

महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या उद्घाटन सामन्याने क्रिकेट विश्वाला एका अंगावर काटा आणणाऱ्या थराराचा अनुभव दिला. शुक्रवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या नॅडिन डी क्लार्कने अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या हातातून विजय हिसकावून घेत नादिनने ६३ धावांची झंझावाती नाबाद खेळी साकारली आणि आरसीबीच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली.
अंतिम षटकाचा थरार: ६, ४, ६, ४ आणि विजय! सामन्याच्या शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १८ धावांची गरज होती. चेंडू मुंबईची हुकमी एक्का नेट सायव्हर-ब्रंटच्या हातात होता. पहिल्या दोन चेंडूंवर नॅडिन डी क्लार्कला एकही धाव घेता आली नाही, ज्यामुळे मुंबईच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर जे घडले ते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. नादिनने तिसऱ्या चेंडूवर गगनभेदी षटकार ठोकला, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर पुन्हा एक उत्तुंग षटकार आणि शेवटच्या चेंडूवर बॉलरच्या डोक्यावरून चौकार मारत आरसीबीला सनसनाटी विजय मिळवून दिला.
केवळ फलंदाजीच नव्हे, गोलंदाजीमध्येही चमकली नॅडिन डी क्लार्कचा हा विजय केवळ फलंदाजीपुरता मर्यादित नव्हता. या अष्टपैलू खेळाडूने सुरुवातीला गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. तिने अवघ्या २६ धावांच्या मोबदल्यात ४ महत्त्वाचे बळी घेतले. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
नॅडिन डी क्लार्क रंजक प्रवास दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियामध्ये १९९९ मध्ये जन्मलेल्या नॅडिन डी क्लार्कचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सुरुवातीच्या काळात तिला हॉकी आणि भालाफेक (Javelin Throw) या खेळांमध्ये रस होता.
मात्र, वयाच्या १७ व्या वर्षी तिने क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवला. २०१७ मध्ये भारता विरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण करणाऱ्या नादिनने अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली. तिने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ चा एकदिवसीय विश्वचषक यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.