’ जनतेला सुनावणे हे सत्ताधाऱ्यांचे काम नव्हे तर ‘जन की बात’ ऐकणे व त्यानुसार राज्य चालवणे हे त्यांचे काम आहे.

नीट’ पेपरफुटीच्या विरोधात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह जंतरमंतर येथे सुरू झालेले आंदोलन सरकारने विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमारानंतर देशभर पसरले. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही या आंदोलनाची कळीची मागणी अखेर शनिवारी पूर्ण झाली. तरी सध्या देशभरात झालेला उद्रेक ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात नसून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी सरकारने अवलंबलेल्या बेकायदेशीर आणि हिंसक पद्धतींच्या विरोधात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आता गृहमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी पुढे येऊ शकते.

NEET Paper leak Protest
CJP Protest: "हा विद्यार्थ्यांचा विजय अन् भाजप सरकारच्या अंताची सुरुवात!" आलेमाव यांचा हल्लाबोल

एकीकडे आंदोलनातील फलक, नारे यांवरून पेपरफुटीवरून सुरू झालेले आंदोलन हळूहळू लोकशाहीविरोधी शासनपद्धतीच्या विरोधातील व्यापक आंदोलनाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सरकारला त्याला पेपरफुटीपुरते मर्यादित बनवण्याची धडपड करावी लागत आहे. म्हणूनच, पंतप्रधानांना मध्यरात्री सेल्फी व्हिडिओद्वारे जनतेला संबोधित करावे लागले.

विद्यार्थीवर्गावरचा गेल्या काही वर्षांतला हा पहिला हल्ला नाही. आंबेडकर-पेरियार स्टुडंट्स सर्कल दडपण्यासाठीच्या सरकारी कारवायांनंतर रोहित वेमुला या पीएच.डी. विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी ग्रंथालयात बसलेल्या विद्यार्थ्यांवरही लाठीमार करत त्यांना दोन्ही हात वर करून गुन्हेगारांसारखे रांगेत बाहेर काढले. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील आंदोलक विद्यार्थ्यांवरही पोलिस तसेच भाडोत्री गुंडांद्वारे हल्ले झाले.

NEET Paper leak Protest
CJP Protest: "हा विद्यार्थ्यांचा विजय अन् भाजप सरकारच्या अंताची सुरुवात!" आलेमाव यांचा हल्लाबोल

नजीब अहमद हा सत्तावीस वर्षीय विद्यार्थी संशयास्पदरित्या गायब झाला. या घटनांचे पडसादही देशभर उमटले, मात्र आज ज्या व्यापक स्तरावर रस्त्यावर उतरून विरोध सुरू झालेला दिसतोय तसे तेव्हा झाले नव्हते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना दहशतवाद्यांचे समर्थक व ॲंटी नॅशनल ठरवून व्यापक समाजाच्या सहानुभूतीपासून त्यांना वंचित ठेवण्यात सरकार यशस्वी झाले. यावेळी तशा प्रयत्नांना आतापर्यंत यश येताना दिसत नाही. हे या आंदोलनाचे वेगळेपण होय.

सर्व काही सुरळीत सुरू असताना एक पेपर फुटला आणि देशभरातले विद्यार्थी व त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले अशातला हा प्रकार नक्कीच नाही. पाच वर्षांपूर्वी नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर आंदोलन होऊन शेवटी सरकारला वादग्रस्त कृषी कायदे मागे घेणे भाग पडले. या आंदोलनात सातशेहून अधिक शेतकरी हुतात्मा झाले. तीनच महिन्यांपूर्वी नॉएडा येथील कारखान्यांमध्ये किमान वेतन वाढवण्याच्या मागणीसाठी सुरू झालेला कामगारांचा संप बघता बघता अनेक राज्यांमध्ये पसरला.

NEET Paper leak Protest
Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

कामगारांचा तो उद्रेकसुद्धा कोणत्याही मोठ्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय झाला होता. सध्या महागाई, बेरोजगारीचा प्रश्न तीव्र बनलेला आहे. राम मंदिर आंदोलनातील देणग्यांमधील भ्रष्टाचाराने भाजपच्या तथाकथित धर्मनिष्ठेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. म्हणूनच या आंदोलनाने बघता बघता धारण केलेल्या विराट स्वरूपाच्या मुळाशी केवळ पेपरफुटी आहे, असे मानणे बालीशपणाचे ठरेल.

