Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

Best Places to Visit in Egypt: व्हिएतनामनंतर इजिप्तच्या भूमीवर पाऊल ठेवताना मनात विलक्षण उत्सुकता होती. तिथला गूढ इतिहास पुस्तकांतून वाचला होता, चित्रपटांतून त्याची झलक पाहिली होती.
Best Places to Visit in Egypt
Egypt TourismDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राजू नायक

व्हिएतनामनंतर इजिप्तच्या भूमीवर पाऊल ठेवताना मनात विलक्षण उत्सुकता होती. तिथला गूढ इतिहास पुस्तकांतून वाचला होता, चित्रपटांतून त्याची झलक पाहिली होती. पण, गिझाच्या पिरॅमिड्ससमोर प्रत्‍यक्ष उभे राहिल्यावर जाणवले, अचंबित करणारी भव्यता छायाचित्रांत न सामावणारी ही तिची भव्यदिव्यता अनुभवण्यासाठी त्या भूमीवर प्रत्यक्ष पाऊल ठेवावेच लागते.

इजिप्‍तची खरी गोष्ट वाळवंटाच्या पलीकडे आहे, नाईल नदीच्या प्रवाहात आहे, कैरोच्या गजबजलेल्या रस्त्यांत आहे; भूमध्य समुद्राला तांबड्या समुद्राशी जोडणाऱ्या सुएझ कालव्यात आहे; हजारो वर्षांचा वारसा सोबत घेऊन आधुनिक जगात आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या इजिप्शियन समाजात आहे... अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला प्रवास कधी इतिहासाच्या खोल दरीत घेऊन जातो, कधी वर्तमानाच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आणून उभा करतो. इजिप्तमध्ये या दोन्हींचा अनुभव पावलोपावली येतो. तेथे इतिहास संग्रहालयात बंदिस्त नाही. तो रस्त्यांवर, वास्तूंमध्ये, बाजारपेठांत अन् नाईलच्या काठावर आम्‍ही अनुभवला. हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती जपणारा हा देश आधुनिक जगात आपले स्थान टिकवण्यासाठीही धडपडतो आहे.

Best Places to Visit in Egypt
Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

सुएझ कालवा व नाईल नदी

इजिप्तच्या जडणघडणीत निसर्गाची मोठी साथ आहे. एका बाजूला भूमध्य समुद्र, दुसरीकडे तांबडा समुद्र; मध्ये आफ्रिका व आशिया यांना जोडणारी भूमी. याच भौगोलिक रचनेतून सुएझ कालव्याचे महत्त्व उलगडते. युरोपमधून आशियाकडे जाणाऱ्या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालण्याची गरज या कालव्यामुळे कमी होते. जगातील सागरी व्यापाराचा मोठा हिस्सा या मार्गावरून जातो. एखाद्या देशाच्या भूभागावरून जाणारा जलमार्ग जागतिक अर्थव्यवस्थेच्या नाड्या कशा पकडू शकतो, याचे सुएझ कालवा हे ठळक उदाहरण आहे. इजिप्तची ताकद त्याच्या अर्थव्यवस्थेच्या आकारातच मोजता येत नाही. जगाला जोडणाऱ्या मार्गावर असण्याचेही स्वतंत्र सामर्थ्य असते. सुएझमुळे इजिप्तला हे सामर्थ्य लाभले आहे.

तर बहुतांश रखरखीत वाळवंट असलेल्या या भूमीत नाईल नदी जीवनाचा मुख्य आधार ठरते. शेती, पिण्याचे पाणी, वस्ती, वाहतूक आणि हजारो वर्षांची संस्कृती या साऱ्यांचा धागा या नदीशी जोडलेला आहे. नदीच्या दोन्ही काठांवर हिरवळ, काही अंतर पुढे गेले की पुन्हा वाळूचे साम्राज्य सुरू होते. नाईलच्या अस्तित्वामुळेच इजिप्तमध्ये मानवी जीवनाचा इतका मोठा पट विकसित होऊ शकला, हे स्‍थानिकांशी बोलताना जाणवते. तथापि, नदीचा प्रवाह देशाच्या सीमांपुरता थांबत नाही. नाईलच्या पाण्याचा उगम व प्रवास अनेक देशांशी संबंधित असल्याने त्याच्या वापरावरून तणाव समाजमनावरही दिसतो. या देशाने ग्रीक-रोमन व पुढे फॅरो राजवटीपासून इस्लामी कालखंड अनुभवला. आजचा इजिप्त प्रामुख्याने मुस्लिमबहुल देश आहे; त्याच वेळी त्याच्या भूमीवर प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची असंख्य चिन्हे उभी आहेत.

