Shigmotsav: 'ढोल-ताशांवरती काठी पडल्यावर संचारल्यागत झाला नाही तर तो गोमंतकीय कसला'? गोव्यातल्या शिगम्यातली वाद्ये आणि वादन

Goa shigmo festival musical instruments: शिगम्याच्या काळात विधी, परंपरा यांच्या सादरीकरणाला महत्त्व लाभलेले असून प्रत्येक प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकवाद्यांच्या वादनाला प्राधान्य दिलेले आहे.
Goa shigmo festival musical instruments
Goa shigmo festival musical instrumentsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातल्या कष्टकरी लोकमानसातल्या नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलागुणांचा आविष्कार घडवणारा शिगमोत्सव सध्या सुरू असून फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री शेणाने सारवलेल्या पवित्र मांडावरती परंपरेनुसार लोकनृत्याचे उत्स्फूर्त सादरीकरण झालेले आहे.

गोव्यातल्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या महालांवरती पोर्तुगिजांची साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ तर नव्या काबिजादीतल्या सत्तरी, सांगे, डिचोली, पेडणे, केपे आणि काणकोण महालांवरती दीड-दोनशे वर्षांच्या आसपास सत्ता राहिली.

पोर्तुगिजांनी इथल्या लोकमानसाच्या धार्मिक, सांस्कृतिक व्यवहारांवरती कडक निर्बंध घातले. त्यांचा उत्सव, परंपरांचे समूळ उच्चाटन करण्याचा वारेमाप प्रयत्न केला; परंतु असे असताना शिगम्याचे लावण्य, वैविध्य यांचे समृद्ध संचित नष्ट करणे त्यांना जमले नाही.

पोर्तुगीज धर्माधिकार्‍यांनी इथल्या सक्तीने धर्मांतरित केलेल्या लोकांना आपल्या चालीरीती, संस्कृती स्वीकारण्यासाठी

आग्रह धरला, ते उत्सवात सहभागी होणार नाहीत याची दक्षता घेतली; परंतु असे असताना ढोल-ताशांवरती काठी पडल्यावर संचारल्यागत झाला नाही तर तो गोमंतकीय कसला? चर्चमध्ये जाणारा धर्मांतरित ढोल-ताशासारख्या लोकवाद्यांचे ध्वनी कानावरती पडल्यावरती उपजतच त्याचे हात, पाय थिरकायचे.

त्यामुळे कुठे इंत्रुज, कुठे इंत्रुमेजसारख्या लोकोत्सवांतून लोकवाद्यांच्या वादनाची अभिरुची आणि कौशल्य त्यांनी आत्मीयतेने जतन करून ठेवले. आज सासष्टीतल्या ग्रामीण भागात कष्टकरी ख्रिस्ती जमातींत इंत्रुज असो अथवा कार्निवलच्या उत्सवांच्या माध्यमातून ढोल, घुमट, म्हादाळे, समेळ आदी चर्मवाद्यांचे त्याचप्रमाणे कासाळे यांच्या वादनाची परंपरा अनुभवायला मिळते.

शिगम्याचा लोकोत्सव हा लोकवाद्य, लोकनृत्य, लोकगीते यांच्या आविष्काराचा पर्वकाळ आहे. महाशिवरात्रीला ढोल-ताशांवरती काठी मारून शिगम्याची पूर्वतयारी सुरू होते आणि त्यानंतर फाल्गुन पौर्णिमेला चार-पाच दिवस असताना नृत्य, गायन, वादन यांचे सादरीकरण शिगेला पोहोचते.

शिगम्याच्या काळात विधी, परंपरा यांच्या सादरीकरणाला महत्त्व लाभलेले असून प्रत्येक प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकवाद्यांच्या वादनाला प्राधान्य दिलेले आहे. शिगम्यात अंत्रुज महाल आणि त्याच्या परिसरात असलेल्या गावोगावी ढोल, तासो, कासाळे, घुमट, समेळ अशा लोकवाद्यांचा कुठे आणि कसा वापर करावा याचे पारंपरिक नियम ठरलेले आहेत.

