Emotional Maturity: फक्त 'डिग्री' काय कामाची? संकट आलं की पुस्तकी ज्ञान नाही, तर 'भावनिक परिपक्वता' धावून येते!

Mental Toughness: पुढे आयुष्यभर ती व्यक्ती त्याच ध्येयांच्या नांगराला जुंपलेली राहते. या धावपळीत त्या कोवळ्या जीवाला एक संवेदनशील, हळवे मनही आहे.
Emotional Maturity
Mental ToughnessDainik Gomantak
Published on
Updated on

सुलक्षा मनेश गावस

जीवनातील चढ-उतार अपरिहार्य आहेत याची जाणीव आपल्याला असते; मात्र त्यांना स्वीकारण्याची आणि त्यांच्याशी समर्थपणे झुंज देण्यासाठी आवश्यक असणारी भावनिक परिपक्वता विकसित करण्याकडे आपण तुलनेने कमी लक्ष देतो. आजच्या काळात अर्थार्जनासाठी ज्ञानार्जनाला इतके महत्त्व दिले जाते, की मूल चालू-बोलू लागले की त्याला स्पर्धेच्या शर्यतीत उतरवले जाते.

पुढे आयुष्यभर ती व्यक्ती त्याच ध्येयांच्या नांगराला जुंपलेली राहते. या धावपळीत त्या कोवळ्या जीवाला एक संवेदनशील, हळवे मनही आहे, याचा अनेकदा विसर पडतो. भावनिक सक्षमीकरणाचा विषय शिक्षण, संगोपन आणि सामाजिक संवाद यांच्याशी पुरेशा गांभीर्याने जोडला जात नाही. परिणामी, ज्ञान आणि कौशल्ये मिळवताना मनाची जडणघडण अनेकदा दुय्यम ठरते.

Emotional Maturity
Stress in Life: स्ट्रेस्ट खरोखर कशामुळे होतो? तुम्हाला माहिती आहे का?

भावनिक परिपक्वतेकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम मात्र जीवनाच्या विविध टप्प्यांवर प्रकर्षाने जाणवू लागतात. परिस्थिती अनुकूल असेपर्यंत त्याची उणीव फारशी भासत नाही; परंतु आयुष्य एखादे कठीण वळण घेते, अपेक्षाभंग होतो किंवा संकट समोर उभे ठाकते, तेव्हा मनाची खरी तयारी कितपत झाली आहे याची परीक्षा सुरू होते. अशा वेळी केवळ शैक्षणिक ज्ञान किंवा व्यावसायिक कौशल्ये पुरेशी ठरत नाहीत; भावनिक स्थैर्य, आत्मभान आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता यांचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवते.

संकट समयी समोर उभी ठाकलेली परिस्थिती कशी हाताळावी, हे अनेकदा उमजत नाही. संकटाशी झुंज देताना ती व्यक्ती आतून खचून जाते. बराच काळ ही झुंज चालली की, सर्व एकटवलेले अवसान एकदिवस गळून पडते आणि एकदम हतबल झाल्यासारखे वाटते. जीवनातील या खाच खळग्यांना सामोरे जायची कधीही मानसिक तयारी न झाल्याने धीर खचतो.

Emotional Maturity
Life Lessons From Ram: 'पराभवातही धैर्य कसे राखावे'? भगवान श्रीरामांनी तरुणांसाठी केलेले मार्गदर्शन

घरात एकट्या-दुकट्या, कोडकौतुकाने वाढलेल्या मुलांना तर नकार, अपयश कसे पचवावे, तडजोड का आणि कशी करावी याची समज आलेली नसते, कारण असे अनुभव त्यांच्या वाट्याला फारसे आलेले नसतात. ही मुलं फार लवकर परिस्थितीपुढे हात टेकतात. भावनिक परिपक्वता हा प्रवास आहे. खाच खळग्यांना सामोरे गेल्यावर आपण जे शिकतो, अनुभवतो त्यातून विचार प्रगल्भ होत जातात. मात्र त्यासाठी सारासार विचार आणि प्रयत्नपूर्वक सराव करणे हेही तितकेच महत्वाचे आहे.

आत्मभान आणि परानुभूती या दोन महत्वाच्या जाणिवांनी भावनिक परिपक्वतेची नांदी सुरू होते. आत्मभान आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास मदत करते आणि परानुभूती पर दुःख, दुसऱ्याची बाजू समजून घ्यायला मदत करते. आपण रागाच्या भरात, निराशेच्या आवेगात जे बोलतो वागतो त्याचा इतरांवर किंवा आपल्या स्वतःवर होणाऱ्या परिणामांची जाणीव झाली त्याबद्दल थोडे विचार करणे झाले कि कृतीमध्ये फरक पडत जातो.