काही कट्टर धार्मिक प्रवाहांनी मूर्ती, मानवी आकृत्या वा काही धार्मिक स्थळांविषयी आक्षेप घेतले आहेत. मात्र, त्यावरून संपूर्ण इस्लामी समाजाची भूमिका ठरवता येत नाही. गाझा पट्टीशी असलेली सीमा, इस्रायल, अमेरिकेशी असलेले संबंध, पॅलेस्टिनी प्रश्‍‍न व अरब देशांशी असलेले राजनैतिक संपर्क यामुळे प्रादेशिक घडामोडींमध्ये इजिप्तची भूमिका महत्त्वाची ठरते. रास अल-हेकमा या किनारपट्टीवरील विकास प्रकल्पासाठी जाहीर झालेली ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक ही त्याचे उदाहरण आहे. मुबलक सूर्यप्रकाश, वाऱ्याची क्षमता लक्षात घेता, अक्षय ऊर्जा व हरित हायड्रोजन उत्पादनातही इजिप्तला भविष्यात मोठी संधी आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था, कर्जाचा बोजा यामुळे इजिप्तची आर्थिक स्थिती जागतिक वित्तीय संस्थांसाठीही महत्त्वाची ठरते.

जगण्याची धावपळ

इजिप्‍तचा आमचा प्रवास कैरोच्या धुळकट रस्त्यांपासून सुरू झाला तो गिझाच्या पिरॅमिड्सपर्यंत! खान अल खलिलीच्या गजबजलेल्या बाजारापासून राजांच्या दरीतील शांत थडग्यांपर्यंत. वाटेत प्रांतीय अनेक चेहरे समोर आले. इतिहास इथे दगडांत कोरलेला आहे; वर्तमान रस्त्यांवर धावत आहे. राजधानी कैरोत पोहोचल्यावर एखाद्या देखण्या, आखीवरेखीव शहराची अपेक्षा असेल तर ती पहिल्याच भेटीत बदलते. मातकट इमारती, वाहतुकीची लगबग, वाहनांचे आवाज अन् माणसांची सततची ये-जा. शहराचा पहिला ठसा काहीसा रांगडा आहे.

Best Places to Visit in Egypt
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

पण, कैरोला पहिल्या नजरेत जोखता येत नाही. जुन्या वास्तूंच्या शेजारी आधुनिक बांधकामे उभी आहेत. ऐतिहासिक बाजारपेठांच्या आसपास रोजच्या जगण्याची धावपळ सुरू असते. या सगळ्यांतून शहराची स्वतंत्र ओळख तयार होते. कैरोसमोर आज वाढती लोकसंख्या, रोजगार, वाहतुकीसह नागरी सुविधांची आव्हाने आहेत. प्राचीन इजिप्तच्या वैभवाची जगभर चर्चा होते; पण आजच्या इजिप्शियन माणसाच्या जगण्यातील प्रश्‍‍नही तितकेच महत्त्वाचे आहेत. इजिप्तची लोकसंख्या ११ कोटींपेक्षा अधिक आहे. तरुणांचे प्रमाणही मोठे व सोबत आव्‍हानेही.

गिझाचे पिरॅमिड्स

गिझाच्या पिरॅमिड्सकडे जाताना मनात अनेक कल्पना होत्या; पण प्रत्यक्ष समोर उभे राहिल्यावर त्या सगळ्या अपुऱ्या वाटल्या. हजारो वर्षांचा काळ मागे टाकून आजही दिमाखात उभ्या असलेल्या या वास्तूंची भव्यता पाहून थक्क व्हायला होते. नजर वर जाते, पण शिखर गाठत नाही. एवढे मोठमोठे दगड त्या काळात इथे आणले कसे असतील? त्यांची इतकी अचूक मांडणी करण्याचे कौशल्य कुठून आले असेल? पिरॅमिड्स म्हणजे केवळ दगडांच्या प्रचंड रचना नाहीत.