बैलाच्या चामड्याने मढवलेला ढोल, बकर्‍याच्या चामड्याचा जोड समेळ, घोरपडीच्या चामड्याचे घुमट आदी चर्मवाद्ये रोमटामेळात वाजवताना वादक अक्षरशः देहभान विसरून लोकसंगीताच्या आविष्काराशी एकरूप होऊन जातो.

डिचोली, फोंडा तालुक्यात शिगम्याच्या काळात गड्यांचा उत्सव होतो, तेव्हा लोकगीतांनी युक्त नमन गायनात ढोल कसा वाजवायचा, देवचार गडे सुपूर्द करण्याची सूचना देतो तेव्हा ढोलूक वाजवत कसे जायचे हे चर्म वाद्यांचे वादन कौशल्य महत्त्वाचे असते.

तिसवाडीतल्या मंडूर गावातल्या डोंगरीकरांच्या शिगमोत्सवावरती पोर्तुगिजांनी बंदी घातली म्हणून इथले लोककलाकार मूग गिळून गप्प बसले नाहीत. त्यांनी इंत्रुज नावाने परवानगी मिळवून, महाशिवरात्रीच्या पूर्वी जुवारी नदीच्या खाड्यांनी आणि सुपीक खारभूमींनी वेढलेल्या डोंगरीत सादर केला तो लोकनृत्य, लोकसंगीत यांचा जल्लोषच, इथल्या इंत्रुजोत्सवातल्या सुवारीचे सादरीकरण षष्ठी शांतादुर्गेच्या आशीर्वचनात अनुभवताना विलक्षण भावतल्लीनता प्राप्त होते.

डोंगरी-मंडूर, आडपई या ठिकाणच्या सुवारीप्रसंगी केले जाणारे लोकवाद्यांचे वादन इथल्या कष्टकर्‍यांच्या जीवनात लय, ताल, नाद यांना असलेले स्थान अधोरेखित करते.

काणकोणात मल्लिकार्जुन देवाच्या कृपेने सादर होणारा वीरामेळ असो अथवा सह्याद्रीच्या माथ्यावरती असलेल्या नुंदेच्या महामायेच्या सावलीत होणारे वादन, आपणाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. काणकोणात श्रीस्थळ, गावडोंगरी आणि अवे येथील शिशारान्नीत, तीन मानवी मस्तकांच्या चुलीवरती शिसवी लाकडांनी प्रज्वलित अग्नीवरती चरू शिजवतानाचे लोकसंगीत भिन्न असते. त्या संगीताच्या ध्वनीतून त्या उत्सवामागच्या गूढरम्यतेचे असलेले वलय दृग्गोचर होते.

Goa shigmo festival musical instruments
Goa Shigmotsav: यंदापासून वाळपईचा शिमगोत्सव सात दिवसांचा! वाळपई मासोर्डेची आज घोडेमोडणी; रात्रीपासून करवल्या उत्सवास प्रारंभ

सत्तरीत कधीकाळी पती निधनानंतर धगधगत्या चितेत उडी मारून सती गेलेल्यांच्या स्मरणार्थ करवल्यांचा उत्सव साजरा होतो. त्यावेळी सतीविषयक लोकगीतांचे गायन जतीतून ढोल-ताशांच्या संगीतावरती सादर होते. पारंपरिक जतीतल्या शब्दकळेवरती आणि ढोल-ताशाच्या संगीताच्या पार्श्वभूमीवरती जुन्या काळातली सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समूर्त केली जाते.

Goa shigmo festival musical instruments
Sarvona Shigmotsav: ‘गावात पेटली होळी, विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी'! सर्वण गावातील अनोखी परंपरा..

देवळाच्या दारात चाफा ही लाविला

त्याची रे हिरवी पाने

आनी पिवळी चाफे

त्यांचा रे गुंतिला हार

आनी करूल्यो मायेक घातिला

हय रामा ।

अशा सकारतीचे गायन ढोल, कासाळे ताशा यांच्या वादनावरती रंगत जाते. गोव्यातल्या नानाविध लोकवाद्यांच्या संगीताची अनुभूती शिगम्यात आविष्काराचे आगळे वेगळेपण देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com