Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

Goa Butterfly Species: हवेतून भिरभिरत उडताना फुलपाखरांनी आपल्या वैविध्यपूर्ण रंगांनी जगभरातील अभ्यासकांना भुरळ घातलेली आहे. एकापासून दुसरे फुलपाखरू भिन्न रंग व आकाराचे.
Goa butterfly species
Goa butterfly speciesDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्यात आढळणाऱ्या अनेक प्रजातींच्या फुलपाखरांची नावे, विशेषत: त्यांचा आकार, रंग तसेच उडण्याच्या क्रियेवरून ठेवण्यात आलेली आहेत. गोव्याला एका बाजूने घनदाट जंगलाने समृद्ध पश्चिम घाट लाभलेला असल्याने येथे प्रदेशनिष्ठ फुलपाखरे तर आढळतातच; त्याचबरोबर मोकळे पठार, माळराने, नदी नाले व समुद्र तटाच्या कुशीत काही अशी फुलपाखरे आढळतात ज्यांचे दर्शन परदेशांतही हमखास होते.

त्यांचा नैसर्गिक अधिवास दूर दूरवर पसरलेला आहे. कारण ही फुलपाखरे एकाहून अधिक प्रजातीच्या वृक्ष वनस्पतीवर अंडी लावून आपले जीवनचक्र पूर्ण करतात. त्यामुळे सुरवंटांना खाण्यासाठी योग्य असलेली वनस्पती कुठल्याही ऋतूमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता जास्त असते.

हवेतून भिरभिरत उडताना फुलपाखरांनी आपल्या वैविध्यपूर्ण रंगांनी जगभरातील अभ्यासकांना भुरळ घातलेली आहे. एकापासून दुसरे फुलपाखरू भिन्न रंग व आकाराचे. अशाच हजारो फुलपाखरांच्या प्रजाती व त्यांच्या रंग रूपातील वैविध्यपूर्ण रचना जवळून पाहण्याची त्यांना उत्सुकता झाली आणि एक एक करून त्यांना नावे लाभल्याने आज संपूर्ण जगाला त्यांची ओळख झाली.

पूर्वीच्या काळी अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही चालायची. राज्याच्या हुकुमावरून सर्व राज्याचा कारभार चालायचा. प्रजेला राज्यासाठी नतमस्तक व्हावे लागायचे. त्यामुळे राजा, राणी, व इतर मंत्र्यांना वेगवेगळ्या पदावर नियुक्त केले जायचे.

मोनार्क म्हणजे राजा हा सर्वोत्कृष्ट पदावर होता. त्यानंतर आपापल्या कार्य व उच्च कुटुंबांनुसार त्यांना ड्युक, बॅरन, बॅरोनेट अशा पदव्या दिल्या. राजेशाहीत माणसांमध्ये त्याच्या श्रेष्ठत्वासाठी पदानुक्रम करून विभाजन केले जात असे.

याच विचारांचा प्रभाव विशेषतः ब्रिटिश निसर्ग अभ्यासकांच्या मनावर पडला. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या श्रेणीच्या नावांचा साज घेऊन त्यांनी विविध फुलपाखरांचे नामकरण केले.

एखाद्या फुलपाखराकडे बघताना त्यांना त्यांच्यात धीटपणा व भरपूर वेळ दूर दूर वर उडण्याच्या क्षमतेने प्रभावित केले. त्याचबरोबर त्यांच्या रंगात तेजस्वी स्वरूप दिसू लागल्यावर आपल्या प्रदेशावर वर्चस्व मिळवणाऱ्या या फुलपाखरांना वरिष्ठ श्रेणीतील नावे देण्यात आली. त्यामुळे आज संपूर्ण जगात आढळणाऱ्या अनेक फुलपाखरांची ओळख राजेशाहीतील नावावरून झालेली पाहायला मिळते.

उत्तर अमेरिकेत एकाच वेळेस हजारोंच्या संख्येने फुलपाखरे एक एका झाडाला केशरी भडक रूपाने उजळून टाकतात. हे फुलपाखरू भरपूर किमी अंतरावर स्थानांतरण करण्यासाठी संपूर्ण जगात नावारूपास आलेले आहे. प्रचंड ताकद व राजाच्या मुकुटाप्रमाणे आकर्षित रंगातून अनेकांचे लक्ष वेधून घेण्याच्या क्षमतेमुळे या फुलपाखराला मोनार्क असे नाव देण्यात आले. हे फुलपाखरू दिसायला गोव्यातील स्ट्राइप्ड टायगर फुलपाखरासारखे दिसतात.

मोनार्क या पदावरून नावारूपास आलेले एक फुलपाखरू सोडले तर इतर पदावरून नावारूपास आलेल्या फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास गोव्यात आढळतो. त्यामुळे कुठे रस्त्याच्या कडेला, शेतात, भजीच्या मळ्यातदेखील त्यांचे दर्शन घडत असते.

ड्यूक या प्रमुख पदावरून गोव्यात आढळणाऱ्या एका फुलपाखराला रेड स्पॉट ड्यूक असे नाव देण्यात आले. त्याच्या पंखावरील टोकाजवळ असलेले लाल ठिपके लगेच आपले लक्ष वेधून घेतात.

मोनार्क व प्रिन्स यानंतर येणारे ड्यूक हे सर्वोच्च वंशानुगत पद मानले जायचे. त्यानंतर बॅरन व बॅरोनेट या एका पाठोपाठ येणाऱ्या पदाला भरपूर आदराचे स्थान लाभले होते. त्यांना लॉर्ड किंवा लेडी असे म्हणून आपले मत त्यांच्यासमोर मांडावे लागायचे. गोव्यात कॉमन बॅरन व गॉवडी बॅरन फुलपाखरे सर्वत्र आढळतात तर त्यांच्या तुलनेत बॅरोनेट फुलपाखरे कमी प्रमाणात आढळतात.

