

पाकिस्तानमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली असून, या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातील पकपत्तन जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बस रस्त्याच्या मधोमध उलटली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनीही बचावकार्यात मदत केली. बसमध्ये अनेक प्रवासी अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर उलटली. त्यामुळे अनेक प्रवासी बसच्या आतील भागात अडकून पडले होते. जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर क्रेनच्या मदतीने उलटलेली बस सरळ करण्यात आली. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बचाव मोहिमेदरम्यान ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. जवळपास तीन तास बचावकार्य सुरू होते. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने विशेष व्यवस्था केली.
अपघातातील जखमींची संख्या मोठी असल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने आणीबाणी घोषित केली. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी इतर रुग्णालयांतूनही अतिरिक्त डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.
रुग्णालयाचे अधिकारी डॉ. अहमद रजा यांनी या अपघाताची पुष्टी केली. जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त बस आणि ट्रक ताब्यात घेतले आहेत. संबंधित चालकाचा शोध घेण्यासह अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी प्रवाशांना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना केली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा सूचनाही रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय अपघाताची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
पाकिस्तानमध्ये रस्ते अपघातांच्या घटनांमुळे वारंवार जीवितहानी होत असल्याचे समोर येत आहे. रस्त्यांची खराब स्थिती, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे ही अपघातांमागील संभाव्य कारणे मानली जातात. यापूर्वी गेल्या महिन्यात बलुचिस्तानमध्ये बस आणि व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत १२ जणांचा मृत्यू झाला होता. आता पकपत्तन जिल्ह्यातील या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.