AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

AI Human Control Need: कृत्रिम बुद्धिमत्तेने अर्थात ‘एआय’ने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
AI Human Control Need
AI Human ControlDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कृत्रिम बुद्धिमत्तेने अर्थात ‘एआय’ने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आरोग्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग, संरक्षण आणि दैनंदिन जीवन अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या अमर्याद क्षमतेसोबत त्याच्या गैरवापराची भीतीही वाढत आहे.

गरज आंतरराष्ट्रीय सहकार्याची

खरा प्रश्‍न ‘एआय’ किती शक्तिशाली होईल, एवढाच नाही; तर ती शक्ती कोणाच्या हातात असेल आणि तिच्यावर नियंत्रण कोणाचे असेल, हा आहे. स्वायत्त शस्त्रप्रणाली, सायबरहल्ले, जैविक धोक्यांशी संबंधित संशोधन, बनावट माहिती आणि मानवी निर्णयप्रक्रियेवर होणारा प्रभाव यामुळे ‘एआय’चा गैरवापर गंभीर परिणाम घडवू शकतो. त्याच वेळी ‘एआय’ला केवळ धोक्याच्या चष्म्यातून पाहणेही योग्य नाही. कर्करोगाचे निदान, औषधनिर्मिती, हवामान संशोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत ‘एआय’ मानवासाठी मोठी मदत ठरू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाला थांबविण्याऐवजी त्याच्या वापरासाठी स्पष्ट नियम, पारदर्शकता, मानवी देखरेख आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे.

AI Human Control Need
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

पर्याय की साधन?

‘एआय’च्या विकासाचा वेग प्रचंड आहे; त्याच्या नियंत्रणासाठीची व्यवस्था मात्र त्याच वेगाने विकसित झाली पाहिजे. भविष्यातील संकट टाळण्याची जबाबदारी केवळ तंत्रज्ञान कंपन्यांची किंवा सरकारांची नसून संपूर्ण जागतिक समुदायाची आहे. ‘एआय’ मानवाचा पर्याय बनणार की मानवाच्या प्रगतीचे प्रभावी साधन ठरणार, हे शेवटी आपण त्याचा वापर कसा आणि कोणत्या मर्यादेत करतो यावर अवलंबून आहे.

दृष्टिकोनात झालेला बदल

बिल गेट्स हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ‘एआय’मुळे रोगांवर नियंत्रण मिळवता येईल आणि लोकांचे जीवन सुधारेल, असा त्यांचा आधी विश्वास होता. परंतु, ‘एआय’च्या वाढत्या क्षमतेमुळे त्यांनी स्वतः कबूल केले की, मी पहिल्यांदाच अशा समस्येचा सामना करत आहे, ज्यावर केवळ नवीन संशोधनाद्वारे तोडगा काढणे कठीण वाटत आहे. या विधानामुळे सध्या जागतिक स्तरावर ‘एआय’च्या सुरक्षिततेसाठी आणि त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक नियम लादण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवजातीसाठी अभूतपूर्व संधी घेऊन आली असली, तरी तिच्या गैरवापराचे संभाव्य परिणाम तितकेच भयावह ठरू शकतात. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘एआय’च्या वाढत्या सामर्थ्याबाबत चिंता व्यक्त करताना, हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडल्यास किंवा अनिर्बंधपणे वापरले गेल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर मानवी जीवितहानी होऊ शकते, असा इशारा दिला आहे. ही संख्या सुमारे एक अब्जापर्यंत जाऊ शकते, असे भाकीत त्यांनी केले आहे. त्यामुळे ‘एआय’चा विकास केवळ वेगाने नव्हे, तर सुरक्षितता, नैतिकता, मानवी नियंत्रण आणि जागतिक नियमांच्या चौकटीत करण्याची गरज अधोरेखित होते.

चिंतेची मुख्य कारणे

नियमनाचा अभाव

तंत्रज्ञान जगतात ‘एआय’च्या धोक्यांवर चर्चा होत असली, तरी जागतिक स्तरावर यावर कडक नियम किंवा कायदे बनवण्याबाबत अद्यापही पुरेशी पावले उचलली गेलेली नाहीत.

जागतिक स्पर्धा

जगातील अनेक देश आणि संस्था या तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्याऐवजी केवळ एकमेकांपेक्षा पुढे जाण्याच्या स्पर्धेत गुंतल्या आहेत, जी एक धोक्याची घंटा आहे.

घातक शस्त्रांहून भयंकर

जर ‘एआय’चा गैरवापर सायबर हल्ले, जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती किंवा युद्धांमध्ये केला गेला, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील.

AI Human Control Need
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

काय करता येईल?

जागतिक ‘एआय’ करार

संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत ‘एआय’च्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी सर्वमान्य आंतरराष्ट्रीय नियम तयार करणे.

कंपन्यांची जबाबदारी निश्चित करणे

‘एआय’ विकसित करणाऱ्या कंपन्यांवर सुरक्षा, पारदर्शकता आणि गैरवापर रोखण्याच्या स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करणे.

सुरक्षा चाचण्या आणि ऑडिट

अत्यंत शक्तिशाली ‘एआय’प्रणाली सार्वजनिक वापरात आणण्यापूर्वी स्वतंत्र सुरक्षा चाचण्या, जोखीम मूल्यांकन आणि नियमित ऑडिट बंधनकारक करणे.

मानवी नियंत्रण अनिवार्य करणे

युद्ध, अण्वस्त्रे, आरोग्य आणि इतर जीवन-मरणाचे निर्णय पूर्णपणे ‘एआय’वर सोपवू नयेत.

