72nd National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्येच का? 'एक भारत'च्या नावाखाली निर्णय की राजकीय निवड?

72nd National Film Awards Gujarat: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा केवळ कलाकारांना दिला जाणारा सन्मान नाही, तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविधतेचा आणि देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेचा सरकारी स्तरावरील सर्वांत मोठा उत्सव आहे.
72nd National Film Awards Gujarat
72nd National Film AwardDainik Gomantak
Published on
Updated on

यंदाचा ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नवी दिल्लीत होणार नसून, त्याऐवजी २२ सप्टेंबरला गुजरातमधील एकतानगर, केवडिया येथे होणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे १९५४पासूनच्या इतिहासात १९७० व १९७१ चे अपवाद वगळता प्रथमच हा सोहळा दिल्लीबाहेर होत आहे. केवळ एक प्रशासकीय निर्णय म्हणून याकडे पाहता येणार नाही. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा केवळ कलाकारांना दिला जाणारा सन्मान नाही, तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविधतेचा आणि देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेचा सरकारी स्तरावरील सर्वांत मोठा उत्सव आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याचे स्थळ बदलणे हा चर्चेचा विषय बनणे साहजिकच आहे. चित्रपटसृष्टीत त्याविषयी प्रतिक्रियांचे उमटलेले तरंग आणि त्यांचा अन्वयार्थ.

सरकारचे म्हणणे काय?

केवळ दिल्लीतच सर्व राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, याऐवजी राजधानीच्या बाहेर जाऊन देशातील वेगवेगळ्या प्रदेशांना राष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठाशी जोडणे आवश्यक आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना दृढ करण्याच्या दृष्टीने या निर्णयाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा अपवादात्मक स्वरूपाचा निर्णय नसून त्यामागे धोरणात्मक भूमिका आहे.

72nd National Film Awards Gujarat
Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

सांस्कृतिक प्रतिमा, पर्यटन

‘एकतानगर’ हे नर्मदा जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित केल्याने पर्यटन, सांस्कृतिक प्रतिमा आणि ‘न्यू इंडिया’च्या विकासकथेचे प्रदर्शन करण्याची संधी सरकारला मिळते. सुमारे हजार पाहुण्यांसाठी व्यवस्था केली जात असून सोहळ्याचे स्वरूपही मोठे ठेवण्यात येत आहे.

भूमिका तर्कसंगत

ही भूमिका तत्त्वतः स्वागतार्ह आणि तर्कसंगत आहे . भारताची संस्कृती दिल्लीपुरती नाही. मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, बंगळूर, गुवाहाटी अशा अनेक शहरांनी भारतीय चित्रपटसृष्टी घडवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार देशाच्या वेगवेगळ्या भागांत नेण्याची कल्पना अधिक व्यापक सांस्कृतिक प्रतिनिधित्व निर्माण करू शकते.

मग आक्षेप काय?

दिल्लीचे महत्त्व येथे समजून घ्यावे लागेल. संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक राष्ट्रीय संस्था ज्या शहरात आहेत, त्या राजधानीत राष्ट्रीय पुरस्कार होणे ही एक दीर्घ परंपरा होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे केंद्र सरकारकडून भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेला सर्वोच्च सार्वजनिक सन्मान. त्यामुळे राजधानीतील विज्ञान भवन हे त्या राष्ट्रीय मान्यतेचे एक प्रतीक बनले होते. आता हा सोहळा राजधानीबाहेर नेल्याने त्या प्रतीकाची पुनर्रचना होत आहे. चित्रपटसृष्टीचे योगदान पाहता गुजरात हे निश्चितच महत्त्वाचे राज्य आहे; परंतु राष्ट्रीय चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र म्हणून त्याचे स्थान महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळम किंवा तेलंगणइतके व्यापक नाही. दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनीही नेमका हाच मुद्दा उपस्थित केला. चित्रपटसृष्टीला मोठे योगदान देणाऱ्या प्रदेशांचा उल्लेख करून ‘गुजरातच का?’, असा सवाल त्यांनी केला आहे. हा प्रश्न ‘गुजरातविरोधी’ म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. उलट, तो ‘राष्ट्रीय पुरस्कारां’च्या ‘राष्ट्रीय’ स्वरूपाबद्दलचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पारदर्शकता आवश्यक

