

NSA Ajit Doval Speech: 'विकसित भारत युवा नेता संवाद'च्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी आपल्या धारदार शब्दांनी देशातील तरुण पिढीला केवळ प्रोत्साहित केले नाही, तर शत्रूंना सज्जड दमही दिला. "आजचा हा मुक्त आणि सामर्थ्यवान भारत नेहमीच असा नव्हता. या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी केले, अपमान सोसला आणि पराकोटीच्या हतबलतेचा सामना केला," अशा शब्दांत त्यांनी भारताच्या वेदनादायी कालखंडाचा पाढा वाचला.
डोवाल यांनी इतिहासाच्या जखमांवर बोट ठेवताना सांगितले की, भारताची महान सभ्यता नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. ''आपली गावच्या गावं जाळली गेली, मंदिरे लुटली गेली. एवढचं नाहीतर आपली संस्कृतीही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न झाला. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, त्या काळात आपण हे सर्व मूक प्रेक्षक बनून पाहत होतो. आपल्या पूर्वजांना फासावर चढवले गेले, तरीही आपण असहाय होतो. आजच्या तरुणांनी हा इतिहास विसरता कामा नये, कारण हा इतिहास आपल्याला एक मोठे आव्हान देतो," असे डोवाल यांनी स्पष्ट केले.
डोवाल यांनी आपल्या भाषणात 'प्रतिशोध' या शब्दाचा अर्थ अत्यंत स्पष्ट भाषेत मांडला. ते म्हणाले, "प्रतिशोध हा शब्द कदाचित आदर्श वाटणार नाही, पण ती स्वतःच एक शक्तिशाली ऊर्जा आहे. आपल्याला आपल्या इतिहासाचा बदला घ्यावा लागेल. याचा अर्थ विनाश करणे असा नाही, तर भारताला पुन्हा त्या शिखरावर नेऊन ठेवणे, जिथे आपल्या हक्कांचे, विचारांचे आणि श्रद्धांचे कोणीही दमन करु शकणार नाही. प्रत्येक भारतीय तरुणाच्या मनात या बदलाची आग धगधगत असायला हवी."
भारताने (India) कधीही कोणावर आक्रमण केले नाही, याकडे जगाचे लक्ष वेधताना डोवाल म्हणाले, "जेव्हा उर्वरित जग मागासलेले होते, तेव्हा आपली सभ्यता अत्यंत प्रगत होती. आपण कधीही कोणाचे प्रार्थनास्थळ तोडले नाही किंवा कोणाचे राज्य लुटायला गेलो नाही. परंतु, आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी निर्माण होणारे धोके ओळखण्यात अपयशी ठरलो. आपण जेव्हा जेव्हा या धोक्यांकडे दुर्लक्ष केले, तेव्हा तेव्हा इतिहासाने आपल्याला कठोर धडा शिकवला आहे. जर आपली पुढची पिढी हा धडा विसरली, तर ती भारतासाठी सर्वात मोठी शोकांतिका असेल."
युद्ध का लढले जाते? यावर डोवाल यांनी अत्यंत तर्कशुद्ध विवेचन केले. "आपण काही मनोरोगी नाही, ज्यांना कोणाचे मृतदेह पाहून आनंद मिळतो. युद्ध हे कोणाचे शरीर संपवण्यासाठी नाही, तर देशाचे मनोधैर्य (Morale) तोडण्यासाठी लढले जाते. शत्रूने आपली इच्छा मान्य करुन शरणागती पत्करावी, यासाठी युद्ध असते. तुमची वैयक्तिक इच्छाशक्ती हीच पुढे जाऊन 'राष्ट्रीय शक्ती' बनते. त्यामुळे आपल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी ही इच्छाशक्ती मजबूत असायला हवी," असा मंत्रही त्यांनी युवा नेत्यांना दिला.
अजित डोवाल (Ajit Doval) यांचे हे भाषण केवळ एक राजकीय संबोधन नसून ती आधुनिक भारताच्या संरक्षण आणि स्वाभिमानाची नवी संहिता मानली जात आहे. 'महान भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी आपल्या पूर्वजांचा अपमान लक्षात ठेवून भविष्यात सज्ज राहावे', हाच त्यांच्या भाषणाचा मुख्य गाभा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.