जेव्हा मडगावच्या मैदानात घुमले 'भारत माता की जय'चे नारे: डॉ. ज्युलियांव आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या संघर्षातून उजळला क्रांतीचा मार्ग!

Goa Liberation Movement 1946: डॉ. ज्युलियांव यांनी डॉ. लोहियांना पोर्तुगीज सरकारने गोमंतकीय जनतेचे नागरी स्वातंत्र्य अव्हेरून, इथल्या जनतेची जी गळचेपी आरंभली त्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली.
Goa Liberation Movement
Goa Liberation MovementDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

डॉ. ज्युलियांव यांनी डॉ. लोहियांना पोर्तुगीज सरकारने गोमंतकीय जनतेचे नागरी स्वातंत्र्य अव्हेरून, इथल्या जनतेची जी गळचेपी आरंभली त्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे पोर्तुगीज सरकारविरुद्ध सविनय कायदेभंगाची चळवळ लोकशाही मार्गाने करण्याचे १८ जून, १९४६ रोजी निश्चित केले. त्यानुसार मंगळवारी मॉन्सूनच्या पावसाचा कहर सुरू असताना, गोवाभरातले पोर्तुगीज गुलामगिरीविरुद्ध चिडलेले लोकमानस भारावल्यागत मडगावी हजर झाले.

दरवर्षी १८ जून हा गोवाभर क्रांतिदिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो आणि पोर्तुगीजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून, गोवा मुक्त करण्यासाठी अपरिमित असा संघर्ष केलेल्या ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.

१८ जून १९४६ रोजी पोर्तुगीज सरकारच्या झोटिंगशाही आणि नागरी स्वातंत्र्याची जी गळचेपी आरंभली होती, त्याविरुद्ध झुंजारपणे आवाज उठवण्याच्या हेतूने मॉन्सूनचा पाऊस कोसळत असताना, गोमंतकीय लोकमानस संघटितपणे जयहिंद, भारत माता की जय अशा घोषणा देत मडगाव येथील मैदानात एकत्र आले.

आजच्यासारखी वाहतूक आणि दळणवळणाची विशेष साधनं उपलब्ध नसताना, गोमंतकीय लोकमानस आजिंतू कास्मिरु मौतेरोसारखा कर्दनकाळ सशस्त्र पोलिसांद्वारे दडपशाहीचे सत्र राबवत असताना, गोवा मुक्तीच्या ध्रुव ताऱ्याला समोर ठेवून आणि पायतळी अंगार सोसत झपाटल्यागत क्रांतीच्या अभियानात सहभागी होण्यासाठी आले.

सासष्टीतल्या साळ नदीकिनारी वसलेल्या कुंकळ्ळी गावातील झुंजार आणि निर्भयी पुरुषोत्तमांनी १५८३ साली धार्मिक आणि सांस्कृतिक छळवादाच्याविरुद्ध बंडाचे निशाण उभारून, अत्याचाराचा नंगानाच घालणाऱ्या धर्मगुरूंना मृत्यूधीन केले. त्यानंतर पोर्तुगीज सत्तेच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध ठिकठिकाणी उठाव झाले.

Goa Liberation Movement
Goa Agriculture: पाऊस काय पडेना! राज्‍यातील शेतकरी गलितगात्र! तरवा सुकला, खते मातीमोल; सर्वच पिकांना धोका

परंतु गोवा मुक्ती मृगजळच ठरली होती. १९२८ साली डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी गोवा राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बाणा आणि विचारधारा गोव्यात रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न आरंभले. लुईस द मिनेझिस ब्रागांझा यांनी हेराल्ड वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोर्तुगिजांनी गोमंतकीयांची आरंभलेली आर्थिक लूट वा अन्याय, अत्याचार असो त्याविरुद्ध बुलंदपणे आवाज उठवत, गोवा मुक्ती लढ्याला पोषक विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न आरंभला.

या पार्श्वभूमीवर असोळणा या गावी जन्माला आलेला तरुण जर्मनीतल्या बर्लिन विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेताना, अर्थ शास्त्राचे अध्ययन करणाऱ्या राम मनोहर लोहिया या समाजवादी विचारसरणीच्या तरुणाच्या संपर्कात आला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पुरस्कर्ता झाला. १९३० साली ‘लिग ऑफ नॅशन्स’च्या परिषदेत ब्रिटिश साम्राज्यवादाची हुजरेगिरी करणाऱ्या बिकानेरच्या महाराजाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवण्यासाठी पत्रके वाटून निषेध नोंदवून, युरोपियन साम्राज्यवाद आणि गुलामगिरीविरुद्ध आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली होती.

पोर्तुगीज राजवटीत गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि इथली प्रजा ही भारतीय आहे, अशी या भूमीची पूर्वापार असलेल्या अस्मितेच्या खाणाखुणा मिटवण्याचा चंग बांधलेल्या पोर्तुगीज सरकार आणि धर्मगुरु यांच्याविरुद्ध लढण्यासाठी डॉ. ज्युलियांव मिनेझीससारखे स्वाभिमानी गोमंतकीय दीपस्तंभासारखे उभे ठाकले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याबरोबर गोव्यात पोर्तुगीज सत्तेविरुद्धच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी सुरू असलेल्या चळवळीवर डॉ. ज्युलियांव लक्ष ठेवून होते.

विद्यार्थिदशेत बर्लिन विद्यापीठात शिकत असताना डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या कर्तृत्वाची झलक डॉ. ज्युलियांव यांना आली होती आणि तेव्हा सातत्याने चळवळी आणि अखंड धावपळीमुळे आजारी पडलेल्या डॉ. लोहिया यांना विश्रांतीची नितांत गरज असल्याने, त्यांना ते गोव्यात आपल्याबरोबर असोळण्याला घेऊन आले.

