

ज्येष्ठ वकिलांच्या पदनामाबाबत १५ मे २०२६ रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्य कांत यांनी काही व्यक्तींची झुरळांशी तुलना करणारे एक तोंडी निरीक्षण नोंदवले. ‘काही तरुण हे झुरळांसारखे असतात; त्यांना कसलाही रोजगार मिळत नाही, कोणत्याही व्यवसायात त्यांना स्थान नसते.
त्यातील काहीजण ‘मीडिया’ बनतात, काही ‘सोशल मीडिया’ बनतात, काही ‘आरटीआय (माहिती हक्क) कार्यकर्ते’ बनतात, तर काही इतर प्रकारचे कार्यकर्ते बनतात, आणि मग ते प्रत्येकावरच हल्ले करण्यास सुरुवात करतात... आणि तुम्ही लोक मात्र अवमान याचिका दाखल करत बसता,’ यावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाल्यावर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ मे २०२६ रोजी, सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, ‘ही टीका सर्वसामान्य तरुणांना उद्देशून नव्हती;
तर ती प्रामुख्याने अशा व्यक्तींवर होती, ज्या ‘बनावट आणि खोट्या पदव्या’ मिळवून, त्यानंतर कायदेशीर क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रांत प्रवेश करतात आणि संस्थांवर हल्ले करतात’. या स्पष्टीकरणाने ट्रोलचा झंझावात थांबला नाही तर यातून आभासी जगतात कोट्यवधी युजर्सचा पाठिंबा लाभलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा उदय झाला. एके काळी ‘मै चौकीदार हूॅं’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया मोहिमेला जसा प्रतिसाद मिळाला, त्याच प्रतीचा पण त्याही पेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद या ‘कॉक्रोच’ सोशल मीडिया मोहिमेला लाभला.
न्यायालयीन भाषेत नाही ‘कॉक्रोच’चा संदर्भ येत नाही, पण कॉर्पोरेट व्यवस्थापन चर्चित भाषेत नित्याने वापरला जातो. येथे हा संदर्भ का व कसा वापरला जातो, याचा थोडा विचार केल्यास, आपल्याकडील सत्तापक्षातील लोकप्रतिनिधी कर्मचारी निवड आयोगाला का विरोध करीत आहेत, याचे मूळ सापडेल. कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी वशिलेबाजी, घराणेशाही किंवा खुशामतखोरी यांना सर्वसाधारणपणे वापर वर्ज्य आहे.
तरी, अशा पद्धतीने तेथे कुणी नोकरी मिळविली किंवा नोकरीत टिकून राहण्यासाठी सदर पद्धतीचा वापर केल्यास त्याला ‘झुरळ-पद्धत’ अर्थात कॉक्रोच अप्रोच म्हणतात. ‘कॉक्रोच अप्रोच’ अंगिकारणाऱ्या व्यक्ती आपल्या असाधारण प्रतिभेवर, गुणवत्तेवर किंवा दृश्यमान कामगिरीचा उपयोग करण्याऐवजी ते, संस्थेच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्येच जास्त फोफावतात. तिथेच ते पडद्याआडचे व्यवहार, कानात कुजबुजली जाणारी आश्वासने व अनेकांशी अलिखित युती करून आपला कार्यभाग साधून घेतात, असा कॉर्पोरेट क्षेत्राचा समज आहे.
अशी झुरळे व्यवस्थापनात शिरली की, ते व्यवस्थापन कोसळते, असे त्यांचे निष्कर्ष आहेत. आता, आपल्याकडील सत्तापक्षातील लोकप्रतिनिधी कर्मचारी निवड आयोगाला का विरोध करीत आहेत, याच्या मुळाचा या ‘कॉक्रोच अप्रोच’ संबध जुळविण्याआधी, ज्याला कॉर्पोरेट जगतातले महागुरू म्हणतात त्या, गुगलचे मुख्य कार्याधिकारी सुंदर पिचाई यांचा ‘स्व-विकासाचा झुरळ सिद्धांत’ काय म्हणतो ते पाहूया.
सुंदर पिचाई यांनी एका प्रेरक भाषणात, ‘कॉक्रोच थेअरी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट’ म्हणजे ‘स्व-विकासाचा झुरळ सिद्धांत’ समजावून सांगितला. आपल्या जीवनशैलीत ‘प्रतिक्रिया व प्रतिसाद’ यातील फरक जाणून घेणे किती महत्वाचे आहे, हे पटवून देण्यासाठी हा किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलेला किस्सा हे प्रत्यक्षात चार्ली चॅपलीन यांच्या मूकचित्रपटातील एक दृश्य आहे.