पूर्वी फुलपाखरांच्या प्रजातीवर सखोल अभ्यास करणारी माणसे विशेषत: नागरी सेवा किंवा सैन्य दलात नोकरी करायचे. त्यामुळे आपल्या सभोवताली असलेल्या परिसराचे भौगोलिक ज्ञान त्यांना होते. झाडाझुडपातून वाटचाल करत असताना विविध फुलपाखरे त्यांच्या नजरेस यायची. त्यांनी त्यांचे बारीक निरीक्षण केले.

फुलपाखरांची अनेक नावे ब्रिटिश नौदल सेनेतील अनेक पदावरून आलेली आहेत. पूर्वी नौदलीत कार्यरत असतात अनेक अभ्यासकांना समुद्री पक्ष्यांचे सतत दर्शन व्हायचे. त्यामुळे याच पक्ष्यांच्या नावावरून गोव्यातील काही फुलपाखरांच्या प्रजाती नावारूपास आलेल्या आहेत.

सीगल पक्षी हे भरपूर प्रमाणात समुद्री किनारी विसावलेले आढळतात. त्यांच्या पांढऱ्या रंगाशी साधर्म्य दर्शविणाऱ्या एका लहान फुलपाखराला त्यांनी कॉमन सीगल असे नाव दिले. या फुलपाखराला वरून पांढरा रंग असतो तर पंख बंद केल्यावर त्याचा पिवळा रंग नजरेस पडतो.

नदीच्या काठावर अनेक वेळा ती समूहाने क्षार शोषण करताना नजरेस पडतात. त्याचप्रमाणे अलबाट्रोस नामक अजून एक समुद्री पक्षी समुद्री मार्गातून प्रवासात करताना त्यांच्या पुन्हा पुन्हा नजरेस पडायचा. हा एक प्रवासी पक्षी आहे जो आपला सर्वाधिक काळ समुद्रातून दूरदूरचे अंतर पार पडण्यात घालवतो.

याच पक्ष्यावरून पांढरा पिवळा रंग असलेल्या एका फुलपाखराला त्यांनी अलबाट्रोस असे नाव दिले. त्याचे वरील पंख टोकदार व लांब असतात. त्याचप्रमाणे खालच्या भागास पिवळा व मरून रंग असलेल्या एका फुलपाखराला चॉकलेट अलबाट्रोस असे नाव प्राप्त झाले. अलबाट्रोस हे पक्षी सीगल पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे नावे ठेवतानासुद्धा आकाराचा विचार करून लहान प्रजातीच्या फुलपाखरांना कॉमन सीगल तर त्यांच्या पेक्षा मोठ्या आकाराच्या फुलपाखरांना अलबाट्रोस असे नाव दिले.

फुलपाखरांचा अभ्यास करणारे जे निसर्गवादी ब्रिटिश नौदल सेनेमध्ये होते, त्यांनी त्यांच्या शाखेतील पदवीनुसार फुलपाखरांना नावे दिली. कमांडर ही नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली पदवी असायची. यावरून केसरी व हिरव्या अशा नर व मादी फुलपाखरांमध्ये भिन्न रंग असणाऱ्या फुलपाखराला कमांडर असे नाव दिले.

Goa butterfly species
Butterfly Walk: ..पंख चिमुकले, निळेजांभळे! करमळी तळ्यावर फुलपाखरांचा उत्सव; बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर

जे नौदलात जहाज चालवण्याचे काम करायचे त्या नाविकांना सेलर असे म्हणायचे. काळ्या शरीरावर पांढरे पट्टे असलेले फुलपाखरू एका विशिष्ट पद्धतीने आपल्या डाव्या व उजव्या बाजूला हवेत तरंगत असल्यामुळे ते जणू होडीसारखे हालत डुलत उडत असल्याचे त्यांना दिसले तेव्हा त्याला सेलर असे नाव देण्यात आले.

सेलर सारखेच दिसणारे परंतु केशरी पट्टे असलेले अजून एक फुलपाखरू गोव्यात आढळते. त्याला लष्कर असे नाव दिले. पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने आशिया उपखंडातील काही लोकांना युरोप मध्ये जहाज चालण्यासाठी नियुक्त केले होते तेव्हा त्यांची ओळख लष्कर म्हणून होती.

Goa butterfly species
Tamil Yeoman Butterfly: गोव्यात बहुतांश देवरायांमध्ये आढळणारा 'खष्ट' वृक्ष, त्यावर दिसणारी 'तमिळ येओमन’ फुलपाखरे

सार्जंट ही पदवी ब्रिटिश लष्कर व हवाई दलात लहान गटाचे नेतृत्व करणाऱ्या शिपायाला दिली जायची. कॉमन सेलरसारखेच दिसणारे परंतु आकाराने मोठ्या असलेल्या फुलपाखराला सार्जंट असे नाव दिले. या दलातील युद्धनौकांना क्रूजर असे नाव होते.

ही जहाजे भरपूर वेगवान व ताकदवान असायची. हेच नाव एका लाल केशरी रंगाच्या सुंदर फुलपाखराला देण्यात आलेले आहे. हे फुलपाखरू गोव्यात सर्वत्र आढळते. कारण त्याच्या जगण्यासाठी उपयुक्त असलेली शेरवड नामक वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com