Cockroach Janata Party: 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' तरुणाईच्या नव्या आंदोलनाची काँग्रेसला धास्ती?

Congress Youth Support: देशभर चालू असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाचे नवोन्मेष समजून घेण्यासाठी प्रगल्भता लागते.
Congress Youth Support
Cockroach Janata PartyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राजू नायक

देशभर चालू असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाचे नवोन्मेष समजून घेण्यासाठी प्रगल्भता लागते. काँग्रेसकडे तिचाच अभाव असल्याने एक नवी शक्ती उदयास येऊन ती आपले स्थान हिसकावेल, याच भीतीने काँग्रेसला पछाडले आहे. त्यामुळे नव प्रतिभेची निर्भर्त्सना सुरू आहे.

काँग्रेस पक्षाची सध्या कसोटी आहे. केवळ निवडणुका जिंकण्याचीच नव्हे, तर आम जनतेच्या आकांक्षांशीही निगडित राहण्याची आहे. हा पक्ष नेहमी ती गोष्ट विसरला. जो राजकीय पक्ष स्वतःची ही कर्तव्ये, जबाबदारी विसरतो, तो जनतेच्या, मतदारांच्या विश्‍वासालाही पात्र रहात नाही. इतिहासाच्या अभ्यासक वन्या वैदेही भार्गव यांनी हाच मुद्दा अत्यंत खुबीने हल्लीच ‘हिन्दू’मध्ये मांडला आहे. विषय आहे कॉक्रोच जनता पक्षाचे जनआंदोलन. तरुणाईचे हे आंदोलन सरकारने दाबण्याचा कितीही प्रयत्न करुदे, ते आणखी उसळी मारते आणि भडकते. ते शमणार नाही. कारण तरुणाईचा हा उन्मेष आहे, ती केवळ राजकारणासाठी आंदोलनात उतरलेली नाही. आंदोलन हा तिचा नवआविष्कार आहे.

Congress Youth Support
Goa Development Architects: गोव्याचा विकास पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध हवा! CM सावंत यांनी अधोरेखित केले वास्तुविशारदांचे महत्त्व

केवळ भारतात तरुणाईला हा नवा उन्मेष सापडलाय असे नव्हे, तर जगभर तिचे आक्रंदन सुरू आहे. सुरवातीला बांगला देश, नेपाळ व आफ्रिकेसारख्या अपुऱ्या संधी उपलब्ध असलेल्या देशांमध्ये तिने पेट घेतला. त्यानंतर आपण पाहातो, गेल्या आठवड्यात फ्रान्स, पोर्तुगालमध्ये तिने शहरे पेटवली. त्यामुळे भारतातील तरुणाईला कुणी फूस देतोय, त्यामागे काही राष्ट्रविरोधी घटक आहेत, मुद्दाम हे लोण पसरविले जातेय, यात तथ्य नाही.

विशेषतः काँग्रेसने या आंदोलनाला दूषणे देणे सुरू केले, त्यांना अपशकून करणे सुरू केले तेव्हा तर कोणाचाही विश्‍वास बसेल, या आंदोलनामागे राजकीय शक्ती मुळीच नाहीत. जमलेच तर ही पेटून उठलेली तरुणाई स्वतःची वेगळी नवी शक्ती तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचीच धास्ती काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस पक्षाने सुरवातीला या आंदोलनामागे उभे राहण्याचा जरूर प्रयत्न करून पाहिला, परंतु जेव्हा तरुणाई बघत नाही, हे लक्षात आल्यावर, नव्याने हात पोळून घ्यायची त्यांची इच्छा नाही, हे त्यांना उमजले. म्हणजे ही नवी शक्ती काही काँग्रेसच्या बरोबर उभी राहणार नाही. ती स्वतंत्र मार्ग पत्करेल. आम आदमी पक्षाने पत्करला तसा. तो पक्ष आंदोलनातून पुढे आला व काँग्रेसच्या नाकावर टिच्चून काँग्रेसचेच बालेकिल्ले ढासळवत समांतर उभा राहिला.