जर सरकारने खरोखरच पुरस्कार सोहळा देशाच्या विविध भागांत नेण्याचे धोरण स्वीकारले असेल, तर पुढील काही वर्षांसाठी त्याचे पारदर्शक वेळापत्रक जाहीर करायला हरकत नसावी. उदाहरणार्थ, एका वर्षी महाराष्ट्र, पुढील वर्षी केरळम, त्यानंतर तमिळनाडू, पश्चिम बंगाल किंवा ईशान्य भारतातील एखादे राज्य अशा पद्धतीने सोहळ्याची फिरती रचना करता येईल. त्यामुळे ‘एका विशिष्ट राज्याला प्राधान्य’ दिल्याचा संशय कमी होईल आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे खरे राष्ट्रीय स्वरूप अधिक ठळक होईल. भारतीय चित्रपटसृष्टीची सर्वांत मोठी ताकद तिच्या विविधतेत आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये संथाली, तमीळ, मल्याळी, तेलुगू, कन्नड, तुळू आणि गढवाली अशा विविध भाषांतील चित्रपटांना मान्यता मिळते. संथाली चित्रपटाला प्रथमच ‘बिगर-फिचर’ विभागात पुरस्कार मिळत आहे. म्हणजे पुरस्कार हे भारताच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपाचे प्रतीक आहेत.

72nd National Film Awards Gujarat
Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

राजकारण आणि संस्कृती

सरकार कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एखादे ठिकाण निवडू शकते. परंतु राष्ट्रीय पुरस्कारासारख्या कार्यक्रमात निर्णयाचे राजकीय अर्थ लावले जाणार नाहीत, याची काळजी घेणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. गुजरातची निवड करण्यामागे पर्यटन, पायाभूत सुविधा, प्रतीकात्मकता किंवा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशी कारणे असतील तर ती अधिक स्पष्टपणे मांडली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाशी गुजरातचे असलेले दीर्घ नाते, केंद्रातील सत्तेचे राजकीय समीकरण आणि गुजरातला मिळणारे राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रम यामुळे अशा निर्णयांकडे अधिक बारकाईने पाहिले जाते. त्यामुळे सरकारने या निर्णयामागील निकष अधिक स्पष्ट करणे हिताचे ठरेल.

स्पष्टीकरण गरजेचे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा पुढचा टप्पा याच प्रश्‍नाचे उत्तर देणारा असायला हवा. पुरस्कार सोहळा देशभर फिरला, तर तो केवळ स्थळबदल राहणार नाही; तो सांस्कृतिक विकेंद्रीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रयोग ठरेल. मात्र, त्यासाठी नियम सर्वांसाठी समान, निवड पारदर्शक आणि संधी प्रादेशिकदृष्ट्या संतुलित असणे आवश्यक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने भाषांच्या सीमा ओलांडल्या आहेत. मराठी चित्रपट मल्याळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, तमिळ चित्रपट हिंदी पट्ट्यात लोकप्रिय होतो आणि मल्याळम चित्रपटाला महाराष्ट्रात रसिक मिळतात. ‘ओटीटी’च्या युगाने तर ही प्रक्रिया आणखी वेगवान केली आहे. अशा वेळी राष्ट्रीय पुरस्कारही दिल्लीच्या भौगोलिक चौकटीतून बाहेर पडणे स्वाभाविक मानता येईल. पण सुरुवात गुजरातपासून झाल्याने भुवया उंचावल्या गेल्या.

हा तर राजकीय निर्णय!

