

Lashkar-e-Taiba Commander Musa Killed: जम्मू-कश्मीरमधील बडगाम जिल्ह्याच्या दुर्गम आणि दाट जंगलात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एका भीषण चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा अत्यंत खतरनाक आणि मोस्ट वांटेड कमांडर मारला गेला. गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार हा कुख्यात दहशतवादी सुलेमान शाह ऊर्फ 'मूसा' असल्याचे समोर आले. या कारवाईच्या ठिकाणाहून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, दारुगोळा आणि विविध आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.
दहशतवादी मूसा गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता आणि तो काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) उद्ध्वस्त झालेले नेटवर्क पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि निष्पाप स्थानिक तरुणांना भडकवण्याच्या कुटिल कारस्थानांमध्ये सक्रिय होता.
भारतीय राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे युसमर्ग भागातील कोराग आणि दूधपथरीच्या घनदाट जंगलात एक विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. या दरम्यान सतर्क जवानांना जंगलात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. सुरक्षा दलांनी वेढा घालून लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले, परंतु शरण येण्याऐवजी दहशतवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरु केला. जवानांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मोर्चा संभाळत चोख आणि तीव्र प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी अत्यंत भीषण गोळीबार झाला.
दूधपथरीच्या या घनदाट जंगलात झालेल्या या गोळीबारातच मोस्ट वांटेड मुसा जागीच ढेर झाला. विशेष म्हणजे, हाच तो मूसा होता जो याच महिन्याच्या सुरुवातीला 5 सप्टेंबर रोजी युसमर्गच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीदरम्यान थोडक्यात बचावला होता, ज्या चकमकीत त्याचा अत्यंत जवळचा साथीदार यासिर मारला गेला होता.
या कुख्यात कमांडरच्या खात्म्यामुळे लष्कर-ए-तैयबाच्या स्थानिक नेटवर्कला मोठा हादरा बसला असून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. अफवा पसरु नयेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून कडक पाळत ठेवण्यात येत आहे. परिसरात आणखी कोण दडून बसले आहे का, हे शोधण्यासाठी अद्यापही कसून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.