

Mallikarjun Kharge Terrorist Remark PM Modi: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त विधानाने नवा वाद ओढवून घेतला. तामिळनाडूतील चेलाचेरी येथे प्रचारासाठी पोहोचलेल्या खर्गे यांनी अण्णा द्रमुक आणि भाजपच्या युतीवर टीका करताना पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'आतंकवादी' असा केला. खर्गे यांच्या या विधानामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. मात्र, नंतर वादाचे गांभीर्य पाहून खर्गे यांनी आपण असे विधान केले नसल्याचा दावा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
चेलाचेरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना खर्गे यांनी आरोप केला की, भाजप आणि अण्णा द्रमुकची युती लोकशाही कमकुवत करण्याचे काम करत आहे. खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा समानतेवर विश्वास नाही आणि त्यांचा पक्षही न्याय अन् समानतेच्या तत्त्वांना मानत नाही.
त्यांनी पुढे असेही म्हटले की, अण्णा द्रमुक अशा व्यक्तीसोबत कशी काय हातमिळवणी करु शकते जो 'आतंकवादी' विचारसरणीचा आहे आणि जो अण्णादुराई, कलाईग्नार, कामराज, पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांच्या विचारांना मानत नाही. तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसची (Congress) युतीच विकासासाठी काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपची विचारसरणी ही सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
खर्गे यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपने अण्णा द्रमुकसोबत युती करुन पूर्ण ताकद पणाला लावली. खुद्द पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमध्ये प्रचार करताना काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. विशेषतः संसदेत महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयक मंजूर होऊ न शकल्याबद्दल मोदींनी या पक्षांना जबाबदार धरले होते. मोदींच्या याच टीकेला उत्तर देताना खर्गे यांची जीभ घसरली आणि त्यांनी अत्यंत टोकाचे शब्द वापरले.
पाच राज्यांच्या या निवडणूक रणधुमाळीत खर्गे यांनी वादात अडकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी केरळमध्ये प्रचार करताना त्यांनी गुजरातच्या जनतेला 'अडाणी' म्हटले होते, ज्यावरुन मोठा गदारोळ झाला होता आणि नंतर त्यांना माफी मागावी लागली होती. आता तामिळनाडूतील या विधानामुळे गुजरातमध्ये सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरातमध्ये 26 एप्रिलला मतदान होणार असून 28 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याने केलेल्या अशा विधानांमुळे भाजपला (BJP) आयते कोलीत मिळाले असून याचा परिणाम मतदानावर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.