ढिंग टांग: ट्रम्प कहीं नहीं जाएगा..!

US Politics: ओव्हल ऑफिस, व्हाइट हौस, वॉशिंग्टन डीसी. वेळ : सकाळ किंवा दुपारही असेल!
US Politics
US PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

स्थळ : ओव्हल ऑफिस, व्हाइट हौस, वॉशिंग्टन डीसी. वेळ : सकाळ किंवा दुपारही असेल! पात्रे: मि. प्रेसिडेण्ट ट्रम्प आणि सीआयए चीफ जॉन रॅटक्लिफ.

रॅटक्लिफ : (अस्वस्थपणे खाकरत) ऑनरेबल मि. प्रेसिडेण्ट, बातम्या फार उत्साहवर्धक नाहीत!

ट्रम्प : (बेदरकारपणे) डोण्ट वरी अबौट बातम्या, जॉन! मी एक ट्विट केलं तरी शेकडो बातम्या तयार होतात!!

रॅटक्लिफ : (पुन्हा खाकरत) मि. प्रेसिडेण्ट, निवडणुकीच्या बातम्या उत्साहवर्धक नाहीत, असं म्हणायचं होतं मला!!

ट्रम्प : (गोंधळून) कसली निवडणूक? आय डोण्ट नो अ डॅम थिंग!! आय डोण्ट केअर आयदर...

रॅटक्लिफ : (अहवाल देत) मि. प्रेसिडेण्ट, तुम्ही याबद्दल जागरुक असालच की, नुकत्याच अमेरिकन काँग्रेस आणि सेनेटच्या मध्यावधी निवडणुका झाल्या!

ट्रम्प : (भिवई वर चढवत) ओह, आय सी! मग काय लागला निकाल?

US Politics
Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

रॅटक्लिफ : (कसं सांगू? या विचारात) सुपडा साफ झाला!

ट्रम्प : (मूठ वळवत विजयी मुद्रेने) शाब्बास!! मेक अमेरिका ग्रेट अगेन!! ट्रम्प कहीं नही जायेगा!!

रॅटक्लिफ : (अवघडून) तसं नव्हे, इन फॅक्ट, आपल्या रिपब्लिकन पक्षाचा सुपडा साफ झाला, मि. प्रेसिडेण्ट! डेमोक्रॅट्स जिंकले आहेत...

ट्रम्प : (आरामात खुर्चीत रेलून) फिकर नॉट!! याचा अर्थ इतकाच की अमेरिकेत लोकशाही आहे...आजवर मला वाटत होतं की लोक शिव्या देतात ते प्रेमामुळे!

रॅटक्लिफ : (सहमती दर्शवत) अलबत, अलबत!! पण दरवेळी लोक प्रेमानेच शिव्या देतात असं नाही!...अँड प्लीज अलाव मी टु करेक्ट! अमेरिका हे सर्वांत महान लोकशाही राष्ट्र आहे! आपण इथली लोकशाही इतकी बळकट करत नेली आहे की, आज डेमोक्रॅट्स जिंकले, हे खरं तर तुमचंच यश आहे!!

ट्रम्प : (खुशीत) यू सेड इट!! डेमोक्रॅट्सनी निवडणूक जिंकली असेल, पण खरा विजय माझाच आहे! मी स्वतः या निवडणुकीत असतो तर मला वाटतं, निकाल फार वेगळा लागला असता! हो की नाही? लोकांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, कारण अमेरिकेच्या इतिहासातली सर्वांत महान दोन वर्ष माझ्याच अध्यक्षपदाच्या काळात गेली...ट्रम्प कहीं नही जायेगा!!

रॅटक्लिफ : (नाइलाजाने) अर्थात, अर्थात!! आय मीन...हो!!

ट्रम्प : (सावध होत) पण या डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे आपल्याला काही धोका नाही ना? मागे त्यांनी रस्त्यावर उतरून फालतू आंदोलनं केली, तेव्हा तुम्हीच मला काही धोका नाही, असं सांगितलं होतं...आता काय परिस्थिती?

रॅटक्लिफ : (सावधगिरीने) वेल, धोका आहेही आणि नाहीही!! तुमच्यावर महाभियोग येऊ शकतो!!

ट्रम्प : (आणखी विचारात पडत) माझं चुकलंच, मी उगीच त्या इस्रायल-इराण आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात पडलो!! इस्रायलचे माझे मित्र नेतान्याहू काय म्हणतायत?

रॅटक्लिफ : (गंभीर सुरात) त्यांनी फोन केला होता, पण दहा मिनिटं नुसते स्फुंदत होते, बोलले काहीच नाहीत!

ट्रम्प : (मायाळूपणाने) पुअर चॅप!! युक्रेनचे झेलेन्स्की काय म्हणतात?

रॅटक्लिफ : (खाकरत) स्वस्त आणि चांगला वडापाव कुठे मिळेल, विचारत होते!!

US Politics
Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

ट्रम्प : (चमकून) वडापाववरून आठवण झाली! माय फ्रेंड मि. मोडींचं मी ऐकायला पाहिजे होतं!!

रॅटक्लिफ : (उत्सुकतेनं) मला खात्री आहे, त्यांचा सल्ला उपयुक्त असेल!! काय म्हणाले ते, मि. प्रेसिडेंट?

ट्रम्प : (हात चोळत) समबडी ग्यानेश म्हणून एक खास माणूस पाठवू का मदतीला, असं विचारत होते! मीच म्हटलं की डोण्ट वरी, ट्रम्प कहीं नहीं जायेगा!!...च्यामारी गडबडच झाली!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.