हे दृश्य असे, की हॉटेलच्या टेबलवर बसलेल्या एका महिलेच्या प्लेटमध्ये एक झुरळ पडते, ती घाबरून किंचाळते व झुरळ फेकून देते, जे दुसऱ्या टेबलवर पडते. इथेही पहिल्या टेबलप्रमाणेच होते व पुढे ‘एका टेबलवरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्या , वैगेरे वैगेरे अशी साखळी वाढत जाऊन, झुरळासोबत कपाबशा फेकणे सुरू होते व टिपिकल चार्ली चॅपलीन महागोंधळ निर्माण होतो, असे ते चित्र आपल्या श्रोत्यांसमोर तयार करतात. इथपर्यंत चॅपलीन यांचे दृश्य संपते पण सुंदर पिचाई त्याला आपले म्हणून छोटेसे अधिकचे दृश्य जोडतात.
ते सांगतात, की शेवटी ते झुरळ हॉटेल वेटरच्या खिशात येऊन पडते. तो वेटर इतरांप्रमाणे कोणतीही आदळ-आपट करीत नाही, शांतपणे त्या झुरळाला चिमटीत पकडून खिशातून बाहेर काढतो व आत घेऊन जातो. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला तेथील सर्वजण फक्त प्रतिक्रिया देत राहिले, म्हणून गोंधळ झाला पण त्यातील एकाने स्थितीला प्रतिकूल प्रतिसाद दिला म्हणून गोंधळ संपला, असे त्यांचे तात्पर्य होते. प्रत्येकाच्या स्व-विकासात प्रतिक्रियेहून प्रतिसाद महत्वाचा आहे, असा त्यांचा संदेश होता.
आजचे मरण उद्यावर करता करता सरकारला कर्मचारी निवड आयोग अधिसूचनेची अंबलबजावणी करावीच लागली. या अंबलबजावणीसाठी पंतप्रधान कार्यालयाचा पाठपुरावा व आग्रह आता लपून राहिलेला नाही. आता कर्मचारी निवड आयोग म्हणजे काही सत्तापक्षाच्या लोकप्रतिनिधींना, आपल्या जेवणाच्या ताटात अचानक येऊन पडलेले ‘सुंदर पिचाईंचे झुरळ’ आहे, असे वाटते. त्यातूनच ते प्रतिक्रिया देत आहेत व यातून एक मोठा गोंधळ तयार होऊन, त्या गोंधळात या झुरळाला कुणीतरी चिरडून टाकावे, असे त्यांना वाटत असावे.
आता प्रतिक्रियेमागे आगोगाला विरोध कमी पण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची भीती जास्त आहे. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची भीती का वाटत आहे, आताचे मूळ कारण आहे, गोमंतकीय जनतेने या निवड आयोगाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद. आज गोमंतकीय जनता सुंदर पिचाईंच्या किश्श्यातील वेटरप्रमाणे या झुरळाला घाबरण्याची वस्तु मानत नाही, व तिला आपलेसे करीत आहे. याउलट आपल्या लोकप्रतींनिधीचे कार्यकर्ते हे नेहमी ‘कॉक्रोच अप्रोच’वरच जगले आहेत.
कॉर्पोरेट जगतात जे गुण वर्ज्य मानले जातात, नेमके तेच सगळे गुण त्यांच्याकडे असतात. असाधारण प्रतिभेवर, गुणवत्तेवर किंवा दृश्यमान कामगिरीचा उपयोग करून स्वत:चा व कुटुंबीयांचा विकास करणे, त्यांच्या तत्वज्ञानात बसत नाही. ‘आमचे काम होत नाही तर आम्ही तुमच्याबरोबर नाही’ अशी त्यांची नेहमी धमकी असते. लोकप्रतिनिधींचे ९० टक्के कार्यकर्ते हे केवळ मावळे असतात, नेत्याने ‘कावळा पांढरा असतो’ असे म्हटल्यास बिचारे तेही ‘कावळा पांढरा असतो’ असे म्हणतात.
राहिलेले १० टक्के कार्यकर्ते हे ‘कॉक्रोच अप्रोच’वाले असतात, व त्या ९० टक्के मावळ्यांच्या शेंड्या यांच्या हाती असतात. कॉर्पोरेट क्षेत्रात सांगितले जाणारे झुरळाचे सर्व गुणधर्म त्यांच्यात असतात. त्यांच्या ‘झुरळ प्रभावा’ची प्रशंसा व्हायला हवी, कारण त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना त्यांना अडगळ वाटणाऱ्या गोष्टीविरूढ आवाज उठविण्यास भाग पडले.
‘कॉक्रोच अप्रोच’चे हे एक चांगले उदाहरण आहे, जे सुंदर पिचाईंच्या ‘कॉक्रोच थेअरी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट’ला जोडून सांगितल्यास, आज आपल्या तरुणाईंच्या भविष्याला समाजातील कुठल्या झुरळाचा म्हणजे ‘कॉक्रोच’चा धोका आहे , हे कळून चुकेल. आयोगाला विरोध करणाऱ्यांनी पंतप्रधानांच्या पायावर डोके ठेवले, तरी पंतप्रधानांच्या भूमिकेत फरक पडणार नाही, कारण ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा गुजरात कर्मचारी निवड आयोग स्थापन करण्याचे क्रांतीकारी धाडस केले होते, व गुजरातची जनता त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.