अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

Goa Sangadotsav Festival: बोरी गावात ग्रामदेवी नवदुर्गा सांगडांत विराजमान केली जाते आणि देवीच्या तळ्यात सांगडोत्सवाची चांदण्या रात्रीची पर्वणी भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देते.
Goa Sangadotsav Festival
Goa Sangadotsav FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

इसवी सनाच्या पूर्वीपासून भारतात नौकानयनाची परंपरा होती. नौकांच्या आधारे लोक एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जलमार्गाद्वारे प्रवास करायचे आणि त्यामुळेच यात्रा, उद्योग, व्यवसाय यांना चालना लाभली होती. भारतातून सोने, रत्ने, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, मोरासारखे सुंदर पक्षी यांचा दूरदेशी व्यापार नौकांतून केला जायचा.

जलमार्गाद्वारे प्रवास, यात्रा, व्यापार केला जात असताना, बऱ्याचदा मुसळधार पर्जन्यवृष्टी, वादळवारे यांना समर्थपणे तोंड देताना, आपल्या आराध्य दैवताला तारिणी मानून, स्मरण आणि प्रार्थना नदी, सागर ओलांडताना केली जायची. त्यामुळे नौकेशी इथल्या माणसांचे पूर्वापार भावजीवन जोडले होते. नौका हे जरी जलमार्ग प्रवासाचे माध्यम असले तरी वर्षातून एकदा तरी आपल्याप्रमाणे आराध्याला नौकानयन घडवण्याची इच्छा इथल्या संवेदनाशील माणसाला झाली नसेल तर नवल!

Goa Sangadotsav Festival
Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

वर्षपद्धतीप्रमाणे मान्सूनच्या पावसाच्या समाप्तीनंतर, गोव्यात येणाऱ्या गुलाबी थंडीच्या शरद ऋतूत जेव्हा ग्रामदेवीची जत्रा साजरी केली जाते, त्यावेळेला दोन होड्या एकत्रित करून सांगड तयार केला जातो आणि मौसमी फुलांच्या माळा, गजरा यांनी सजवून त्यात ग्रामदेवीच्या अलंकृत उत्सव मूर्तीला स्थानापन्न करून, कुठे सनईचौघडा तर कुठे ढोल, ताशा, कासाळे यांच्या पारंपरिक लोकसंगीतावरती प्रत्यक्ष दोन नौकांच्या सांगडांतून नौकानयनाचा अनुभव दिला जातो. तार म्हणजेच नौका आणि सांगडांत देवी आरूढ झालेली असल्याने, भाविकांनी तिला ही तारिणीच्या रूपात पुजण्यात धन्यता मानली.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे शारदीय चंद्रोत्सवाचा रुपेरी किरणांचा आल्हाददायी आविष्कार आणि मान्सूनच्या पावसानंतर नव्या जोमाने आपण हाती घेतलेल्या कामात ऊर्जा लाभावी म्हणून, शेताभाटात राबराबणारा इथला कष्टकरी ग्रामदेवीची जत्रा उत्साहाने साजरी करताना, अशा चांदण्या रात्री देवीच्या उत्सवमूर्तीला दोन नौका एकत्रित करून, निर्माण केलेल्या सांगडांत आरूढ करून, भाविकांच्या उपस्थितीत सांगडोत्सव साजरा केला जातो.

Goa Sangadotsav Festival
Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

गोव्यातल्या (Goa) फोंडा तालुक्यातल्या, हिरव्यागार कुळागरांनी नटलेल्या बोरी गावात ग्रामदेवी नवदुर्गा सांगडांत विराजमान केली जाते आणि देवीच्या तळ्यात सांगडोत्सवाची चांदण्या रात्रीची पर्वणी भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देते. पहिल्या दिवशी आवळी भोजनाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी जत्रेच्या प्रसंगी मध्यरात्री नवदुर्गा सांगडोत्सवात सहभागी होऊ लागते तेव्हा भाविक ध्यानीमनी तिच्या रूपात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

मांडवी नदीच्या (Mandvi River) डाव्या किनारी सावईवेऱ्यातला बारमाही पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, तिथल्या कष्टकऱ्यांचा जीवनाधार ठरला होता. या गावात जेव्हा शेषशायी मदनंत देवाची पाषाणी मूर्ती पिरासमवेत आली, तेव्हा भाविकांनी तलावातल्या पाण्याला देवाचा निरंतर स्पर्श लाभावा आणि त्यामुळे शेती, बागायतीबरोबर संस्कृती, धर्म जीवनात वावरताना लोकमानसाला अनंत ऊर्जा लाभावी म्हणूनच की काय, आपल्या आराध्याचे मंदिर चक्क तलावातच कल्पकतेनं निर्माण केले.