कॉक्रोच जनता पार्टीचीही आंदोलनात्मक वाटचाल त्याच दिशेने सुरू राहाणार असेल, तर ते काँग्रेसला नवे आव्हान बनणार आहे. एका बाजूला आम आदमीची शक्ती क्षीण झाली, तर तिचा फायदा काँग्रेसला उठवता येणारच नाही. कारण तरुणाई सगळा प्रतिसाद स्वतःकडे वळवेल. कॉक्रोच जनता पार्टीचेही स्वाभाविक आहे. देशातील तरुणाई काँग्रेस पक्षाकडे सक्षम राजकीय पक्ष म्हणून पाहायलाच तयार नाही. देशातील अनेक निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आलाय. नुकत्याच तमिळनाडूत झालेल्या निवडणुकीत जेनझीच्या ६८ टक्के मतदारांनी विजय जोजेफ यांच्या तमिळगा वेट्री कझगम (टीव्हीके) पक्षाला मतदान करणे पसंत केले. तमिळनाडूच्या परंपरागत द्रविडी महाबलींना आव्हान देत विजय यांनी तेथे राजकारणाची नवी झुळूक निर्माण केली, ती त्यांनी तरुणाईची आक्रंदने समजून घेतली म्हणून! तरुणाईला केवळ नवी संधी, रोजगार एवढेच नाही तर सुशासनही हवे आहे हे त्यांनी नेमके ओळखले.

जेनझी नेत्यामध्ये तत्त्वनिष्ठेची अपेक्षा बाळगतात, हे तेथील राजकीय पंडितांनीही नोंदवून ठेवले आहे. राजकारणात होणाऱ्या सुधारणा व क्रांतिकारी बदलांची ही नांदी मानली जाते. वन्या भार्गव यांनी नेमकेपणाने हा विषय मांडला आहे व कॉक्रोच जनता पक्षाची निर्भर्त्सना करणाऱ्या काँग्रेसला कडक समज दिली आहे. ती म्हणते की, ‘मतचोरी’विरोधात जरूर लोक खवळले आहेत. सरकारविरोधात जाहीरपणे मतप्रदर्शन केले जात आहे. लोकशाही वाचविण्याची हाक प्रभावीपणे दिली जातेय. परंतु विरोधी पक्षांना या संधीचे योग्य भांडवल करता येत नाही. उलट कॉक्रोच जनता पक्षाविरोधातच काँग्रेसचे पाठिराखे गरळ ओकू लागले आहेत.

Congress Youth Support
Goa Dairy AGM Adjourned: मराठीत कामकाज नाकारल्याने गोवा डेअरीची सभा गुंडाळली! बेकायदेशीर नोटिशीवरूनही गदारोळ

काँग्रेस समज करून बसलाय की, युवा शक्ती राहुल गांधींबरोबर आहे. त्यामुळे जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी अवतीर्ण झाली तेव्हा भाजपा, संघ यांचीच ती निर्मिती आहे, किंवा ‘आप’नेच ती तयार केली आहे, असा आरोप झाला होता. तेव्हा काँग्रेस विसरली होती की,हे नवे आक्रंदन चिरडून टाकण्यासाठी भाजपाने सारी रणनीती तयार केली होती. प्रचंड दडपशाहीनंतरही तरुणांचा अंगार व्यक्त होत राहिला, त्यातून ही दुसरी ‘आप’ची आवृत्ती तयार होऊन काँग्रेसला आव्हान निर्माण होणार आहे, हे काँग्रेसने ताडलेच, शिवाय राहुल गांधींंचा पाठिराखा युवक त्यांच्याकडे ओढला जाईल या भीतीने नेत्यांनी तरुणाईची निर्भर्त्सना चालविली.

वन्याने म्हटले आहे की, युवक देशातील शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था व पायाभूत सुविधांबाबत अस्वस्थ आहे. सत्य बाहेर येऊ नये, दहशतीचे निर्माण व लोकशाही निषेधाचे सर्व मार्ग बंद करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात जेव्हा कॉक्रोच जनता पक्षाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले तेव्हा लोकशाहीला नवे अंकुर फुटले व अनेक वर्षांच्या शांततेत ज्यांनी माना टाकल्या होत्या - त्यांना नवसंजीवनी प्राप्त झाली. बिनदिक्कत बोलता येणे, मतभेद दर्शविणे व आक्रमक होणे - या प्रतिक्रियांना नवे बळ मिळावे. कॉक्रोच जनता पक्षाला त्याबद्दल निश्‍चित धन्यवाद द्यायला हवेत.