प्रत्येक शहराची काही ना काही ओळख असते. ती विविध संस्था, व्यक्ती यांच्या प्रयत्नांतून. चित्रपटक्षेत्राच्या बाबतीत गुजरातेत असे काही लक्षणीय काम झाल्याचा दावा कोणी करू शकत नाही. असे असताना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ त्या राज्यात घेण्याचा निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने घेतल्यासारखा वाटतो. मुंबई, पुणे, कोलकता, चेन्नई, हैदराबाद, तिरुअनंतपुरम यापैकी कोणत्याही शहराची निवड यथोचित ठरली असती. पण या शहरांची उपेक्षा झाल्याचे स्पष्ट दिसते.

- हरीष वानखेडे,

चित्रपटसृष्टीचे नवी दिल्लीस्थित अभ्यासक

प्रश्‍न कलाक्षेत्राच्या स्वायत्ततेचा

कला... मग ती कोणतीही असो; तिला स्थल-कालाच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाहीत. मुळात अशा मर्यादा आणि बंधनांना तोडणे हाच तिचा मुख्य उद्देश. तिची गळचेपी करायचा प्रयत्न कोणी केला तरीही ती नष्ट होत नाही. त्या अर्थाने कला ही अमर असते. साहित्य, संगीत, नाट्य आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रित मेळ होऊन साकार होणारा चित्रपट ही एक प्रभावी कला आहे. हे सगळे कलाशास्त्र उगाळण्याचे कारण म्हणजे गुजरातमध्ये होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा.... खरे तर तो सालाबादप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीमध्ये होणे अपेक्षित होते; पण आयोजकांनी त्यांच्या कॅमेऱ्याचा फोकस गुजरातकडे वळविला. यामागचा `नेपथ्यरचनाकार’ कोण आहे? बरे जी मंडळी चोवीस तास सांस्कृतिक राजकारणाची माळ ओढत असतात ती अचानक मूग गिळून गप्प का बसली? यात कारणांपेक्षा परिणामांचा विचार अधिक गांभीर्याने होणे गरजेचे आहे.

72nd National Film Awards Gujarat
Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

कारण येथे प्रश्न हा राष्ट्रीय ऐक्याचा येतो. देशाच्या सांस्कृतिक संचितामध्ये जेवढी भर हिंदीसिनेसृष्टीने घातली, तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक भर प्रादेशिक सिनेसृष्टीकडून घालण्यात आली. हल्ली तर सिनेमा म्हटले की ‘पाहावे दक्षिणेकडे’ अशी स्थिती. त्यामुळेच हा सोहळा तेलंगणमधील हैदराबाद, तमिळनाडूतील चेन्नई अथवा केरळममधील तिरुअनंतपुरम येथे होणे औचित्याचे ठरले असते. सुरुवात गुजरातपासून करायची असेल तर निदान त्याबाबतीत स्पष्ट आणि विस्ताराने भूमिका विशद करायला हवी होती. खरे तर कलावंतांनी हे प्रश्न निर्भीडपणे विचारायला हवेत. अशा मोकळ्या चर्चेचे वातावरण हवे. विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातील निर्णयांच्या बाबतीत तर अशा चर्चेला अवकाश असायलाच हवा.

तीच तर खरी लोकशाही. दुर्दैवाने सरकार त्यासाठी उत्सुक नाही आणि बरेच कलावंतही त्यासाठी आग्रही दिसत नाहीत. ज्या दादासाहेब फाळके यांचा वारसा आपण सांगतो तो लक्षात घेऊन तरी अशावेळी सोईस्कर मौन सोडणे गरजेचे असते, याची जाणीव या नटमंडळींना आहे का? गुजरात हेही भारतातीलच राज्य आहे. त्या राज्याची वैशिष्ट्ये ओळखून योग्य त्या गोष्टी राज्याला मिळायलाच हव्यात. पण हे जर सरसकट घडत असेल तर ते डोळे झाकून कसे मान्य होणार? सगळेच गुजरातला न्यायचे असेल तर संघराज्य, सांस्कृतिक वैविध्य, वैविध्याने नटलेली भारतीय परंपरा वगैरे गोष्टी निव्वळ बोलण्यापुरत्याच राहतात. तसे नसेल तर सरकारने याबाबतीत निःसंदिग्ध शब्दांत भूमिका स्पष्ट करायला हवी. पुढील काळात कोणकोणत्या राज्यांत हा समारंभ घेतला जाईल, हे जाहीर करावे. सांस्कृतिक स्वायत्तता, कलात्मक स्वातंत्र्य यांच्या बाजूने आपण आहोत, हे उक्ती आणि कृती या दोन्हींतून सिद्ध करायला हवे.