Goa Sangadotsav Festival
Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

सात दिवस चालणाऱ्या इथल्या सख्याहरीच्या जत्रेतल्या एका रात्री मदनंताच्या उत्सव मूर्तीला सांगडात विराजमान करून, लोकसंगीताच्या श्रवणीय सुरावटीवर नौकानयन घडवले जाते. एकेकाळी पोफळी, पपनस, मसाल्यांची पिके, अननस आदी पिकांनी लगडलेली इथली कुळागरे, कष्टकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार ठरली होती. कुळागरे, वायंगणी शेतीला सिंचन सुविधा या तलावाच्या पाण्यातून लाभायची आणि त्यामुळे मदनंताचा सांगडोत्सव त्यांच्यासाठी आनंदोत्सवाची पर्वणी ठरली होती.

पारंपरिक लोकवाद्यांच्या संगीतावरती होणारा मदनंताचा सांगडोत्सव इथल्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या माध्यमातून जलसंस्कृतीशी कष्टकरी आपल्या अनुबंधांची वीण घट्ट करायचा आणि त्यामुळे या गावाने लोकमानसाचे जीवन सुखी, समृद्ध केल्याने इथल्या नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलांच्या विलोभनीय आविष्काराची प्रचिती लाभली.

Goa Sangadotsav Festival
Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

मान्सूनच्या काळातला, भाद्रपदाला गोव्यात साजरा केला जाणारा गणेशचतुर्थीचा सण, लोकधर्म कला आणि संस्कृती यांच्या विभिन्न पैलूंचे दर्शन घडवत असतो. जुवारी आणि मांडवी यांचा संगम घडवणाऱ्या कुंभारजुवा कालव्यात ग्रामदेवी शांतादुर्गा कुंभारजुवेकारीणीचा मानाचा गणपती जेव्हा विसर्जनासाठी नेला जातो, तेव्हा भाविक दोन नौकांना एकत्रित करून सांगड तयार करून, त्यात गणपतीला विराजमान करतात.

भाद्रपद चतुर्थीच्या सातव्या दिवशी गणपती मूर्ती विसर्जन करताना, इथल्या कष्टकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असते आणि त्यामुळे सांगडावर विसर्जनासाठी गणपतीमूर्तीसमवेत धार्मिक, पौराणिक कथांतल्या एखाद्या प्रसंगावर आधारित चित्ररथ विराजमान केले जातात. जल्लोषात होणारा कुंभारजुव्यातला हा सांगडोत्सव गोमंतकीय कष्टकरी, मच्छीमार लोकमानसाच्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांच्या त्रिवेणी संगमाचा जणू काही उत्कट आविष्कार घडवत असतो.

Goa Sangadotsav Festival
International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

गोव्यात गणपतीच्या मृण्मय मूर्तीप्रमाणे जत्रेच्या काळात देवतेच्या उत्सव मूर्तीला सांगडोत्सवाचा अनुभव दिला जातो. सोळाव्या शतकात पोर्तुगीज राजवटीत अमानुष, नृशंस ख्रिस्तीकरण करण्यात आले, तरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंपासून त्यांना दूर करणे मात्र चर्चला शक्य झाले नाही. त्यासाठी इन्क्विझिशनचा क्रूर छळही त्यांनी सहन केला आणि ख्रिस्ती दैवतेही पूर्वकालीन संकेतांनी पुजण्यात धन्यता मानली.

मान्सूनात २४ जूनला गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाने सेंट जॉन द बाप्तिस्ट यांच्या प्रीत्यर्थ सांज्याव साजरा करताना किनारपट्टीवरच्या गावांत दोन नौका एकत्रित करून आणि त्यांना मौसमी फुलांनी सजवून सांगड तयार केला जातो, तो याचेच द्योतक आहे.

Goa Sangadotsav Festival
Sangodd Festival: नदीत साजरा होणारा गोव्याचा सांगोडोत्सव; पहा Photos

गोव्यातल्या हिंदू धर्मीयांनी आपल्या आराध्य दैवताप्रमाणे कुंभारजुवेत गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनावेळी सांगडोत्सव जसा साजरा करतात, त्यातूनच प्रेरणा घेऊन इथल्या ख्रिस्ती समाजानेही सांज्याव साजरा करण्यासाठी सांगडाचा आधार घेतला आणि आपल्या परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाशी समरसता सुदृढ केली. सांगड या शब्दाचा अर्थ एकत्र बांधणे, जोडणे, मैत्री असा असून, दोन नौकांना एकत्रित आणल्यावर त्याचे प्रयोजन गोव्यात करण्यात आले. संत माणकोजी बोधले यांच्या शब्दांतून सांगायचे तर सांगड बांधा रे । भक्तीची । नारायण नामाची ॥

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com