'हात लावेन तेथे सोने' करण्याची धमक दाखवलेल्या 'भाजप'ला हरवण्यासाठी विरोधकांना 'एकी'चा मंत्र हवा! - संपादकीय

Goa Politics: स्वपक्षाची व्याप्ती आणि मर्यादा ओळखून युती केल्यास ती जास्त प्रभावी ठरते. प्रत्येक उमेदवार हा युतीचा आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

स्वपक्षाची व्याप्ती आणि मर्यादा ओळखून युती केल्यास ती जास्त प्रभावी ठरते. प्रत्येक उमेदवार हा युतीचा आहे, असे प्रत्येक पक्षाने समजणे हेच युती यशस्वी होण्याचे गमक आहे.

डेव्हिड आणि गोलियथ ही बायबलमधील अतिशय प्रसिद्ध कथा आहे. प्राचीन काळी इस्राइल आणि पॅलेस्टिन यांच्यात युद्ध सुरू होते. दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकतात. पॅलेस्टिन सैन्यात गोलियथ नावाचा एक राक्षसी, जवळजवळ ९ फूट उंच योद्धा असतो. तो रोज इस्राएली सैनिकांना हिणवतो, आव्हान देतो. डेव्हिड हा एक तरुण मेंढपाळ मुलगा.

तो युद्धभूमीवर भावांना अन्न देण्यासाठी आलेला असतो. तेथे तो गोलियथचे अपमानजनक बोलणे ऐकतो आणि त्याला राग येतो. आत्मविश्वासाच्या बळावर तो गोलियथशी सामना करण्याचा निर्णय घेतो. सैनिक म्हणतात, गोलियथ किती अवाढव्य आहे, त्याला कोण हरवणार? त्यावर डेव्हिड उत्तरतो, गोलियथ मोठा आहे म्हणूनच मी जे दगड भिरकावेन त्याचा नेम सहज लागेल आणि मी जिंकू शकतो. तो विश्‍वास सार्थही ठरतो.

ही कथा लहान, दुर्बळ वाटणारा नायक आणि मोठा, ताकदवान खलनायक यांच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. गोव्यातील राजकारणात अशाच बोधकथेची विरोधकांना गरज आहे. परंतु कळूनही वळत नाही. हात लावेन तेथे सोने करण्याची धमक दाखवलेल्या भाजपसमोर विरोधकांचा आत्मविश्‍वास रसातळाला गेला आहे. सत्ताधाऱ्यांना हरवायची खरीच इच्छा असेल तर विरोधकांना एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही.

एकीचे बळ असल्यास सत्ताही घडवता येते हे महाराष्ट्रात यापूर्वी शरद पवारांनी दाखवून दिले आहे. विभिन्न मतप्रवाहाचे पक्ष तेथे एकत्र आले होते. बेकी असल्यास पानिपत कसे होते हा धडा पंजाब व बिहार निकालाने दिला आहे. डिसेंबरात होऊ घातलेली जिल्हा पंचायत निवडणूक पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘वॉर्मअप’ मानता येईल. ‘एकत्र आल्यास भाजपचा पराभव करू शकतो’, अशा विधानांच्या पूर्ततेच्या दिशेने पहिले पाऊल ही युती ठरेल.

राज्यातील द्विस्तरीय रचनेत जिल्हा पंचायतींना फारसे अधिकार नाहीत; परंतु बरेच प्रस्थापित नेते हे अशाच निवडणुकांतून पुढे आले आहेत. मायकल लोबो, आलेक्स रेजिनाल्ड यांनी जिल्हा पंचायतींच्या शिड्या चढूनच विधानसभेची पायरी गाठली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने ५० पैकी ३६ जागा मिळवत निर्विवाद यश संपादन केले. हा पूर्वानुभव गाठीशी असल्याने विरोधकांनी आतापर्यंत एकत्र येणे अपेक्षित होते.

