केपे: केपे मतदारसंघात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे धाबे दणाणले असल्याचे एक चित्र निर्माण झाले आहे. तेथे झालेले 80 टक्के मतदान हे कशाचे द्योतक आहे? कॉंग्रेस पक्षाचे ॲल्टन डिकॉस्ता यांना काही आपल्या बाजूने एवढे मतदान वळवता आलेले नाही. याचा अर्थ बाबूंनी भरपूर अंगमेहनत घेतली आहे.
केपेतील राजकीय निरीक्षक व अनेक पत्रकारही सध्या परिवर्तनाची भाषा बोलतात, परंतु बाबूंनी गेल्या पाच सहा दिवसांत उसवलेली ठिगळे गाठण्याचा प्रयत्न केल्याचे माहितगार सांगत आहेत. म्हणजे बाबूंनी अनेकांचे रुसवे फुगवे घालवले. त्यांच्याकडे गेली अडीच वर्षे टाऊन ॲण्ड कंट्री प्लॅनिंग खाते होते. त्यामुळे खरी सत्ता बाबूंकडेच होती. याचे काहीसे त्यांनी लोकांपर्यंत पोचवले, तर सर्वांचेच हित साधले म्हणायचे? याच बाबू प्रेमामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक आले असतील, तर बाबू निश्चित जिंकले म्हणायचे.
लोकांनीही लुटले
सांगे मतदारसंघात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या अर्धांगिनी सावित्रींनी भरपूर मजल गाठली आहे. गेले दोन दिवस तर तेथे पैशांचा महापूरच आला होता. एवढे पैसे वाहत असल्याचे पाहून भाजपच्या सुभाष फळदेसाईंना अक्षरशः घाम फुटला आणि त्यांनी वारंवार महामंत्र्यांकडे तक्रारी केल्याचे वृत्त आहे.
शेवटी सतीश धोंड यांना निवडणूक आयोगाकडे हातपाय पडावे लागले. त्यामुळे तेथे आयोगाचे भरारी पथक गेले आणि काही प्रमाणात त्यांनी मोकाट सुटलेल्या नेत्यांना आवर घातला. अनेक मतदारसंघांमध्ये वेगळी परिस्थिती नाही. प्रचंड पैसा वाहण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक प्रबळ मंत्र्यांचा समावेश आहे. केपेतही काही वेगळी परिस्थिती नव्हती. लोकांनी मात्र हात धुऊन घेतले. शेवटी अनेक मंत्री सार्वजनिक तिजोरीवरच डल्ला मारत असतात. ते पैसे लोकांचेच आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या काळात लोकांना नेत्यांकडून ते लुटता आले तर त्यांचे काय चुकले? ∙∙∙
भाजपचे शांताराम मगो प्रचार सभेत
भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शांताराम कोलवेकर अखेर मगोच्या प्रचार सभेत सक्रिय दिसले. तिस्क - फोंडा येथे झालेल्या मगोच्या जाहीर सभेत शांताराम कोलवेकर यांनी मगोचे उमेदवार केतन भाटीकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शांताराम कोलवेकर हे भाजपचे सदस्य असून राजीव गांधी कला मंदिरचे उपाध्यक्ष आहेत. भाजपने त्यांना एकदमच अडगळीत टाकले नव्हते, पण पालिका राजकारणाचा रोष मनी धरून शांताराम यांनी मगोची वाट धरली. अरेच्चा... शांताराम मगोवासी झाले, पण कला मंदिरवर उपाध्यक्ष आहेतच की..! अशी चर्चा सध्या रंगली आहे. ∙∙∙
मतदारांची परीक्षा
निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. राजकारण्यांनी प्रचारादरम्यान दिवस रात्र मेहनत करून मतदारांनी त्यांना निवडून द्यावे म्हणून जे-जे काही शक्य होते ते-ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. काही उमेदवारांना म्हणे गेल्या काही दिवसांपासून झोपच पडत नव्हती. कारण जनता जनार्दन कुणाचे पारडे जड करणार हे त्यांनाच माहीत. मतदान कोणत्या उमेदवाराला करावे, आश्वासने कोणती आहेत, अशा विविध प्रश्नांवर विचारमंथन करून मतदारांनी मतदान केले आहे. योग्य उमेदवार निवडणे ही एक प्रकारे मतदारांचीच परीक्षा ठरली आहे... ∙∙∙
बड्या बड्यांना गाळावा लागला घाम
अखेर एकदाचे मतदान आटोपले. आता मतमोजणी होऊन निकाल जाहीर व्हायला पुढचा महिना उजाडावा लागणार आहे, पण त्याची वाट पहाण्याची अनेकांची तयारी नाही. मतदानाची टक्केवारी पाहून आपण किती फरकाने विजयी होणार ते छातीठोकपणे सांगणारेही आहेत. असे असले तरी अनेक मी मी म्हणविणाऱ्यांना या निवडणुकीने घाम गाळायला लावला आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडले. कधी नव्हे ते त्यांना दारोदार फिरावे लागले.
