

कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा झालेला अनपेक्षित पराभव, संघातील निवड-निवड प्रक्रिया आणि वरिष्ठ खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधील अचानक निवृत्तीने संपूर्ण भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये धक्काच बसला होता. वरिष्ठ खेळाडूंवर दबाव टाकला गेला, असा आरोप आता माजी फलंदाज मनोज तिवारी यांनी सार्वजनिकरित्या केला आहे.
इंडिया टुडेवर बोलताना मनोज तिवारी म्हणाले, "आमच्या देशांतर्गत पातळीवर इतकी प्रतिभा आहे की वेळ येताच नवी पिढी आपोआप वर येते. गदारोळ निर्माण करून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडले गेले."
ते पुढे म्हणाले की, घरगुती क्रिकेट अत्यंत समृद्ध असून "दबाव" हा शब्द न्यूझीलंड, झिम्बाब्वे सारख्या संघांना शोभतो; भारताला नाही. वरिष्ठ खेळाडू अजून खेळण्यास इच्छुक असताना वातावरणामुळे ते मागे हटतात, हे चुकीचे असल्याचे तिवारींचे म्हणणे आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कोलकाता कसोटीनंतर फलंदाजांच्या चुका आणि तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरही तिवारींच्या नाराजीचा सूर स्पष्ट जाणवला.
ते म्हणाले: "पराभवानंतर खेळाडूंना दोष देणे हा योग्य मार्ग नाही. प्रशिक्षकाचे काम मार्गदर्शन करणे आहे, दोष लावणे नव्हे. जर फलंदाज फिरकीविरुद्ध कमजोर दिसले, तर सामन्यापूर्वी त्यांना योग्य प्रशिक्षण का दिले गेले नाही? गंभीर स्वतः फिरकीवर उत्कृष्ट खेळाडू होते, मग त्यांनी संघाला त्या पद्धतीने तयारी करून का दिली नाही?"
पहिल्या कसोटीतील धक्कादायक पराभवानंतर टीम इंडियासमोर आता गुवाहाटीमध्ये मालिकेतील समता राखण्याचे मोठे आव्हान आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बारसापारा स्टेडियमवरील या सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेला भारतात २५ वर्षांत फक्त दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.