त्या प्राचीन इजिप्तच्या राजसत्तेचे सामर्थ्य, मृत्यूनंतरच्या जीवनाविषयीच्या श्रद्धा आणि मानवी कर्तृत्वाच्या अफाट क्षमतेची साक्ष देतात. ग्रॅनाइट व चुनखडीसारख्या दगडांचा वापर, वाळवंटातील कोरडे हवामान तसेच बांधकामातील भक्कम रचना यांमुळे या वास्तूंचे अस्तित्व हजारो वर्षे टिकून राहिले. आजही त्यांचे जतन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा आधार घेतला जातो. जगभरातून पर्यटक या प्राचीन वास्तू पाहण्यासाठी येतात. अमेरिकी, जपानी, कोरियन आणि श्रीलंकन पर्यटकांशीही आमची भेट झाली. प्रत्येक जण पिरॅमिड्सच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे टिपण्यात मग्न होता. मात्र, कॅमेऱ्यात क्षण टिपण्यापलीकडेही या वास्तूंचे आकर्षण आहे.

खान अल खलिली

प्राचीन वास्तूंच्या गंभीर वातावरणातून खान अल खलिली बाजारात प्रवेश केला की इजिप्तचा वेगळाच रंग दिसतो. अरुंद गल्ल्या, दुकानांची रेलचेल, हस्तकलेच्या वस्तू, दागिने, दिवे, कापड अन् पर्यटकांची गर्दी. कैरोतील बाजारपेठेत व्यापाराची जुनी परंपरा जाणवते. दुकानदारांचा ग्राहकांशी संवाद, वस्तू दाखवण्याची पद्धत, भाव करण्याची धावपळ विलक्षण अनुभव. भरभरून अगत्‍य. पर्यटकांसाठी हा आठवणींचा बाजार असतो; स्थानिकांसाठी रोजगाराचे साधन. इथल्या दुकानांत इजिप्तची पारंपरिक कला पाहायला मिळते. नक्षीदार पितळी दिवे, रंगीत काचेचे कंदील, पपायरसवरील चित्रे, चांदीचे दागिने, अत्तरे व विविध मसाल्यांनी दुकाने. काही वस्तूंवर प्राचीन इजिप्तची चिन्हे दिसतात. काहींवर अरबी कलाकुसर.

भारताच्या रुपयाच्या तुलनेत इजिप्तच्या पाउंडचे मूल्य कमी आहे; एका इजिप्शियन पाउंडची किंमत सुमारे १.८ भारतीय रुपयांच्या आसपास आहे. भारतीय पर्यटकांच्या दृष्टीने तिथे काही वस्‍तू स्वस्त जरुर आहेत. पण चांगल्या हॉटेलमधील निवास सुविधा महाग आहे. संपूर्ण देश स्वस्त आहे असे म्हणता येत नाही. तेथे अनेकांना हिंदी सिनेमांचे विलक्षण वेड असल्‍याचे पाहून आम्‍ही अचंबित झालो. भाषा वेगळी असली तरी संगीत आणि कथांतील भावना माणसांना जोडतात. भारतीय चित्रपटांचा प्रभाव देशाच्या सीमांपलीकडे किती दूरवर पोहोचला आहे, याची ही सुखद जाणीव.

Best Places to Visit in Egypt
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

व्हॅली ऑफ किंग्ज

लक्सरमधील व्हॅली ऑफ किंग्ज म्हणजे राजांची दरी, हे एक लक्षवेधी ठिकाण. गिझाच्या पिरॅमिड्ससारख्या भव्य वास्तू इथे दिसत नाहीत. रेवट, खडकाळ डोंगरांच्या कुशीत राजांच्या समाध्या कोरलेल्या आहेत. आमची जिज्ञासा अधिक वाढली होती. प्रत्‍यक्ष जागी गेल्‍यावर भिंतींवरची चित्रे, वेगवेगळी चिन्हे व लेखमुद्रा पाहायला मिळाल्‍या. जुन्‍या काळातील लोकांच्या श्रद्धा आणि त्यांच्या जगण्याविषयी चित्रे बोलतात. इथे फिरताना ‘द ममी’ चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

