दिवाळी म्हटले की नरकासुर आलेच! त्यांचे ते अक्राळविक्राळ चेहरे आले, त्यांच्याभोवती घातलेला धिंगाणा आला, इतरांची झोप उडवत चाललेली बोंबाबोंब आली. मला दिवाळी आणि निवडणुकीत काहीच फरक नाही दिसत. नरकासुर तिथेही असतात, धिंगाणा आणि बोंबाबोंबही असते. फरक इतकाच की दिवाळीला आपण नरकासुर जाळतो आणि निवडणुकीच्या वेळी नरकासुराच्या नादाने स्वतःलाच पेटवून घेतो. असो. ते रोजचेच मरणे झाले. यंदा नवे काय घडले ते सांगू का?
धनत्रयोदशीला सकाळीच दारावर थाप पडली. डोळे चोळीत उठलो तर दारात अरविंदभाऊ! सुरवातीला मी ओळखलेच नाही. अहो, अंगावर चक्क बस कंडक्टरचा वेश होता. गळ्यात तिकिटांचा बटवा, खांद्यावर रुमाल अडकवलेला, हातात पंचिंग मशिन...आणि तोंडात ‘शिरडी, वेलंकणी, अजमेर शरिफ’चा गजर. मला काहीच कळेना. या दिल्लीवाल्यांना गोवा समजलाच नाही, समजणारही नाही.
‘चला चला, स्पेशल दिवाळी ऑफर आहे, आमच्या पक्षाची. मोफत तीर्थाटन करा! शिरडी, शिरडी...’ अरविंद भाऊ ओरडतच शेजाऱ्याच्या दारी गेले. मी रात्री नरकासुर दहनाचा ओला बेत केला होता. ते सोडून तीर्थाटनाला कसे जायचे?
सकाळची आन्हिके आटोपून कॉफीचे घुटके घेत दिवाणखान्यात येऊन बसलो तोच फोन वाजला. कुणीतरी फाटक्या आवाजात सांगत होता, ‘हम ये वादा करते है की हम वादा नही भुलेंगे...’
अरेच्चा, हा तर राहुलबाबा! त्यांना मोटरसायकलवरून फिरताना पाहिला होता. बेतीच्या जेटीवरही भेटले होते, हातात पिशवी होती. मला वाटले, तारले घेण्यासाठी आले असतील. मी त्यांना व्हिक्टर गोन्साल्विसचा ट्रॉलर दाखवला, तेव्हा मिशींतच हसले होते. आणि, आता सकाळी सकाळी फोन!!
‘कसला वादा, राहुलबाबा?’
‘यही, गोवा को स्वर्ग बनाने का!’
‘पण, कसा बनवणार तुम्ही गोव्याचा स्वर्ग...गोमंतकीयांना स्वर्गवासी करून?''
''वो गिरीश चोदानकर बतायेंगे,'' असे म्हणून राहुलबाबाने फोन कट केला. बिचारे हॅपी दिवाली म्हणायलाही विसरले. बहुधा त्यांना ते चोदानकरनी सांगितलेच नसेल.
मी सकाळची न्याहारी उरकतो, तोवर दारावर पुन्हा थाप. पाहातो तर ‘श्वेतवसना ममतादीदी’ हसत हसत उभ्या. माझ्या हातात मिठाईचा बॉक्स ठेवत म्हणाल्या ‘शोंदेश!’
मिठाईच्या बॉक्समधून संदेश कसला बरे देतात. आता ‘नोटा’ असतील म्हणून तिथल्यातिथे बॉक्स फोडला, तर बंगालची संदेश नावाची मिठाई!
‘अहो, तुम्ही पोस्टर लावण्यासाठीच साठ लाख दिलेयत म्हणे, आम्हालाही द्या ना दिवाळीच्या निमित्ताने एखादा लाख...’ मी म्हटले.
‘आमी गोवा के भालो भाशी’ आणि असेच काय काय गोल गोल बोलत त्यानी माझ्या हातात आपला फलक कोंबला. तोच तो, ‘गोंयची नवी सकाळ’वाला! पण, त्यातल्या ‘स’ वर कुणा नतद्रश्टाने काळे फासले होते आणि वाचणाऱ्याला सकाळच्या ऐवजी ‘काळ’ दिसत होते.
‘अहो, गोव्यांत दिवाळीला काहीतरी द्यायची पद्धत आहे, ‘ मी बोटांनी नोटांचे इशारे करत विचारले’
‘आय डोण्ट बिलिव्ह ईन दीज कोस्टम्स. आय गीव्ह ओन्ली तू दोस हू हॅव्ह.’ असे फणकाऱ्याने म्हणत दीदी निघूनही गेल्या.
माझा दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच भ्रमनिरास झाला. या भायल्यांचे काही खरे नाही. ‘बाबा’ने कालच पोह्यांचे पाकीट पोहोचवले होते. डॉ. सावंतांनी चण्याची पिशवी पहाटेच दारात ठेवली होती आणि ‘दिगभाऊ’ने अंगाला लावण्यासाठी उटणे पोहोचते केले होते. तो चर्चिल बिचारा व्हेज केक घेऊन वार्क्याहून इथपर्यंत आला होता...ह्यालाच म्हणतात गोव्याचे दातृत्व...
त्या परप्रांतीयांना गोवा कळलाच नाही, कळणारही नाही.
-अनंत साळकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.