Goa Politics: गोव्यात विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतील? विशेष लेख

Goa Opinion: आता या अंधारात एकच लुकलुकणारा काजवा दिसत आहे आणि तो म्हणजे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई.
Goa political updates
Vijai Sardesai, CM Pramod Sawant, Amit Palekar Canva
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

दिल्लीच्या निवडणुकीत बारा वर्षे सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला. काँग्रेस आणि आम आदमी एकत्र आले असते तर आम आदमी पक्षाचा असा ‘सुपडा साफ’ झाला नसता, असे म्हटले जाते. आकडेही हेच दर्शवतात. युती झाली असती तर आम आदमी पक्षाच्या कमीत कमी दहा ते बारा जागा वाढू शकल्या असत्या, असे चित्र सांगते.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव टळू शकला असता. केजरीवाल यांचा चार हजार मतांनी पराभव झाला आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना मिळाली साडेचार हजार मते.

आता ही साडेचार हजार मते केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरली असे म्हटले तर ती चूक म्हणता येणार नाही. अर्थात अशी आकडेमोड नेहमीच खरी ठरते असेही नाही. पण युती झाली असती तर आम आदमीबरोबर काँग्रेसच्या आशांनाही वाव होता असे म्हणायलाही बरीच जागा आहे

आज भाजप अत्यंत बलाढ्य होत चालला आहे. सत्ता व पैशाबरोबरच योग्य रणनीती आखणारे तज्ज्ञही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे या पक्षाला हरवणे वाटते तेवढे सोपे नाही. एका पक्षाचे तर ते काम नव्हेच. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे बऱ्यापैकी ऐक्य झाले होते आणि त्यामुळेच भाजप ३०३ वरून २४०पर्यंत घसरला होता.

पण या अपयशाची दखल घेऊन भाजपने आपली रणनीती बदलली. या बदलत्या रणनीतीचा प्रत्यय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आला. लोकसभा निवडणुकीत हातातून गेलेला महाराष्ट्र, भाजपने परत आपल्या कह्यात आणून दाखवलाच. पण महाराष्ट्रातील अपयशसुद्धा विरोधीपक्षाला धडा शिकवू शकले नाही. दिल्लीत आम आदमी व काँग्रेस एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. याचा परिणाम आम आदमी पक्षाच्या हातातून सत्ता जाण्यात झाला.

आता सर्वांचे लक्ष २०२७साली गोव्यात काय होणार यावर लागून राहिले आहे. आम आदमी, तृणमूल, गोवा फॉरवर्ड व काँग्रेस एकत्र आल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दक्षिण गोवा जिंकू शकला होता हे विसरता कामा नये. पण आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची युती होईल की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे.

म्हणूनच तर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्याचा कानाकोपरा पिंजून काढावा, असे आवाहन केले आहे. सरदेसाई एक समर्थ विरोधी आमदार आहेत यात शंकाच नाही. पण गोवा फॉरवर्ड हा स्थानिक पक्ष असल्यामुळे त्यालाही काही मर्यादा आहेत. खरे तर गोव्याचा कानाकोपरा काँग्रेसने पिंजून काढायला हवा. पण तसे होताना दिसत नाही.

Goa political updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘नितळ गोंय’चा विसर पडला का?

काँग्रेसचे तीन आमदार एका ठरावीक अशा रिंगणात फिरताना दिसतात. काही मतदारसंघात तर काँग्रेसची अवस्था ‘कोमा’मध्ये गेल्यासारखी झाली आहे. फोंडा, शिरोडा हे मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ले होते. फोंड्यात तर गेल्या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसने ६,८४० मते प्राप्त केली होती. पण आता याच फोंड्यातील काँग्रेस गोटात सामसूम दिसत आहे. म्हणजे युद्धाआधीच काँग्रेसने शस्त्रे खाली टाकली की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे.

पण एवढे होऊनही आम आदमी पक्षावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस पक्षातील धुरीण सोडताना दिसत नाहीत. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाचा जेवढा आनंद भाजपला झाला नसेल तेवढा आनंद बाणावली मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांना झाल्यासारखा त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची बाणावलीत जी तयारी सुरू झाली आहे त्याचेच पडसाद या वक्तव्यात उमटताना दिसत आहेत.

Goa political updates
Goa Politics: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

दिल्लीतले काही राजकीय विश्लेषक तर आम आदमीचा पराभव करण्याकरता तिथे पडद्याआड काँग्रेस-भाजपची छुपी युती झाली होती, असे सांगतात. आता हे खरे असेल वा नसेल पण शंकेला वाव आहे हे निश्चित. गोव्यातही थोड्याफार प्रमाणात असाच प्रकार सुरू झाल्यासारखा दिसतो आहे. त्यात परत ’आर जी’ने तर वेगळी चूल मांडण्याची घोषणा आधीच करून टाकली आहे. हे पाहता याला आत्मघातकीपणा म्हणावा की, भाजपला आगामी निवडणुकीत ’केक वॉक’ देण्याकरता सुरू झालेला प्रयत्न म्हणावा, हेच कळत नाही.

आता या अंधारात एकच लुकलुकणारा काजवा दिसत आहे आणि तो म्हणजे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई. ते त्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे संपूर्ण गोवा पिंजून काढतील की नाही हे सांगता येणे कठीण असले तरी ते विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात सिंहाची भूमिका बजावू शकतात एवढे निश्चित. आता खरेच आमदार सरदेसाई ही भूमिका बजावतात की नाही, दिल्लीत मिळालेल्या धड्यावरून गोव्यातील विरोधी पक्ष काही शिकतात की नाही, निद्रिस्त अवस्थेत असलेली काँग्रेस जागृत होते की नाही, याची उत्तरे नजीकचा काळच देऊ शकेल एवढे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com