प्रकाशोत्‍सव सुरू; सर्वत्र उत्‍साह

फोंड्यात दुकाने, रस्‍ते फुल्ल
ponda market
ponda marketDainik Gomantak

फोंडा: गेल्या वर्षीची दिवाळी कोरोनाच्या सावटाखाली गेली. मात्र यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने राज्यात सगळीकडे दिवाळाची उत्साह आहे. फोंडा महालही त्याला अपवाद नाही. गेल्या दोन दिवसांपासून फोंडा बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तर बाजार लोकांनी आणि रस्ते वाहनांनी फुलून गेले होते. दरम्‍यान, विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपल्‍याने विविध राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनीही लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक फोंडा शहर तसेच कुर्टी व ढवळीच्या नाक्यांवर जागोजागी लावले आहेत. या शुभेच्छा फलकांचा एकूण आकडा 36 वर गेला आहे.

फोंडा बाजारात आज आकाशकंदील, पोहे, फळे, मिठाई तसेच इतर साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसली. फोंडा बुधवारपेठ मार्केट तसेच बसस्थानक भागातील दुकानांत गर्दी होती. लोक सकाळपासून खरेदीसाठी बाहेर पडले होते. विशेषतः फोंड्यातील गोवा बागायतदार भांडारमध्ये तर गेले आठ दिवस गर्दी ओसंडून वाहत आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला गोवा बागायतदारमध्ये तुफान गर्दी झाली होती. विशेष म्हणजे धनत्रयोदशीला फोंड्यातील सराफी दुकानातून लोकांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली.

ponda market
दिवाळीच्या पूर्वसंध्येला डिचोली बाजार फुलला

गोवा बागायतदार तसेच अन्य आस्थापनांतून महिलांनी भाऊबीजसाठी विविध साहित्य खरेदी केल्याचे निदर्शनास आले. मिठाईची तसेच फुलांची दुकाने सामानाने भरून गेली होती. मिठाई तसेच फुलांसाठी लोकांनी मोठी खरेदी केली. यंदा मिठाईचे दर वाढले असून फुलांचेही दर वाढलेले दिसले. दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे, मात्र दर 100 ते 150 रुपये किलो होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे दिवाळीच्या सणावर विरजण पडले होते, मात्र यंदा कोरोना काही अंशी आटोक्यात असल्याने लोकांनी कोरोनासंबंधीचे नियम बासनात गुंडाळून ठेवलेले दिसले. बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसले, पण दुकानात सॅनिटायझरचा पत्ताच नव्हता. दिवाळीच्या सणानिमित्त प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे, फोंड्याचे आमदार रवी नाईक, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर तसेच शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी फोंड्यासह राज्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com