Goa Liberation Movement
Goa Health Services: राज्यात 'आयसीयू' सेवांना बळ, 'आयुर्वेद आरोग्य व्यवस्थापन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

तत्पूर्वी बर्लिन येथील वैद्यकीय क्षेत्रातले शिक्षण पूर्ण करून, जेव्हा ते गोव्यात परतले, तेव्हा त्यांनी असोळण्यात ग्रंथालय सुरू करून देशप्रेम आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यास प्रारंभ केला. पोर्तुगीज सरकारला याची कुणकुण लागताच, त्यांनी असोळण्यात क्रॉसची मोडतोड झल्याच्या प्रकरणाशी डॉ. ज्युलियांव यांचा संबंध जोडून, त्यांच्या ग्रंथालयावर छापा टाकून, ते बंद केले.

परंतु डॉ. ज्युलियांव मात्र त्यांच्या हाती गवसले नाहीत. त्यानंतर डॉ. ज्युलियांव मुंबईत गेले आणि तेथे गोमंतक प्रजा मंडळाची स्थापना १९३९ साली केली आणि आपले कार्य पुन्हा नेटाने आरंभले. आपली विचारधारा आणि गोवा मुक्ती चळवळीला चालना लाभावी म्हणून गोमंतक साप्ताहिक १९४२ साली सुरू केले.

साळ नदीच्या काठी वसलेल्या एकेकाळच्या निसर्गसंपन्न गावात डॉ. लोहिया यांना मनःशांतीबरोबर आरोग्यात योग्य सुधारणा होईल, अशा आशेने डॉ. ज्युलियाव असोळ्यात आपल्या घरी १० जून १९४६ रोजी घेऊन आले.

डॉ. लोहिया गोव्यात आल्याची बातमी जेव्हा १२ जूनच्या हेराल्ड दैनिकात प्रसिद्ध झाली, तेव्हा गोव्यातील पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढणाऱ्या गोमंतकीय नेत्यांना कळली आणि त्यांनी डॉ. लोहियाची भेट घेण्यासाठी असोळणा गाठले आणि डॉ. ज्युलियांव यांनी डॉ. लोहियांना पोर्तुगीज सरकारने गोमंतकीय जनतेचे नागरी स्वातंत्र्य अव्हेरून, इथल्या जनतेची जी गळचेपी आरंभली त्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे पोर्तुगीज सरकारविरुद्ध सविनय कायदेभंगाची चळवळ लोकशाही मार्गाने करण्याचे १८ जून, १९४६ रोजी निश्चित केले.

त्यानुसार मंगळवारी मॉन्सूनच्या पावसाचा कहर सुरू असताना, गोवाभरातले पोर्तुगीज गुलामगिरीविरुद्ध चिडलेले लोकमानस भारावल्यागत मडगावी हजर झाले. नागरी स्वातंत्र्याच्या लढ्याचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असणाऱ्या डॉ लोहियांना उपस्थित सभेत मार्गदर्शन करण्यापूर्वी पोर्तुगीज सशस्त्र पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कुळे रेल्वे स्टेशनवर नेऊन, त्यांना गोवा सोडण्यास भाग पाडले.

डॉ. लोहिया यांच्या व्यक्तिमत्वाने भारावलेले गोमंतकीय त्यांचे भाषण ऐकण्यास आतुर होते. परंतु त्यांना अटक झाल्याने, भाषण ऐकण्याचा जरी योग आला नसला तरी उपस्थितांना १८ जूनच्या सभेत सहभागी झाल्याने गोवा मुक्ती लढ्यासाठी त्यांना नवी ऊर्जा आणि दिशा लाभली. इतकी वर्षे पोर्तुगीज सरकारच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या स्वाभिमानी आणि भारतीय संस्कृतीच्या पुरस्कर्त्या गोमंतकीयांचे स्फूल्लींग १८ जून रोजी जागृत झाले. त्यानंतर गोव्यात नॅशनल काँग्रेस गोवा, आझाद गोमंतक दल, गोवा लिबरेशन आर्मी, रिव्हेंज पेट्रीयोट आदी संघटनांच्या चळवळीला गती लाभली.

डॉ ज्युलियांव यांच्यावर डॉ. लोहिया यांच्या देशप्रेम, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव पडला होता आणि कित्येक शतकाच्या गुलामगिरीत गलितगात्र झालेल्या आणि भारतीय भूमीपासून दूरावलेल्या आपल्या मातृभूमीला भारताशी एकरूप करायचे होते.

गोमंतकीय आणि भारतभरातील स्वातंत्र्य सैनिकांनी जिंकू किंवा मरू यांच्या ध्येयध्यासाने आरंभलेल्या सत्याग्रही चळवळी त्याचप्रमाणे गोवा लिबरेशन आर्मीसारख्या संघटनांनी आरंभलेल्या क्रांतिकार्याची दखल घेऊन, शेवटी भारत सरकारने ‘विजय ऑपरेशन’द्वारे सैनिकी कारवाई करून, गोव्याला १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त केले. गोवा मुक्तीचा ध्यास घेतलेल्या डॉ. ज्युलियांव आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेले स्वप्न याची देही, याची डोळी पूर्णत्वास आल्याचे सुख अनुभवता आले. २ जुलै १९८० रोजी डॉ. ज्युलियांव यांचे मुंबईत देहावसान झाले.भारतीयत्व, राष्ट्रप्रेम, समाजवाद, निधर्मी विचारधारा नसानसात भिनलेला सुपुत्र पंचत्वात विलीन झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com