Bicholim Municipality खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यापूर्वी आमच्यासह अन्य पिडीत घटकांच्या भवितव्याचा विचार करावा, असे साकडे वेदांता कंपनीने कामावरून कमी केलेल्या कामगारांनी डिचोली पालिकेला घातले आहे.
भवितव्याच्या काळजीने गलितगात्र बनलेल्या या कामगारांनी आज दुपारी डिचोली पालिकेवर धडक देत नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्याकडे आपल्या मागणीचा प्रस्ताव ठेवला.
गेल्या बुधवारी (ता. २६) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत एका नगरसेवकाने खाण कंपनीच्या समर्थनार्थ ठराव घेतल्याच्या वृत्तामुळे सेझाच्या कामगारांची अस्वस्थता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर या अस्वस्थ कामगारांनी आज डिचोली पालिकेवर धडक दिली.
या कामगारांनी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कामगारांची कैफियत मांडून एनओसी वा अन्य सहकार्य करण्यापूर्वी कामगार आणि अन्य घटकांच्या भवितव्याच्या विचार करावा, अशी मागणी लावून धरली.
पालिका मंडळाच्या बैठकीत खाण व्यवसायाच्या समर्थनार्थ एका नगरसेवकाने घेतलेला ठराव एकतर्फी असल्याची टीका या कामगारांनी करून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
कामगार संघटनेचे नीलेश कारबोटकर, किशोर लोकरे, बाबुसो कारबोटकर, अनिल सालेलकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कामावरून कमी केलेले शंभरहून अधिक कामगार उपस्थित होते.
‘आमच्यावर अन्याय करू नका’
खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, कामगारांवर अन्याय करून नव्हे. खाण व्यवसायामुळे आमच्या शेती - बागायती नष्ट झाल्या आहेत.
आता खाणीवरच आमचे आणि आमच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे, अशी व्यथा भीमाकर पळ आणि अन्य कामगारांनी मांडून खाणी सुरू करताना आमच्यावर अन्याय होता कामा नये, अशी आग्रही मागणी केली.
कामगारांना पालिकेचा पाठिंबा
नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी कामगारांची व्यथा जाणून घेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. बेरोजगार झालेल्या कामगारांना पालिकेचा पूर्ण पाठिंबा असून कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे यासाठी पालिका कंपनीकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.