दिल्लीत धक्का मिळाल्यानंतर आपने स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांचा कॉंग्रेसवर विश्‍वास उरलेला नाही. दुर्दैवाने, त्या संदर्भात कॉंग्रेस नेतृत्वालाही विचार करावासा वाटत नाही. आपली जागा व्यापणारा पक्ष पिछाडीवर पडल्याचा आनंद कॉंग्रेस नेत्यांना दिसतो. भाजपला याहून वेगळे काय हवे? विरोधकांची मूठ आवळण्याआधीच सैल पडली.

Goa Politics
Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

गोवा फॉरवर्डने युतीचे महत्त्व ओळखून गोव्यात तसे प्रयत्न सुरू केले; कॉंग्रेसची साथ लाभली, पण रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे ‘तळ्यात मळ्यात’ सुरू आहे. विजय सरदेसाई याचे लक्ष्य पुढील विधानसभा आहे. त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केल्याचे इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रवेशाने दर्शवले आहे. कोणताही पक्ष मजबूत बांधणीसाठी पावले उचलणारच. इजिदोरना मोठी कारकीर्द लाभली आहे. त्यांच्या सहभागामुळे फॉरवर्डतर्फे भविष्यात काणकोणात तवडकरांसमोर आव्हान उभे राहील.

जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनी युती केल्यास जागावाटपासारख्या नेमक्या काय अडचणी येतात, भविष्यात कशी वाटचाल करावी लागेल, याचा अंदाज येऊ शकतो. तेव्हाच पाच महिन्यांनी पालिका निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम ठरू शकते. सराव आणि रंगीत तालीम यात फरक आहे. रंगीत तालमीपूर्वी सर्व नियोजन झालेले असावे लागते.

सरावात आवश्यक बाजू जमवून आणाव्या लागतात. कधीकाळी लोकसभेत अवघे दोन संख्याबळ असणाऱ्या भाजपने अन्य पक्षांचे बोट धरूनच बाळसे धरले. तो चाणाक्षपणा विरोधकांना न कळल्यास भविष्यात हाती फारसे लागेल, अशी सुतराम शक्यता नाही. कारण, कॉंग्रेस असो आरजी, आप किंवा गोवा फॉरवर्ड असो; त्यांचा ठरावीक जागी प्रभाव आहे. त्यांचा एकत्रित परिणाम राज्यस्तरावर नगण्य आहे. ही बाब लक्षांत घेऊन जिथे आपला प्रभाव नाही, तिथे तडजोड स्वीकारत पुढे जाणे श्रेयस्कर ठरते.

पण, तसे होत नाही याला कारण म्हणजे स्वत:च्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीना जास्त असलेला अहंकार. याच अहंकाराने क्षमतेची मर्यादा ओलांडली, की आत्मघात ठरलेला! स्वपक्षाची व्याप्ती आणि मर्यादा ओळखून युती केल्यास ती जास्त प्रभावी ठरते. प्रत्येक उमेदवार हा युतीचा आहे, असे प्रत्येक पक्षाने समजणे हेच युती यशस्वी होण्याचे गमक आहे.

Goa Politics
Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची होणार बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

पण, जिथे तिकिट नाकारल्यावर स्वपक्षाने जो उभा केला आहे त्याला आडवा कसा करायचा, याचे खेळ खेळले जातात तिथे युतीबाबत विचार करणेही चुकीचे ठरते. ‘भाजपला हरवण्यासाठी’ एकत्र येणे सोडून ‘स्वत: जिंकण्यासाठी’ एकत्र येणे गरजेचे आहे. इंदिरा गांधींना हरवणारे जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांना एकत्र राहणे जमले नाही. ‘हरवण्यासाठी’ एकत्र येणे आणि जिंकण्यासाठी एकत्र येणे, यात फरक असतो तो हाच! हरण्याआधीच हरलेले कधीच जिंकू शकत नाहीत! हेच डेिव्हडच्या त्या कथेतील वास्तव आणि आजच्या वास्तवातील कथा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com