
दिल्ली: देशाचे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मंगळवार (९ सप्टेंबर) संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मत टाकले. ही निवडणूक सत्ताधारी एनडीए आणि विरोधी 'इंडिया' आघाडी यांच्यातील राजकीय ताकदीची कसोटी मानली जातेय.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी २१ जुलै रोजी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले होते. त्यानंतर हे पद भरण्यासाठी ही निवडणूक होतेय.
आज सकाळी पंतप्रधान मोदींनंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी मतदान केले.
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून, त्यानंतर एक तासाने मतमोजणी सुरू होईल. रात्रीपर्यंत देशाला नवे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मिळतील.
या निवडणुकीत एनडीएने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि कोईम्बतूरचे दोन वेळा लोकसभा खासदार राहिलेले ६८ वर्षीय सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली गेलीये. ते गौंडर-कोंगु वेल्लालर ओबीसी समुदायाचे आहेत.
दुसरीकडे, विरोधी 'इंडिया' आघाडीने तेलंगणातील सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि ७९ वर्षीय बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे. 'सलवा जुडूम' आणि 'काळ्या पैशांच्या' तपासाशी संबंधित निकालांसाठी ते ओळखले जातात.
कागदोपत्री एनडीएला ४२५ खासदारांचा पाठिंबा आहे, तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या स्वाती मालीवाल यांच्या पाठिंब्यामुळे त्यांची संख्या ४३६ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 'इंडिया' आघाडीकडे ३२४ खासदार आहेत.
बीआरएस आणि बीजेडीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने ७८१ खासदारांच्या निवडणूक मंडळाची प्रभावी संख्या ७७० झाली आहे, त्यामुळे विजयासाठी ३८६ मतांची गरज आहे. विश्लेषकांच्या मते, यावेळी विजयाचे अंतर २०२२ च्या निवडणुकीपेक्षा कमी असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.