Emotional Maturity
नात्यात दुरावा आलाय? रोजचं टेन्शन विसरा अन् 'या' छोट्या बदलांनी संसारात पुन्हा गोडवा आणा!

आपली होणारी चिडचिड, त्रागा नक्की का होतो? हे जाणून घेतले की, त्या त्या गोष्टींना कटाक्षाने टाळणे होते किंवा त्या गोष्टींना सामोरे जाण्याची मानसिक तयारी केली जाते. भावनांकडे डोळसपणे पाहणे, हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा असतो तो आपल्या भावनांना योग्य मार्गाने वाट करून देणे. निराशा दाटून आली, आपली मेहनत वाया गेली, अनाठायी कुणी आपल्याला वेठीस धरू लागले की, अनेकदा काय करावे हे उमजत नाही.

भीती वाटू लागते, राग येतो, अशावेळी भावनेच्या भरात जे आपण वागतो, बोलतो त्याच्या परिणांमांची आपण फारशी गोळाबेरीज करत नाही. त्यासाठी भावना,विचार आणि कृती यामधली वेळ सांभाळता आली पाहिजे. भावनेच्या भरात घडलेली कृती पुढे आपल्याला गोत्यात आणू शकते. आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला की, अविचार, घालमेल आणि पुन्हा त्यातून निसटण्यासाठीची धडपड या दुष्टचक्रात आपण अडकत जातो. आपण वागता बोलताना थोडे आत्मपरीक्षण केले, कृतीचे भान आणि भावनांना आवर घातला की, गुंता आपोआप सुटत जातो.

Emotional Maturity
Karmaveer Bhaurao Patil Life Story: खोट्या आरोपावरुन तुरुंगवासाची शिक्षा, कंटाळून घेतला आयुष्य संपवण्याचा निर्णय, 'त्या' घटनेनं भाऊरावाचं आयुष्यच बदललं

प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला की, आपली शक्ती जर तरचे तर्क लढवण्यात खर्ची पडत नाही. हुकली संधी, झाली एखादी चूक आपल्या हातून,समोर उभा ठाकलेला प्रसंग आपली परीक्षा पाहणार आहे अशा गोष्टी जितक्या लवकर स्वीकारू तितके आपले मानसिक श्रम वाचतात. तीच ताकद आपण पर्याय शोधण्यास खर्च करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीला शांतपणे सामोरे जाण्याचे हे कसब मात्र कमवावे लागते.

गोंधळून,गांगरून न जाता स्वतःला सावरण्याची क्षमता सरावाने अंगवळणी पडते. कठीण परिस्थिती एकदा स्वीकारली कि मग घडल्या गोष्टींत फार दोषारोप न करता आपण जबाबदारी स्वीकारली कि स्वतःच्या कार्याची योग्य दिशा ठरवता येते. त्याने असे वागायला नको होतो, अमुक एक व्यक्ती नीट वागली असती तर सगळे सुरळीत झाले असते, असे झाल्या गोष्टीला इतरांना दोषी ठरवून साद्य काही होत नाही. उलट हा दृष्टिकोन परिस्थितीकडे डोळसपणे पाहण्यामध्ये अडसर निर्माण करतो.

Emotional Maturity
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

झाली गोष्ट दुसऱ्यांवर थोपवून आपण अनेकदा आपल्या दोषांवर पांघरूण घालण्याची चूक करून बसतो. त्यापेक्षा झाल्या चुकीची जबाबदारी आपण स्वीकारली की, फार ठिगळ लावत बसावे लागत नाही. आपली छबी तरी आपल्याला स्वच्छ दिसत जाते. अडखळणे धडपडणे यापुढे असतो तो ठामपणे उभे राहण्याचा टप्पा. स्थितिस्थापकत्व कमवताना लागतो तो धीर आणि दृढ इच्छाशक्ती. अथक प्रयत्नांती आपण जेव्हा यशाच्या दोन बोट जवळ येतो आणि होत्याचे नव्हते होते, तेव्हा वाटते आता संपले सगळेच.

उभ्या जन्मात आपल्या सोबत असे अघटित घडेल याची कल्पनाही आपण केलेली नसते तेव्हा धीर खचतो. अशावेळी स्वतःची समजूत घालून पुन्हा नव्या वाटचालीसाठी स्वतःला तयार करण्यातच धिटाई असते. भावनिक प्रगल्भता म्हणजे भावना दडपणे नव्हे, तर त्या समजून योग्य प्रकारे व्यक्त करणे होय . सारासार विचार आणि मनःशांती हा तिचा गाभा आहे. ॲरिस्टॉटल म्हणतात, ‘राग कोणालाही येऊ शकतो; पण योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य पद्धतीने राग व्यक्त करणे सोपे नाही.’ म्हणूनच भावनिक परिपक्वता विकसित करण्यासाठी सततचा सराव आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com