हा सोहळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाला पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा समावेश असतो; मग पुरस्कार सोहळाही देशाच्या वेगवेगळ्या भागांत का होऊ नये? राजकारण्यांना त्यांचं राजकारण करू द्यावं, पण त्यात कलेला का आणायचं? मुंबईत फिल्म इंडस्ट्री आहे म्हणून संपूर्ण चित्रपटसृष्टीचे चित्रीकरण फक्त मुंबईतच होत नाही; देशभरात चित्रीकरण होतं. आपण वेगवेगळे मोती असलो, तरी भारत नावाची आपली माळ एकच आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एका राज्यापुरता मर्यादित न ठेवता दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजित केला तर त्यात काहीच गैर नाही. शेवटी हा गुजरातचा किंवा महाराष्ट्राचा पुरस्कार नाही, तर तो देशाचा आहे. त्याकडे एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही.

- मनोज जोशी, अभिनेता

पुरस्कार सोहळा महाराष्ट्रात व्हावा यासाठी मी आग्रही कधीच नाही. चित्रपट पुरस्कार समारंभ हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाला पाहिजे. तो दिल्लीतच झाला पाहिजे या मताचाही मी नाही. आज पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार आहे, उद्या कर्नाटक, राजस्थानमध्ये, केरळममध्ये होऊ दे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर जर हा सोहळा झाला तर चित्रपटसृष्टीला नवी चालना मिळेल, विचारांची देवाणघेवाण होईल.

- महेश मांजरेकर, दिग्दर्शक, निर्माता

72nd National Film Awards Gujarat
Goa Police: गोवा पोलिस दलात आतापर्यंतचे मोठे फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह 12 महत्वाच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये करणार ही बाब मला मान्य नाही. कारण भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली. मग हा सोहळा महाराष्ट्रात करणे आवश्यक होते. महाराष्ट्र ही चित्रपटसृष्टीची पंढरी आहे. दरवर्षी येथे अनेक चित्रपटांची निर्मिती होते. महाराष्ट्रातील मोठमोठी निर्मिती गृहे मुंबईत आहेत. कलाकार मंडळी येथेच राहात असल्याने हा सोहळा राज्यामध्ये होणे आवश्यक आहे.

- वर्षा उसगावकर, अभिनेत्री

मराठी चित्रपटांची उल्लेखनीय कामगिरी

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांत ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला असून, ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकरने सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार पटकावला. लघुपट विभागातील मुख्य पुरस्कार ‘भंगार’ या मराठी चित्रपटाला मिळाला आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. लघुपट आणि माहितीपट विभागात ‘हमसफर’ या मराठी लघुपटाला सर्वोत्तम लघुपट म्हणून गौरविण्यात आले आहे. ‘परत ४१च्या मागावर’ (ऑन द ट्रेल ४१ डिग्री) या मराठी लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार शिवपाल सिंह कांग यांनी पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आर्टिकल ३७०’ने पटकावला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री यामी गौतमला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणारा अभिनेता रणदीप हुडाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावून दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केले आहे. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार दोन वेगवेगळ्या कलाकारांना विभागून देण्यात आला आहे. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि ‘भ्रमयुगम’ या चित्रपटातील अभिनयासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांना संयुक्तपणे देशातील सर्वोत्तम अभिनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com