सध्याच्या आंदोलनात निरनिराळ्या विद्यार्थी संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे त्याला ‘सीजेपी’ आंदोलन म्हणणे खरे तर निखालस चुकीचे आहे. किंबहुना काकरोच जनता पार्टीला एक राजकीय पक्ष तर म्हणताच येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा एक निश्चित राजकीय कार्यक्रम असतो, त्याची संघटनात्मक बांधणी असते. कॉकरोच जनता पार्टीमध्ये या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरून आंदोलनकर्ते विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. तरीही न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांनी सातत्याने त्याला ‘सीजेपी’ आंदोलन म्हणून संबोधणे सरकारच्या सोयीचे आहे.

NEET Paper leak Protest
Sonam Wangchuk Hunger Protest: उपोषणकर्ता आजारी, की समाजव्यवस्था?

असे केल्याने ज्यांच्या बळावर हे आंदोलन उभे राहिले त्या निरनिराळ्या विद्यार्थी संघटना नजरेआड होतात व ठरावीक व्यक्तींवर आंदोलनाचे नेतृत्व आरोपित केले की साम, दाम, दंड, भेद आदी उपायांद्वारे त्या नेतृत्वाला शांत करून आंदोलन दडपणे सोपे जाते. मात्र सध्या देशभरातील विद्यार्थ्यांच्या संतापाचा रेटा इतका प्रचंड आहे, की बहुसंख्य आंदोलकांच्या मताविरुद्ध जाऊन तडकाफडकी कोणताही निर्णय घेणे नेतृत्वालाही शक्य होणार नाही.

केंद्रात आणि बहुतेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपकडे आंदोलने निष्प्रभ करण्याची एक प्रभावी यंत्रणा तयार आहे. विविध न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया तसेच सार्वजनिक मंचावरून सरकारच्या बाजूने जनमत बनवण्याची व विरोधी विचार अपप्रचार, असत्यकथन, झुंडशाही इत्यादी मार्गांनी नष्ट करण्यात ही यंत्रणा प्रवीण आहे. त्यातून देशाचे पंतप्रधान हे देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत व त्यांचा प्रत्येक निर्णय दूरगामी देशहिताचा विचार करूनच घेतला जातो याविषयी जनतेच्या मनात कोणतीही शंका राहू नये याचा बंदोबस्त या यंत्रणेने केलेला आहे.

NEET Paper leak Protest
Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

त्यातून एक अलौकिक जीवनचरित्र समाजमनात रुजविले गेले. ‘यदा यदा ही धर्मस्य’सारख्या श्लोकांमधून व्यक्त होणारा नायकवाद कोणत्याही सत्तेसाठी फायदेशीर असतो. स्वतःच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याऐवजी एखाद्या प्रेषिताची वाट पाहण्यात जनतेला गुंतवून ठेवता येते. गेल्या काही वर्षांत देशात बळकट झालेला हा नायकवाद या विद्यार्थ्यांनी आपल्या इरसाल शैलीत नाकारला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी फक्त सत्तेत बसलेल्यांचेच नायकत्व नाकारले आहे असे नव्हे.

सोनम वांगचूक यांनी आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हातून मध्यरात्री उपोषण सोडल्यानंतर आंदोलनाच्या दिशेवर त्याचा कोणताही परिणाम न होण्याची चिन्हे दिसली. आंदोलन सुरू झाल्यानंतर ‘बहती हवा’सारखे येऊन नेतृत्त्वस्थानी विराजमान झालेल्या सोनम वांगचुक यांची अवस्था विद्यार्थी कदाचित ‘कहां गया उसे ढूंढो’ अशी करू शकतात. नायकवादाला लावलेला सुरूंग हे या आंदोलनाचे एक मोठे यश होय. आपली ‘मन की बात’ जनतेला सुनावणे हे सत्ताधाऱ्यांचे काम नव्हे तर ‘जन की बात’ ऐकणे व त्यानुसार राज्य चालवणे हे त्यांचे काम आहे हे या देशातील तरुणांनी ठणकावून सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com