‘भाईलोग’ की भायलो’?
ध चा मा केला तर काय होते हे आपण पेशवाईच्या इतिहासात शिकलो आहोत. गोव्यात निवडणूक प्रचारानिमित्त बाहेरील नेते आले होते. कोकणी समजत नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. मोदींची मोडी कोकणी, केजरीवाल व ममतांची कोकणी आपण ऐकलीच असणार. तृणमूलचे ज्येष्ठ नेते डेरीक ओब्रायन यांना इंग्रजी सोडून इतर भाषा येत नसावी. परवा डेरीक ओब्रायन कुंकळ्ळीच्या बैठकीत म्हणाले ‘वो काँग्रेस का भाईलोक कॅडीडेट खडा है उसे हराना है भाईलोक को जिताना नहीं.’ उपस्थित हे भाषण ऐकून अचंबीत होणे स्वाभाविक. कारण दहा उमेदवारांत एकही भाईलोक नाही. नंतर कोणीतरी त्यांना सांगितले ‘वह भाईलोक नहीं भायलो याने बाहेरील उमेदवार आहे.’ शेवटी ‘भायलो’ शब्दाने कुंकळ्ळीत गोंधळ केलाच.
मनसोक्त करमणूक
प्रचारासाठी गेले काही दिवस विविध राज्यांतील नेत्यांनी गोव्यात गर्दी केली होती. काहींनी ही संधी साधून पर्यटनवारीही केली, पण मुद्दा तो नाही. प्रचारसभांत बोलताना बहुतेकांनी स्थानिक मंडळींनी जे मुद्दे लिहून दिले तेच उगाळले व अनेकांना हसू आले. केवळ सेना नेतेच नव्हेत, तर आपवालेसुध्दा तसे बोलतात तेव्हा गेल्या काही वर्षात गोव्यात उभ्या ठाकलेल्या पायाभूत साधनसुविधा त्यांच्या नजरेस पडल्या नाहीत की त्यांनी त्याकडे कानाडोळा केला अशी विचारणा सत्ताधारी करू लागले. यामुळे लोकांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
धडधड वाढली...
गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी काल मतदान झाले. एकूण 301 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झाले आहे. आता पाहायचे आहे कुणाचे पारडे जड आहे... अनेक मतदारसंघात प्रचारादरम्यान एखादा उमेदवार जिंकणार असे वाटायचे तो पडू शकतो आणि भलताच पुढे जाऊ शकतो. कारण रात्रीत मत बदलण्याची किमया काही कार्यकर्ते आणि उमेदवारांत असते.
त्यामुळे अनेक उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली आहे. काही मतदारसंघात सुरवातीला आघाडीवर असलेल्या उमेदवाराचा प्रचार काही काळानंतर थंडावला, तर सुरवातील संथगतीने प्रतिसाद मिळणाऱ्या उमेदवाराला अगदी शेवटच्या टप्प्यातील प्रचारात मोठा प्रतिसाद लाभला. अशा काही विचित्र घटना प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांच्या बाबतीत घडल्या आहेत. त्यामुळे कुणाच्या पारड्यात मतदानाचे दान अधिक पडले हे आताच सांगणे कठीण आहे, त्यासाठी १० मार्चची वाट पाहावी लागणार आहे.
