सागरी सफारी ठरली जीवघेणी! 350 हून अधिक प्रवाशांची फेरी समुद्रात बुडाली; 15 जणांचा मृत्यू, शेकडो जणांचे जीव वाचवण्यात यश VIDEO

Philippines Ferry Sinks: दक्षिण फिलीपीन्समधून एक धक्कादायक घटना समोर आली. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक फेरी भरसमुद्रात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली.
Philippines Ferry Sinks
Philippines Ferry Sinks:Dainik Gomantak
Published on
Updated on

Philippines Ferry Sinks: दक्षिण फिलीपीन्समधून एक धक्कादायक घटना समोर आली. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक फेरी भरसमुद्रात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली. अधिकृत माहितीनुसार, या फेरीवर 350 हून अधिक लोक होते. अपघात घडताच बचाव पथकाने तातडीने धाव घेत आतापर्यंत 215 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही स्थानिक अहवालांमध्ये मृतांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी, प्राथमिक आकडेवारीनुसार परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एम/व्ही त्रिशा केर्स्टिन 3' असे या फेरीचे नाव असून ती 'एलेसन शिपिंग लाइन्स'द्वारे चालवली जात होती. ही इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर फेरी झांबोआंगा शहराच्या बंदरातून सुलू प्रांतातील दक्षिणेकडील जोलो बेटाच्या दिशेने रवाना झाली होती.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, जहाजावर एकूण 332 प्रवासी आणि 27 क्रू सदस्य असे मिळून एकूण 359 लोक होते. ही दुर्घटना बसिलन प्रांताजवळ घडली. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा समुद्रातील हवामान पूर्णपणे स्वच्छ होते आणि कोणत्याही प्रकारचे वादळ किंवा नैसर्गिक संकट नव्हते. प्राथमिक तपासानुसार, कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे किंवा यांत्रिक समस्येमुळे ही फेरी बुडाली असावी, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Philippines Ferry Sinks
China Philippines Tensions: चीनची ‘दादागिरी’; फिलिपाइन्सच्या नौदलावर केला गलवानसारखा हल्ला

बसिलन द्वीप प्रांताचे गव्हर्नर मुजीव हाटामन यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्या अनेक प्रवाशांना आणि काही मृतदेहांना प्रांतीय राजधानी इजाबेला येथे नेण्यात आले. इजाबेला बंदरावर माध्यमांशी बोलताना गव्हर्नर म्हणाले की, "मी येथे बंदरावर 37 प्रवाशांना रिसीव्ह करत आहे, दुर्दैवाने यापैकी दोन जण मृत आढळले आहेत." ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबाबत वाचलेल्या प्रवाशांकडून माहिती घेतली जात आहे.

Philippines Ferry Sinks
Philippines: ज्वालामुखीमध्ये जबरदस्त स्फोट, हजारो लोकांना सोडावी लागली घरे

फिलीपीन्स हा हजारो बेटांचा समूह असलेला देश असल्याने एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी 'फेरी' हे प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि महत्त्वाचे साधन आहे. मात्र, या देशात सागरी अपघात ही एक मोठी समस्या बनली. वारंवार येणारी वादळे, जहाजांची दुरवस्था, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आणि सुरक्षा नियमांची पायमल्ली ही या अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात. सुलू, बसिलन आणि जोलो यांसारख्या दुर्गम प्रांतांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे.

Philippines Ferry Sinks
Philippines Terror Attack: दक्षिण फिलिपाइन्समधील विद्यापीठात मोठा बॉम्बस्फोट; परदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय, 4 ठार

फिलीपीन्सच्या (Philippines) सागरी इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटना डिसेंबर 1987 मध्ये घडली होती. त्यावेळी 'डोना पाझ' नावाची फेरी एका इंधन टँकरला धडकून बुडाली होती, ज्यामध्ये 4300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. शांततेच्या काळात घडलेली ही जगातील सर्वात मोठी सागरी आपत्ती मानली जाते. सध्या घडलेली ही दुर्घटना फिलीपीन्स सरकारसाठी चिंतेचा विषय बनली असून सागरी सुरक्षेच्या नियमांबाबत आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. सध्या बेपत्ता लोकांच्या शोधासाठी कोस्ट गार्ड आणि स्थानिक मच्छीमार एकत्र काम करत असून आपल्या प्रियजनांच्या प्रतीक्षेत असलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com