

Zimbabwe Boat Accident Kariba Lake: जिम्बाब्वेमधून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. येथील प्रसिद्ध करिबा सरोवरात 95 प्रवाशांनी भरलेली एक बोट अचानक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला आणि बालकांसह 15 जणांचा बुडून मृत्यू झाला असून अपघातानंतर 20 हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
स्थानिक प्रशासन, लष्कर आणि पाणबुड्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे. या दुर्घटनेचे काही हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये सरोवराच्या पाण्यात बोट पूर्णपणे उलटलेली दिसत आहे, तसेच लोकांचे सामान आणि मृतदेह पाण्याच्या प्रवाहावर तरंगताना दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम्बाब्वेच्या उत्तर भागातील करिबा शहरातून विविध बेटांवर जाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर बोटींचा वापर करतात, विशेषतः मासेमारीसाठी येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. अपघाताच्या वेळी बोटीमध्ये 90 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. हवामान अत्यंत खराब असतानाही ही बोट प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. बोट सरोवराच्या अगदी मधोमध पोहोचली असता, पाण्याचा वेग वाढला आणि ती जोरदार लाटांवर आदळली.
याच दरम्यान बोटीचे इंजिन अचानक बंद पडल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोट पाण्यात उलटली. सुदैवाने, आजूबाजूने जाणाऱ्या इतर बोटींमधील लोकांनी हा अपघात (Accident) पाहिला आणि तात्काळ मदतीचा हात पुढे करत पोलिसांना याची माहिती दिली.
या दुर्घटनेतून बचावलेले प्रवासी मॅक्सटन कान्हेमा यांनी सांगितले की, अपघात होताच आजूबाजूच्या बोटी मदतीसाठी धावून आल्या. तसेच मतुसाडो नॅशनल पार्कने तातडीने हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी पाठवले. तसेच, करिबा शहरातून लष्कराच्या मोठ्या बोटी आणि पाणबुड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे 60 जणांना सुखरुप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, लाटांचा वेग प्रचंड असल्यामुळे मदत पथकाला अपघातग्रस्त बोटीपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, ज्यामुळे 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या महिला आणि लहान मुलांची आहे.
सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी आणि ओळखीसाठी करिबा शहराच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, करिबा सरोवर हे जिम्बाब्वे आणि झांबियाच्या सीमेवर असून, ते राजधानी हरारेपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. हे सरोवर पाण्याच्या क्षमतेच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर म्हणून ओळखले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.