सायबर व जैविक गैरवापर रोखणे

‘एआय’चा वापर सायबर हल्ले, जैविक शस्त्रे किंवा मोठ्या प्रमाणावरील हिंसाचारासाठी होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय देखरेख व्यवस्था उभारणे.

देशांमध्ये माहितीची देवाण-घेवाण

‘एआय’शी संबंधित धोकादायक घटना, सुरक्षा त्रुटी आणि गैरवापराची माहिती देशांनी परस्परांना तातडीने देणे.

आंतरराष्ट्रीय निरीक्षण संस्था

‘एआय’च्या अत्यंत शक्तिशाली प्रणालींच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था किंवा स्वतंत्र आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारण्याचा विचार करणे.

स्वायत्त घातक शस्त्रांवर नियंत्रण

मानवी हस्तक्षेपाशिवाय लक्ष्य निवडून हल्ला करणाऱ्या शस्त्रप्रणालींच्या विकास आणि वापरावर कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणणे.

(‘एआय’चा विकास थांबवणे हा व्यवहार्य उपाय नाही; मात्र त्याचा वेग आणि मानवी नियंत्रण यांच्यात समतोल राखणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या क्षमतेपेक्षा त्याच्या वापरासाठी तयार केलेली जागतिक सुरक्षा-व्यवस्था अधिक महत्त्वाची ठरणार आहे.)

AI Human Control Need
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

आंतरराष्ट्रीय नियंत्रण व्यवस्था उभारावी

बि ल गेट्स यांच्या वक्तव्याकडे मी एखादी सनसनाटी बातमी म्हणून पाहत नाही, तसे करणे मोठी गल्लत ठरेल. माझ्या दृष्टीने गेट्स यांनी आपल्या आजच्या जागतिक व्यवस्थेच्या भोंगळपणावर ओढलेला एक सणसणीत आसूड आहे. आज आपण एकविसाव्या शतकातील अत्यंत प्रगत आणि अफाट ताकदीची कृत्रिम प्रज्ञा हाताळत आहोत, पण तिच्यावर नियंत्रण ठेवणारी आपली प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्था मात्र आजही विसाव्या शतकातीलच कुचकामी आहे.

कृत्रिम प्रज्ञेचे परिणाम मानवी आकलनाच्या आणि भौगोलिक सीमांच्या पूर्णपणे पलीकडचे आहेत हे आपल्याला ज्ञात आहे. एका बाजूला हे तंत्रज्ञान वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रात थक्क करणारी क्रांती घडवत आहे, तर दुसऱ्या बाजूला विनाशाचे भयानक धोकेही संपूर्ण जगभर पसरवत आहे. आतापर्यंत तहान लागल्यावर विहीर खोदण्याची आपली वृत्ती होती, म्हणजे, एखादे तंत्रज्ञान आल्यानंतर त्यासाठी कायदे बनविले जायचे, पण आता ही चालढकल पूर्णपणे आत्मघातकी ठरेल. केवळ अमर्याद गती आणि नफ्याच्या हव्यासापोटी धावणाऱ्या बेबंद कॉर्पोरेट मानसिकतेच्या वेदीवर आपण जागतिक सुरक्षेचा आणि मानवाच्या भवितव्याचा बळी नक्कीच देऊ शकत नाही.

आज या अवाढव्य आणि गुंतागुंतीच्या प्रणालींची सूत्रे जगातल्या मूठभर बलाढ्य खासगी कंपन्यांच्या हातात एकवटली आहेत. ‘नफ्याचे खासगीकरण’ आणि ‘धोक्यांचे मात्र जागतिकीकरण’, अशी ही अत्यंत विदारक आणि विषम परिस्थिती आहे. अशा वेळी केवळ नैतिकतेच्या गप्पा मारून किंवा तत्त्वज्ञानाची उजळणी करून वेळ मारून नेता येणार नाही. अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी जसे कठोर जागतिक करार झाले, अगदी तशीच कायदेशीर कारवाईची ताकद असलेली एक भक्कम आंतरराष्ट्रीय नियंत्रण व्यवस्था आज उभी करणे ही काळाची नितांत गरज आहे. या तंत्रज्ञानामागील अल्गोरिदमची पारदर्शकता, डेटाचा अनिर्बंध वापर आणि त्यासाठी लागणाऱ्या अफाट संगणकीय क्षमतेवर जागतिक पातळीवर कडक निर्बंध आणायलाच हवेत.

AI Human Control Need
Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

मुळात, तंत्रज्ञानाची प्रगती आणि मानवी सुरक्षा या काही परस्परविरोधी गोष्टी नाहीत. तंत्रज्ञान सुरक्षित असेल, तरच त्याचा शाश्वत आणि खऱ्या अर्थाने मानवी कल्याणासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जगातल्या धोरणकर्त्यांनी आता केवळ विकासाच्या वेगामागे आंधळेपणाने न धावता, मानवी अधिकारांचे रक्षण करणारे आणि या महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांना जबाबदार धरणारे स्पष्ट कायदे तातडीने अमलात आणले पाहिजेत. हे प्रगत तंत्रज्ञान माणसाचा भस्मासुर न बनता त्याच्या नियंत्रणाखालीच राहावे, यासाठी जागतिक प्रशासकीय व्यवस्थांचे आधुनिकीकरण करणे, हाच विनाशाच्या उंबरठ्यावरून एका सुरक्षित आणि शाश्वत भविष्याकडे जाणारा एकमेव मार्ग आहे.

- विवेक सुतार,

कृत्रिम प्रज्ञा धोरण अभ्यासक व संशोधक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com