चित्रपटात दाखवलेली रहस्यमय थडगी व ममी पुन्हा जीवंत होण्याच्या कथा काल्पनिक असल्या तरी त्यामागची पार्श्वभूमी इजिप्तच्या खऱ्या इतिहासातून पुढे आलीय. त्‍यांना कल्पनेचे पंख मिळाले. प्राचीन इजिप्शियन लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता म्‍हणे. मृत्यूनंतरही माणसाचे अस्तित्व संपत नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे मृतदेह जतन करून ठेवणे, ममी तयार करणे, समाध्यांच्या भिंतींवर चित्रे काढणे यांना विशेष महत्त्व होते. तेथे अजून खोदकाम सुरू आहे.जगातील इतिहासकार,भाषातज्ज्ञ तेथील गूढतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण साडेचार हजार वर्षांचा, दाखल्यांचा अर्थ लावणे सोपे नाही.

अलेक्झांड्रिया शहर

कैरोच्या धावपळीपेक्षा अलेक्झांड्रियाचे रूप वेगळे आहे. अलेक्झांड्रिया व गोवा यांच्यात एक साम्य म्‍हणजे दोन्ही ठिकाणांना समुद्रकिनाऱ्याची लाभलेली साथ. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील कैतबे किल्लाही अलेक्झांड्रियाच्या इतिहासाची साक्ष देतो. जुन्या अलेक्झांड्रिया दीपगृहाच्या जागेजवळ उभारलेला हा किल्ला शहराची शान आहे. आज अलेक्झांड्रिया हे महत्त्वाचे बंदरशहर आहे. कैरोची धावपळ, गिझाचा वाळवंटी विस्तार, लक्सरचा प्राचीन वारसा अन् अलेक्झांड्रियाचा समुद्रकिनारा पाहिल्यावर हा देश एका प्रतिमेत सामावणारा नाही, हे कळले. इजिप्तमधील खाद्यसंस्कृतीही थोडी निराळी. गोव्यात शीतकढी, मासे आणि मसालेदार पदार्थांची सवय असल्याने इथले जेवण काहीसे वेगळे वाटणे स्‍वाभाविक होते. ब्रेड, कडधान्ये आणि भाज्यांचे पदार्थ अधिक.

डाळी, चणे, मॅकरोनी यापासून बनवलेला कोशरी नावाचा भात खूप लोकप्रिय. तामेया हा एक तळलेला पदार्थ, तर फुल मेडमेस हा शिजवलेल्या घेवड्यापासून बनवलेला पदार्थ लोकांचा आवडता. मांसाहारात कोफ्ता आणि कबाब, तर गोड पदार्थांत उम्म अली यांचा समावेश होता. कैरोसारख्या मोठ्या शहरात आधुनिक कपडे मिळतात. बहुतांश महिला हिजाब परिधान करतात. तर पुरुषांचा लांब, सैलसर गॅलाबेया हा पारंपरिक पोशाख असतो. तेथे ख्रिस्ती लोकसंख्या २५ टक्के आहे. कुरबुरी आहेतच. परंतु, या समाजाने तेथे वैविध्य आणले आहे.

Best Places to Visit in Egypt
Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

ख्रिस्ताच्या पालकांनी त्याला मारेकऱ्यांपासून दूर ठेवण्यासाठी तीस वर्षे येथे मुक्काम ठोकला होता. म्हणून या भूमीला पवित्र क्षेत्रही म्हटले जाते. अनेक संस्कृती तेथे अनुभवता येतात. बाजारपेठांमध्ये व जुन्या वस्त्यांमध्ये पारंपरिक वेशभूषा अधिक दिसते. पर्यटनस्‍थळी जगभरातून आलेल्या पर्यटकांचे विविध पोशाख नजरेस पडतात. सुंदर दौरा संपला, तरी मनात एक विचार रेंगाळतो - काळाच्या ओघात राजवटी बदलतात, शहरांचे चेहरे बदलतात; पण माणसाने निर्माण केलेल्या काही खुणा पुढील पिढ्यांना प्रश्‍‍न विचारत राहतात. इजिप्तच्या पिरॅमिड्सकडे पाहताना हा टप्‍पा अधिक गडद होतो- आजचा माणूस उद्याच्या जगासाठी कोणत्या खुणा मागे ठेवणार? आणि इथे गोवा आठवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com