Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

Narendra Modi Partagali Visit Goa: केवळ गोव्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध राज्यात विखुरलेल्या या मठाच्या अनुयायांसाठी हा दिवस व क्षण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा ठरला आहे.
Narendra Modi Partagali Visit Goa
Narendra Modi Partagali Visit GoaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

पंतप्रधान तथा स्वतःस देशाचे ‘प्रधान सेवक’ म्हणविणारे नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात येऊन गेले. त्यांनी येथील मुक्कामात देशातील नव्हे तर जगातील सर्वांत उंच (७७ फूट) मानल्या जात असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पर्तगाळी येथील मठ प्रांगणात अनावरण केले. त्याचबरोबर गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५०व्या स्थापनादिनानिमित्त हाती घेतलेल्या अनेक योजनांचा प्रारंभही केला.

केवळ गोव्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध राज्यात विखुरलेल्या या मठाच्या अनुयायांसाठी हा दिवस व क्षण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा ठरला आहे. त्याला तशीच कारणेही आहेत. या एकमेव कार्यक्रमासाठीच मोदीजी दिल्लीपासून इतक्या दूरवर गोव्यात आले नव्हते, तर त्यापूर्वी त्यांनी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील अष्टमठाच्या सांनिध्यात सुरू असलेल्या ‘लक्षमुख गीता पठण यज्ञा’तही उपस्थिती लावली होती.

तेथून ते थेट पर्तगाळीला आले. एकप्रकारे शुक्रवारचा त्यांचा दिवस आध्यात्मिक कार्यातच गेला. याच आठवड्यात त्यांनी अयोध्येतील विशाल राममंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण केले होते व या त्रिवेणी योगाचा त्यांनी पर्तगाळींतील कार्यक्रमात खास उल्लेखही केला. पण उडुपीत व पर्तगाळीत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांना एक वेगळे आवाहन केले ते नऊ संकल्प करण्याचे व ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.

एरवी पंतप्रधानांच्या प्रत्येक बोलण्याकडे व कृतीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांनीही गंभीरपणे विचार करावेत असे हे संकल्प आहेत खरे. या संकल्पात राजकारणाचा लवलेशही नाही. उलट आपला समाज, देश व मानवजात निरोगी व सुदृढ बनविण्याची व्यवस्था आहे.

पर्यावरण रक्षण व जलसंरक्षण हा आपला धर्म मानावा, झाडे लावा व झाडे जगवा, स्वच्छता हा आपल्या जीवनाचा भाग बनवा, स्वदेशीचा अंगीकार करा, देशदर्शन करा, नैसर्गिक शेतीवर भर द्या, श्रीअन्न मिलेट स्वीकारा -तेल कमी वापरा, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा, योग व खेळ यांचा अंगीकार करा, कोणत्याही मार्गाने गरिबांची सेवा करा हे ते नऊ संकल्प होत.

खरे म्हणजे मानवी समाजाला विकसित व सुदृढ बनविणारे हे संकल्प मानता येतील, पण प्रत्येक बाबीकडे राजकीय व दूषित दृष्टीने पाहणारे या संकल्पावर टीका केल्याशिवाय राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणीच म्हणजे सत्ताधारीही अशा गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत हे स्वच्छ भारत अभियानावरून दिसून येते.

२०१४मध्ये प्रथमत: पंतप्रधान बनल्यावर मोदी यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली होती. काही काळ त्याचे चांगले परिणामही दिसून आले पण नंतर त्यातील केवळ लोकांमध्येच नाही तर शासकीय पातळीवरही कमी झाल्याचे दिसून आले. कारण असे मुद्दे गांभीर्याने घेण्याची कोणाचीच तयारी नाही हे आहे.

एक गोव्याचेच उदाहरण घेतले तर स्वच्छतेवर व कचरा व्यवस्थापनावर सरकारपासून नगरपालिका ते पंचायती दिवसाला काही लाख खर्च करत असावेत पण विखुरलेला कचरा सर्वत्र दिसून येतो. वास्तविक कचरा व्यवस्थापन हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले तरच ते शक्य आहे.

पण त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. केवळ गांधी जयंतीच्या दिवशी साफसफाई करून भागणार नाही. जलसंरक्षणाचेही तसेच आहे. आपल्या गोव्यात दीडशे ते हल्लीच्या वर्षात त्याहून अधिक इंच पाऊस पडतो पण डिसेंबर-जानेवारीतच पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू होतात.

त्यामागील कारण पाण्याबाबत आपण गंभीर नाही, हेच आहे. हे नैसर्गिक स्रोत जतन करण्याची गरज असून त्याचे महत्त्व शालेय स्तरावरून मुलांना पटवून देण्याची गरज आहे. पण ते होत नाही गोव्यात वाढत्या शहरीकरणामुळे घरोघरी असलेल्या विहिरी एक तर बुजविल्या गेल्या आहेत वा प्रदूषित झाल्या आहेत.

एकदा नळाच्या पाण्याची सवय झाली की विहिरीचे पाणी कशाला ओढायचे ही प्रवृत्ती वाढत आहे पण त्याचा विचार होताना दिसत नाही. कोविडनंतर अकाली मृत्यूचे वाढत चाललेले प्रमाण पाहता या बदलत जाणाऱ्या जीवनशैलीशी त्याची सांगड अनेकजण घालतात.

Narendra Modi Partagali Visit Goa
Partgali Math: पर्तगाळीत रंगणार ‘नांदी दर्शन’ कार्यक्रम! तब्बल 575 कलाकारांचा सहभाग; गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा येणार अनुभव

खरेच त्याचा काही संबंध आहे की काय ते कळायला मार्ग नाही म्हणूनच मोदीजींचे हे संकल्प गांभीर्याने घेण्याची गरज जाणवते. त्यांनी हे संकल्प केले ते एका धर्मपीठाच्या कार्यक्रमात तेथे मोठ्या संख्येने पालक मंडळीही होती म्हणजे तेथे असलेल्या या पालकांनी त्या संकल्पांचा अंगीकार केला तरी बरेच बदल समाजात होऊ शकतात.

दुसरा मुद्दा देशांत आज अधिक संख्येतील राज्ये भाजपशासित आहेत त्यांनी हे संकल्प आपल्या राज्यकारभाराचे भाग बनविता येण्यासारखे आहेत. तसे त्यांनी केले तर मोदीजी म्हणतात तसा नव्या रूपांतील विकसित भारत उदयास येणे शक्य आहे.

Narendra Modi Partagali Visit Goa
Partgali Math: पर्तगाळीत रंगणार ‘नांदी दर्शन’ कार्यक्रम! तब्बल 575 कलाकारांचा सहभाग; गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा येणार अनुभव

मात्र प्रत्येकाला त्यासाठी हे संकल्प तडीस नेण्यासाठी झटावे लागेल. पर्तगाळीतील या महाकार्यक्रमामुळे पर्तगाळी मठाचे महत्त्व, त्याचा इतिहास जगासमोर उभा राहिला आहे. एरवी कोणत्याही बाबतीत मठ व मठाधीशांवर ठपका ठेवणाऱ्या, मठाची सांगड साखरभाताशी घालणाऱ्यांना कोणतीही टीका टिप्पणी करताना हजारदा विचार करावा लागेल. कारण खुद्द पंतप्रधानांनी या मठाच्या परंपरेचा व कार्याचा मुक्तपणे गौरव केलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com