मांद्रेमध्ये भाजपात निरुत्साह
2017 च्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात दयानंद सोपटे यांनी भरघोस मते प्राप्त केली होती, परंतु त्या तुलनेने त्यांना यंदा किती मते आपल्या बाजूला खेचता येतील? यावेळी मांद्रेमध्ये तीन महत्त्वाचे प्रतिस्पर्धी होते. लक्ष्मीकांत पार्सेकर व जीत आरोलकर यांनीही भरघोस मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला काही वार्ताहरांना लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी बोलता आले. ते छातीठोकपणे आपल्याच बाजूने कौल मिळणार असल्याचे सांगत आहेत. परंतु भाजपचे निष्ठावान असे खूपच कमी मतदार तेथे घराबाहेर पडले असल्याचे तेथील निरीक्षकांचे म्हणणे आहे.
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. भाजपचे संपूर्ण पाठिराखे घराबाहेर पडले नाहीत. या पार्श्वभूमीवर मांद्रेमध्ये कोण विजयी होतो हे पाहणे मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मयेमध्ये काय घडणार?
मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डला (Forword) आश्चर्यकारकरित्या मिळालेला पाठिंबा हा भल्याभल्यांना आचंबित करणारा आहे. तेथे माजी उपसभापती अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट यांना भाजपात आणून त्यांना उमेदवार बनविण्यात आले, परंतु सुरवातीला त्यांच्यामध्ये दिसलेला उत्साह नंतर मात्र लोप पावला. ते एकाच जागी रुतून राहिले. स्वतः भाजपाचे नेतेही मान्य करतात, मयेमध्ये प्रेमेंद्र शेट भरीव कामगिरी बजावू शकले नाहीत. वास्तविक गेल्या आठ दिवसांत तेथे गोवा फॉरवर्डने जोरदार मुसंडी मारली. या मतदारसंघाची जबाबदारी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
त्यांनी दिगंबर कामत यांना तिथे बोलवून नेले. विजय सरदेसाई गेलेच. परंतु मायकल लोबो तेथे तीनवेळा भेट देऊन आले. त्याचा फायदा झालाच, परंतु प्रेमेंद्र शेट यांना उमेदवारी दिल्याचा पश्चाताप भाजपला झाला आहे. मये मतदारसंघातील या कामगिरीमुळे गोवा फॉरवर्डची विधानसभेतील संख्या दोनवर जाऊ शकते, असे राजकीय निरीक्षक मानतात.
कॉंग्रेसची धाव किती यशस्वी?
डिचोली तालुक्यात भाजपला फारशी आशा नाही. बार्देशमध्ये तर मायकल लोबो यांनी मोठी मुसंडी मारली आहे. तिसवाडीत भाजपला किती संधी मिळेल, याबद्दल संशयच आहे. पणजी वगळता ताळगाव, कुंभारजुवे, सांताक्रुझ व सांतआंद्रे या मतदारसंघांमध्ये खूप मोठी चुरस आहे आणि त्यात भाजपाला किती यश मिळेल, याबद्दल राजकीय निरीक्षकांमध्ये संशय आहे. या मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने बरीच मजल गाठली आहे.
हे यश खरोखरीच प्रत्यक्षात उतरले तर कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष बनू शकतो, परंतु ख्रिस्ती समाजाने नक्की कुणाला मतदान केले? त्यांनी मतांचे विभाजन होऊ दिले का? कॉंग्रेसप्रमाणेच तृणमूल व ‘आप’ला त्यांची काही मते विभागून गेली का? हे प्रश्न या निवडणुकीत खूप महत्त्वाचे ठरले आहेत. कॉंग्रेसचे अस्तित्वही या शक्याशक्यतेवर अवलंबून आहे.
