

Maulana Fazlur Rehman House Arrest Lahore: पाकिस्तानमधील राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, 'जमियत उलेमा-ए-इस्लाम' पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांना लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. ते सरगोदा येथे मोठी रॅली घेणार होते, मात्र त्याआधीच हाय कोर्ट बार असोसिएशनच्या कार्यक्रमासाठी लाहोरमध्ये पोहोचताच त्यांना रोखण्यात आले. वकिलांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू नयेत म्हणूनच ही कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या पक्षाने केला.
मौलाना रहमान यांनी अलीकडेच लष्कर आणि विशेषतः लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीरवर निशाणा साधला. देशातील रेयर अर्थ मिनरल्सची लूट आणि खैबर पख्तूनख्वामध्ये गव्हर्नर राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी लष्करावर टीकास्त्र डागले होते. या कारवाईनंतर लाहोरमधील (Lahore) त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले.
या घटनेनंतर मौलाना रहमान यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकार आणि लष्करावर संविधान व लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप केला. कितीही जुलूम झाला तरी आपण थांबणार किंवा झुकणार नसून, देश वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पक्षाचे प्रवक्ते हाफिज गझनफर अझीझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील पक्षाचे मुख्य कार्यालय पोलिसांनी घेरले असून, पंजाबमधील विविध शहरांतून अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. अटक, रस्ते अडवणे, व्यवसाय बंद करणे आणि गुन्हे दाखल करणे या मार्गांनी पक्षाला मागे हटवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात मौलाना रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सिंध प्रांताच्या विभाजनाच्या शक्यतेवरुनही मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि गदारोळ सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.