

नवी दिल्ली: सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) दुरुस्ती विधेयकावरील लोकसभेतील चर्चा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेले आरोप आणि त्यानंतरच्या गदारोळाने गाजला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर, तरुणांना मूर्ख ठरविण्याची राहुल गांधी यांची भाषा धक्कादायक आहे, अशी टीका डॉ. जितेंद्रसिंह यांनी केली. विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळून लावताना लोकसभेने विधेयक संमत केले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘इंदिरा भवन’ या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन शहा यांच्यावर नव्याने फैरी झाडल्या आणि त्यांना पदावरून जावे लागेल, असा इशाराही दिला. विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणे, हा माझा हक्क आहे, असे सांगताना ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई हा देशापुढील सर्वांत गंभीर प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने गोळीबार करण्यात आला आणि एका विद्यार्थ्याची एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करताना शॉक बॅटन आणि खिळे असलेल्या लाठ्या वापरल्या. आंदोलनादरम्यान अमित शहा पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश देत असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरले जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. ही आमची हमी आहे.’’
या पत्रकार परिषदेपूर्वी राहुल गांधींनी संसद भवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलतानाही त्यांनी अमित शहांवर टीका केली. ते म्हणाले,‘‘गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले किंवा विद्यार्थ्यांवर गोळीबार होणार आहे, याची गृहमंत्र्यांना माहितीच नव्हती, या दोन शक्यता आहेत. त्यात पहिल्या शक्यतेत गृहमंत्री दोषी ठरतात तर दुसऱ्या परिस्थितीत ते अकार्यक्षम ठरतात.’’
राहुल गांधी यांच्या मागण्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करावे, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश द्यावेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा सभ्यपणा दाखवावा, अशा तीन प्रमुख मागण्या राहुल गांधी यांनी केल्या.
महत्त्वाच्या िधेयकावरील चर्चेदरम्यान विधायक सूचना देण्याऐवजी विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. तरुणांना ‘मूर्ख’ म्हणण्यापेक्षा अधिक दुर्दैवी काय असू शकते?
- डॉ. जितेंद्र सिंह,
केंद्रीय राज्यमंत्री
‘गृहमंत्र्यांनी दिला गोळीबाराचा आदेश’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी आणलेले बहुचर्चित सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक २०२६ मंजूर झाले. मात्र, आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
गृहमंत्री अमित शहा यांची सभागृहातील अनुपस्थिती हे भीतीचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचा, त्यांच्याविरुद्ध पॅलेटगन वापरण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.
- राहुल गांधी.विरोधी नेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.