लोबोंचा टक्का वाढला
मायकल लोबो आपल्या पत्नी दिलायला यांना शिवोलीमध्ये जिंकून आणतीलच, परंतु बार्देश तालुक्यात जर त्यांनी बहुसंख्य जागा पटकावल्या (सातपैकी सहा त्यांच्या हिश्श्याला येऊ शकतात) तर त्यांना मुख्यमंत्रिपदही हवेहवेसे वाटेल. कालच एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्याला जरूर मुख्यमंत्री बनायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक एका आठवड्यात झालेले त्यांचे हे परिवर्तन आहे.
आपण जर सहा-सात जागा जिंकून आणू शकतो, तर सर्वोच्च पद आपल्याला का मिळू नये? असा विचार त्यांच्या मनात जरूर उत्पन्न होऊ शकतो. वास्तविक भाजपामध्ये ख्रिस्ती नेत्याला सर्वोच्च पद मिळू शकत नसल्याच्या नाराजीतूनच त्यांनी भाजप सोडला. नाहीतर त्यांना दुसरे काय कारण होते? आता तेच जर त्यांना कॉंग्रेसही देत नसेल, तर कॉंग्रेसमध्ये शिरून एवढे परिश्रम करून काय फायदा, असा सुज्ञ विचार ते करणे स्वाभाविक आहे. असे सांगतात, की कॉंग्रेस पक्षाने जेथे हात आखडता घेतला, तेथेही उमेदवारांना लोबो यांनी स्वतःचे पैसे वाटले.
म्हापशातील सुधीर कांदोळकरांना कॉंग्रेस पक्ष निधी देऊ शकला नाही. मायकल लोबो यांनी ते पोचते केले. गोवा फॉरवर्डच्या मये मतदारसंघातील उमेदवारासाठी स्वतः प्रचार करायला ते गेले. असे परीश्रम कॉंग्रेसच्या एकाही महत्त्वाच्या नेत्यांनी घेतले नाही, हे कसे नाकबूल करता येईल?
थिवीत वेगळे घडणार काय?
थिवी मतदारसंघात यावेळी काय घडेल आणि किरण कांदोळकर यांचा वरचष्मा तेथे यावेळेही पाहायला मिळेल का? हा खरा चर्चेचा विषय आहे. हळदोणे मतदारसंघात किरण कांदोळकर जवळजवळ पराभूत झाल्यात जमा आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विशेषतः मतदानाच्या दिवशी हळदोणेकडे त्यांनी पाठ फिरवली आणि ते थिवीत ठाण मांडून बसले. मतदानाच्या दिवशी मात्र ते भलतेच अस्वस्थ दिसले. एका दूरच्या चित्रवावाहिनीशी बोलताना ते नर्वस असल्याचे सहज लक्षात येत होते. त्यांनी थिवीमध्ये भरपूर पैसे वाहावले आहेत याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तरीही थिवीमध्ये ‘कांटे की टक्कर’ मात्र आहे.
साखळीत काय होणार?
साखळी मतदारसंघात झालेले 90 टक्के मतदान याचा अर्थ काढणे तितका सोपा नाही. अनेक निवडणूक तज्ज्ञ सोमवारी उशिरापर्यंत या वाढलेल्या मतदानाचा अंदाज लावताना आढळले, परंतु ते तेवढे सोपे नाही. कारण यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः घराघरात पोचले. शहरी भागात - जेथे त्यांना कमी प्रतिसाद मिळत असे, तिथेही त्यांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. दुसऱ्या बाजूला धर्मेश सगलानी यांनी 2017 च्या निवडणुकीतील आपले दोष, त्रुटी आणि मर्यादा यांचा चांगलाच अभ्यास केला होता.
दोन्ही बाजूंनी पैशांचा पाऊस पाडला. याबद्दल वाद असण्याचे कारण नाही, परंतु असे असले तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या काळजाचा एक ठोका काल चुकलाच असेल. साखळीच्या मतदानाचा अर्थ काढणे एवढे सोपे नाही. त्यासाठी दहा मार्चचीच वाट पाहणे भाग आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.