Bicholim Municipal Council: डिचोलीतील राजकारणात कुणाचे फावले आणि कुणाचे गेले?

Bicholim Election Results: गेले दिड महिने डिचोली नगरपालिकेमध्ये बरेच राजकीय नाट्य सुरू आहे
 Goa politics
Goa politicsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा बळी दिला जातो तर कधी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा होतो. याचाच अनुभव हल्ली आला तो डिचोली नगरपालिकेच्या राजकारणात.

सर्वांना ठाऊक आहे की डिचोली तालुका हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. याच कारण म्हणजे पक्षाची इथे असलेली संघटना. गेली कित्येक वर्षे इथे भाजपचाच आमदार निवडून येत आहे किंवा अपक्ष आमदार निवडून आला तरी देखील त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा दिला जातो. परंतु गेले दिड महिने डिचोली नगरपालिकेमध्ये बरेच राजकीय नाट्य सुरू आहे.

या नाट्याची सुरुवात झाली ९ डिसेंबर पासून. डिचोलीची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा हीचा "नवा सोमवार" उत्सव. संपूर्ण डिचोली शहर या उत्सवाच्या आनंदी वातावरणात असतानाच एक धक्कादायक बातमी येऊन धडकली ती म्हणजे डिचोलीचे नगराध्यक्ष पुंडलिक उर्फ कुंदन फाळारी यांच्या विरुद्ध ९ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्याची.

डिचोलीवासियांसाठी हा धक्काच होता, कारण कुंदन फळारी हे डिचोलीतील प्रतिष्ठित नाव. सुस्वभावी, मनमिळावू, प्रामाणिक नगराध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती. दिवसभर सोडाच पण संध्याकाळी उशिरापर्यंत लोकसेवा करण्यासाठी नगरपालिकेत उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांच्या हृदयात एक जवळचे स्थान प्राप्त केलेली व्यक्ती आणि अशा व्यक्ती विरुद्ध अविश्वास ठराव तो देखील नवा सोमवार उत्सवाच्या मुहूर्तावर. यावर लोकांचा विश्वास बसेना. त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला.

सत्ताधारी पक्षातले ६ नगरसेवक विरोधी नगरसेवकांना जाऊन मिळाले, भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत फूट पडली. या अविश्वास ठरावामागे आमदारांचा हात आहे अशा एक ना अनेक चर्चा सुरू झाल्या. प्रकरण चिघळत हे लक्षात आल्यावर खुद्द मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं. त्यानंतर साखळी रविंद्र भवनमध्ये सर्व नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांनी खास बैठक घेतली व समेट घडवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही अंशी ते यशस्वीही झाले. अविश्वास ठराव बारगळला.

 Goa politics
Bicholim news today : मुख्यमंत्र्यांमुळे नगरसेवक पडले 'तोंडघशी'; अविश्वास ठराव प्रकरणात फळारींचे पारडे जड

या प्रकरणावर पडदा पडून सगळं काही ठीक होतंय असं वाटत न वाटतं तोच नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी पदाचा राजीनामा देत परत एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या राजीनाम्यामुळे परत एका चर्चेला सुरुवात झाली आणि भाजप पक्ष संघटनेत फूट असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले.

आता पुढील नगराध्यक्ष कोण? याची सर्वांना आतुरता लागली. कुंदन यांना राजीनामा देण्यास सांगितल्याने काही कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. तर डिचोलीतील काही ठिकाणी अशी चर्चा होती की कुंदन फळारी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला तर पुढील विधानसभा निवडणुकीत आमदरपदाचा दावेदार होऊ शकतात म्हणून नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव घातला गेला. करणे काहीही असो पण आता पुढचा नगराध्यक्ष योग्य पद्धतीने निवडण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

एका बाजूने नाराज कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूने नाराज नगरसेवक. यातच भाजप प्रदेशाध्यक्षांची धुरा दामोदर नाईक यांच्याकडे आली. सोबतच डिचोली नगराध्यक्ष निवडीचा दिवस ठरला बुधवार २२ जानेवारी २०२५. परंतु या निवडीच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी परत एकदा मुख्यमंत्री, नवीन प्रदेशाध्यक्ष, आमदार आणि सर्व नगरसेवक यांची मंगळवारी रविंद्र भवनमध्ये गुप्त बैठक झाली आणि एक मताने डिचोलीचे ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांची निवड नगराध्यक्ष पदी करण्यात आली.

विजयकुमार नाटेकर हे पक्षाचे प्रामाणिक आणि जेष्ठ कार्यकर्ते आहेत. बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येईलच. परंतु संघटनेमध्ये असलेली धुसफूस कमी झाली का? ते येणारी वेळच ठरवेल. आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीवेळी याचे चित्र स्पष्ट होईल.

विनायक सामंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com