

Jammu Kashmir Rain Flood Deaths: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि घरे कोसळण्याच्या घटनांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित निरनिराळ्या दुर्घटनांमध्ये तब्बल 24 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही 6 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुंछ आणि राजौरी हे जिल्हे या नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक प्रभावित झाले असून तिथे युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या भीषण व्हिडिओ आणि फोटोंवरुन तिथली निसर्गाच्या कोपाची भयावह परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.
पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील लोरन गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मुसळधार पावसात टेकडीवरुन मोठा ढिगारा एका कच्च्या घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत, डोडा जिल्ह्यात भद्रवाहहून जम्मूकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रग्गी नाल्याजवळ अचानक डोंगरावरुन मोठा दगड कोसळला. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. याशिवाय काश्तीगड भागात घराचे छ्प्पर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. एकट्या पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून उत्तराखंडसह इतर डोंगराळ भागातही दरडी कोसळल्याच्या बातम्या येत आहेत.
दरम्यान, सतत होणारा पाऊस (Rain) आणि भूस्खलनाचा गंभीर धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, रियासी येथील शिवखोडी आणि किश्तवाडची सरथल यात्रा दुसऱ्या दिवशीही स्थगित ठेवल्या आहेत. असे असले तरी बालटाल मार्गावरुन मर्यादित संख्येने काही भाविकांना अमरनाथ धामाकडे सोडण्यात आले. कटरा येथे सध्या 15 हजारांहून अधिक भाविक यात्रा पुन्हा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. माता वैष्णोदेवी मार्गावर बॅटरी कार ट्रॅक, भैरव घाटी मार्ग आणि पारंपारिक रस्त्यावर दगड पडल्याच्या व किरकोळ दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यात्रा आधीच स्थगित करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणताही भाविक यात जखमी झालेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.