
Bicholim Chairperson Safe By Cm Pramod Sawant Mediation
डिचोली: अविश्वास ठरावाची टांगती तलवार असलेले डिचोली पालिकेचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यावरील संकट टळल्यातच जमा असून त्यांची खुर्ची सुरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अविश्वास ठरावावरून निर्माण झालेला गुंता सोडविण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शिष्टाई सफल ठरली असून शहराच्या विकासासाठी एकसंध रहावे, असा सल्ला त्यांनी सर्व नगरसेवकांना दिला आहे.
अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी उपस्थित राहू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे अविश्वास ठरावावरून सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना सध्या ‘पूर्णविराम’ मिळाला आहे. डिचोलीच्या ‘नवा सोमवार’ उत्सवाच्या ऐन धामधुमीत नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या विरोधात नऊ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
वर्चस्व असलेल्या पालिकेत भाजप गटातच फूट पडल्याने भाजप गटात कमालीची खळबळ माजली होती. प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी डिचोली पालिकेतील अनपेक्षित घडामोडींची गंभीर दखल घेतली होती. डिचोली पालिकेतील सत्तांतर रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.
डिचोली पालिकेतील गुंत्यावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि डिचोलीतील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह चौदाही नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेऊन नगरसेवकांमधील मतभेद दूर केले.
नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वा. पालिका मंडळाची बैठक निश्चित करण्यात आली आहे. नगरविकास खात्यातर्फे तशी नोटीसही जारी करण्यात आली आहे. मात्र, आज झालेल्या घडामोडीनंतर मंगळवारी होणाऱ्या या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे हा ठराव बारगळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर मात्र अविश्वास ठराव दाखल केलेल्या काही नगरसेवकांचे चेहरे काहीसे पडले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.