याचा अर्थ वन्या भार्गवने राहुल गांधींना कमी लेखलेले नाही. तिने २०२२च्या ‘भारत जोडो’चा उल्लेख केला, ज्यात मी स्वतः जम्मू येथे जाऊन राहुलजींबरोबर प्रत्यक्ष चालून अनुभव घेतला. ते लोकांना भेटत होते. ते पुण्यात जेन-झी तरुणींबरोबर बोलले, परंतु गोव्यात यात्रेत सहभागी होताना स्थानिक प्रश्‍न समजून घेण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. मडगावच्या सभेत आरजीचे आमदार वीरेश बोरकरना व्यासपीठावर स्थान मिळाले, परंतु त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. जनआंदोलनातून आमदारकीपर्यंत पोहचलेला तो तरूण आहे. लक्षात घेतले पाहिजे की, कॉक्रोच जनता पक्षाचे पाठिराखे तरुण जरी उच्चशिक्षित असले तरी गोव्यात आरजीच्या आंदोलनात सहभागी झालेला तरुण काँग्रेस पक्षाबाबत तिटकारा बाळगतो.

किंबहुना प्राप्त राजकीय परिस्थितीबाबत आरजीचे कार्यकर्ते कमालीचे उद्विग्न आहेत. त्यांचा पाठिराखा वर्ग कधीच काँग्रेसबरोबर जाणार नाही, कारण त्यांनी काँग्रेस राजवट पाहिली आहे आणि त्यांची ‘फुटीर’ मानसिकताही प्रत्यक्ष अनुभवली आहे. वीरेश बोरकर काँग्रेससोबत गेल्याने त्यांचा हा अस्वस्थ पारंपरिक मतदार त्यांना साथ करेल. उद्या मनोज परब स्वतःची ‘जुनी ओळख’ अधोरेखित करीत पुढे आले, तर आरजीचा पाठिराखा वर्ग काय प्रतिक्रिया देईल? मुळात काँग्रेस-आरजीची ही आघाडी याच ‘अविश्‍वासाच्या’ झुल्यावर हिंदकळते आहे!

युवकांना सोबत नेण्यासाठी काँग्रेसकडे कोणता कार्यक्रम आहे? कॉक्रोच जनता पक्षाचे पाठिराखे काँग्रेसबरोबर येणारच नाहीत. कॉक्रोच युवकांनी नागरिकांचे हितसंबंध अग्रक्रमाने पुढे आणले. त्यांच्या या तत्त्वांची निर्भर्त्सना केल्याने काँग्रेसवाल्यांचीच असुरक्षितता दिसली. टीका करणे समजू शकते, परंतु तरुणाईचे उन्मेष समजून न घेता, विधायक प्रतिसादाची तत्त्वे सुदृढ बनविण्यासाठी चाललेल्या चळवळीचे महत्त्व लक्षात न घेता वैयक्तिक आरोप करणे म्हणजे लोकशाहीवादी चेतनेची गळचेपी करणे आहे!

त्यातून राहुल गांधींचीही लोकप्रियता घटेल. कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ ही सच्ची लोकशाही आक्रंदने असून देशातील युवक आज अत्यंत समर्पित भावनेने त्यात गुंतला आहे. राहुल गांधींच्याही भावना तशा असू शकतात, परंतु त्यांच्याभोवती जमा झालेला खुशमस्कऱ्यांचा गोतावळा स्वार्थी, मतलबी तेवढाच संकुचित आहे. समाजमाध्यमांचा त्यांनी चालवलेला दुरुपयोग काँग्रेसचाही राजकीय दर्जा वाढवणार नाही. गोव्यातही दोन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल.

Congress Youth Support
Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

तरुणाईने उभे केलेले हे आव्हान प्रत्येक पारंपरिक राजकीय पक्षासाठी आहे. लोकशाहीचे हे आक्रंदन कोणाला थोपविता येणार नाही. काँग्रेसला, राहुलना युवा पाठिंबा आहे, असा त्यांचा दावा असेल, तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. त्याऐवजी कॉक्रोच जनता पक्षाने देशात नवे खुले वातावरण निर्माण करून युवकांना एक नवे व्यासपीठ तयार करून दिले व त्यांचे आंदोलन लोकांच्या प्रश्‍नांना धार निर्माण करीत आहे. काँग्रेसने अशा चळवळीला पाठबळ द्यावे. मार्गदर्शक बनावे. नव्या शक्ती उदयास येत असतील तर त्यांची कदर करावी. काँग्रेसलाही नवसंजीवनी त्यातून मिळेल. आज तरी युवा वर्ग सर्वांनाच ही स्फूर्ती देऊ लागले आहेत. काँग्रेसला हे जमले नाही तर ती त्यांच्यासाठी ‘विनाशकाले विपरीत बुद्धीच’ ठरेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com