

Lashkar Commander Zakir Ghani Killed Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी सर्च ऑपरेशनमध्ये एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी फत्ते केली. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या ऑपरेशनतर्गंत बुधवारी (8 जुलै) सुरक्षा दलांच्या जवानांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'चा टॉप कमांडर झाकीर गनी याला एका चकमकीत कंठस्नान घातले.
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी या ऑपरेशनला दुजोरा दिला असून, चकमकीच्या ठिकाणावरुन या कुप्रसिद्ध दहशतवाद्याचा मृतदेह आणि मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे व दारुगोळा हस्तगत करण्यात आला. खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या चन्नापोरा भागात काही कट्टर दहशतवादी लपून बसल्याची खात्रीशीर गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष अभियान पथक (SOG), भारतीय लष्कराची 55 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. अत्यंत कडक पाळत आणि वेढा कायम ठेवलेला असताना, बुधवारी ऑपरेशनदरम्यान जवानांना एका गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली जाणवल्या. जवानांनी पुढे पाऊल टाकताच तिथून जोरदार गोळीबार सुरु झाला. सुरक्षा दलांनी अत्यंत आक्रमक आणि अचूक प्रत्युत्तर देत लपलेल्या दहशतवाद्याचा खात्मा केला.
या यशानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी आपल्या अधिकृत 'X' हँडलवर अत्यंत कडक शब्दात लिहिले की, "तुम्ही पळू शकता, पण लपू शकत नाही! शोपियान एसओजीने लष्करच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले." दरम्यान, सुरक्षा यंत्रणांसाठी हे ऑपरेशन अजून पूर्णपणे संपलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या झाकीर गनीसोबत लष्करचा आणखी एक धोकादायक दहशतवादी 'लतीफ' देखील तिथे उपस्थित होता. मात्र, तो सुरक्षा दलांचा वेढा तोडून पळून जाण्यात यशस्वी ठरला. सध्या लष्कर आणि पोलिसांनी या फरार दहशतवाद्याचा माग काढण्यासाठी संपूर्ण परिसरात व्यापक नाकेबंदी केली असून, मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझेशन आणि सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.