पणजी: या विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेली लक्षवेधी लढत म्हणून पणजी मतदारसंघाकडे पाहावे लागेल. येथे भाजपतर्फे बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) आणि अपक्ष म्हणून उत्पल पर्रीकर यांच्यात लढत झाली. स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे हा मतदारसंघ देशभर चर्चेत राहिला.
दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चे बांधणी झाल्याचे चित्र आज पणजीत बघायला मिळाले. सकाळपासून उत्पल आणि बाबूश यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांसाठी मोर्चेबांधणी करत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. तुलनेत ‘आप’चे उमेदवार वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे एल्विस गोम्स मागे पडल्याचे जाणवले.
राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांचा हा मतदारसंघ आणि भाजपचा बालेकिल्ला ही या मतदारसंघाची दुसरी ओळख. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेले विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट जाहीर केल्यानंतर उत्पल यांनीही आपण अपक्ष निवडणूक लढवणार, असे जाहीर केल्याने भाजपचे धाबे दणाणले. ही निवडणूक उत्पल पर्रीकर विरुद्ध बाबूश मोन्सेरात यांच्यात रंगणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. सुरवातीला ‘आप’चे उमेदवार वाल्मिकी नाईक यांची सर्वाधिक चर्चा होती. मात्र उत्पल ‘आप’मध्ये आल्यास वाल्मिकी माघार घेतील, अशी घोषणा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केल्यानंतर वाल्मिकी यांचा दावा मागे पडला आणि चर्चा उत्पल यांच्याभोवती वाढली होती.
यातच काँग्रेसने पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांना तिकीट नाकारून नवख्या एल्विस गोम्स यांना तिकीट दिल्याने मडकईकर यांनी उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला. गोम्स त्यांचा राजकीय प्रवास आम आदमी पक्षातून सुरू झाला आणि सध्या ते काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत. 2017 मध्ये त्यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून ‘आप’कडून निवडणूक लढवली होती.
उत्पलसाठी शिवसेनेची माघार
गोव्यात शिवसेनेने पर्रीकर यांच्यावरील आदर व्यक्त करत उत्पल भाजपच्या विरोधात निवडणूक लढवत असेल तर शिवसेना त्यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे पणजीतील शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी माघार घेत उत्पल यांना पाठिंबा दिला. याशिवाय माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते उदय मडकईकर यांनीही उत्पल यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीत रंगत आली.+
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.